शेमारू मराठीबाणा आयोजित मराठी बाहुबलीच्या विशेष शोला दिग्गजांची उपस्थिती

🔹मराठी बाहुबलीचे दिग्गज मान्यवरांकडून कौतुक

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.4नोव्हेंबर):-‘बाहुबली’ या अभिजात कलाकृतीचा मराठमोळा साज प्रेक्षकांसाठी घेऊन येणाऱ्या शेमारू मराठीबाणा या वाहिनीने चित्रपटसृष्टीतील दिग्गज मान्यवर मंडळीसाठी नुकतेच पुण्यात या चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन केले होते. या स्क्रीनिंगला उपस्थित असलेल्या दिग्गज मान्यवरांनी या कलाकृतीचे भरभरून कौतुक केले. मुळ चित्रपटाच्या तोडीस तोड़ भव्यता जपत सादर करण्यात आलेला या मराठी ‘बाहुबली’ चित्रपटाचे प्रक्षेपण दिवाळीच्या मुहुर्तावर म्हणजे गुरूवार ४ नोव्हेंबरला दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ७.०० वा. ‘शेमारू मराठीबाणा वाहिनी’वर करण्यात आले.

नेहमीच यशस्वी अनोख्या संकल्पना राबविणाऱ्या ‘शेमारू मराठीबाणा वाहिनीने मराठी बाहुबलीच्या निर्मितीसाठी तितकीच मेहनत घेतली आहे. बाहुबलीच्या यशाचे मापदंड लक्षात घेता त्याच्या तोडीस तोड मराठी चित्रपट आणताना ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीने कोणतीही कसर सोडलेली नाही. चित्रपटाच्या डबिंगसाठी १२० हून अधिक कलाकारांचा सहभाग होता. चित्रपटाचे डबिंग अचूक व्हावे यासाठी कलाकारांच्या निवडीपासून ते त्यांच्या आवाजाच्या चाचणीपर्यंत प्रत्येक कलाकाराला कठोर निकषातून जावे लागले. अभिनेते डॉ.अमोल कोल्हे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, मेघना एरंडे यांनी मराठी बाहुबलीसाठी आपला आवाज दिला आहे. याच्या कलात्मक दिग्दर्शनाची जबाबदारी अभिनेते–दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी तर लिखाणाची जबाबदारी स्नेहल तरडे यांनी सांभाळली आहे.

गाण्यांच्या पुन:निर्मीतीवर तितकेच लक्ष देताना मुळ बाहुबलीच्या गाण्यांचा बाज आणि साज याला धक्का लागणार नाही याची पुरेपुर काळजी घेत संगीताची जबाबदारी कौशल इनामदार यांना सोपवली तर गीतलेखनाची जबाबदारी वैभव जोशी, मिलिंद जोशी, अस्मिता पांडे यांनी सांभाळली. यातील गाण्यांना आदर्श शिंदे, बेला शेंडे, अवधूत गुप्ते, संजीव चिम्मलगी, हृषिकेश रानडे, हंसिका अय्यर, बेला शेंडे, केतकी माटेगावकर, मुग्धा कऱ्हाडे या गायकांचा स्वरसाज लाभला आहे.

याप्रसंगी बोलताना शेमारू एंटरटेनमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरेन गडा सांगतात की, “शेमारू मराठीबाणा वाहिनीला नेहमीच प्रेक्षक़ांचे आणि इंडस्ट्रीचे प्रेम लाभले आहे. उत्तम संकल्पना राबवत दर्जेदार मनोरंजक कार्यक्रम देण्यासाठी शेमारू मराठीबाणा वाहिनी नेहमीच कटिबद्ध राहिली आहे. त्याच दिशेने वाटचाल करत मराठी बाहुबलीची दिवाळी भेट आम्ही प्रेक्षकांसाठी आणली असून हा चित्रपट प्रेक्षकांची दिवाळी अजून खास करेल” असा विश्वास ते व्यक्त करतात. ‘बाहुबली’ या चित्रपटाने बॅालीवूड आणि प्रादेशिक चित्रपटांमधील सीमारेषा धूसर केली आहे. ‘मराठी बाहुबली’च्या भव्यतेचे स्वप्न घरबसल्या दाखवण्याचा ‘शेमारू मराठीबाणा’ वाहिनीचा प्रयत्न प्रेक्षकांसाठी नक्कीच अनमोल भेट ठरेल आणि वाहिनीसाठी सुद्धा ही एक मोठी झेप ठरणार आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED