शाश्वत खऱ्या आपल्या गृहलक्ष्मीचे पुजनच आपल्या घरात सुख शांती आणू शकते

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

वरोरा(दि.5नोव्हेंबर):- – वैदिक संस्कृती ही पुरुषसत्ताक संस्कृती आहे.ती ऋषी संस्कृती असल्याने आपण ती सातत्याने नाकारत असतो.तर सिंधू संस्कृती ही मुळची मातृसत्ताक संस्कृती आहे.ती कृषी संस्कृती असल्याने चळवळीत काम करणारे आपण सकळ बंधू भगिनी थेट अनार्य अशा सिंधू संस्कृतीशी आपले नाते सांगत असतो.तर दुसऱ्या बाजूने परकीय आर्यांच्या वैदिक संस्कृतीला नाकारत असतो.

नकार हा केवळ वाणीतून प्रकट न होता.तो आपल्या करणीतून सुद्धा प्रकट व्हायला हवा.एखाद्या व्यक्तीला,समुहाला,रुढीला,परंपरेला,पायंड्याला,संस्काराला व संस्कृतीला नाकारताना त्यावर केवळ शब्दांचे फटकारे ओढून चालत नाहीत.तर त्या व्यक्तीला, समुहाला, रुढीला,परंपरेला, पायंड्याला, संस्काराला व संस्कृतीला कालोचीत,तर्कशुद्ध, बुद्धीप्रामाण्यवादी व विज्ञानाधिष्ठीत विकल्प देणे सुज्ञपणाचे ठरते.अशा सुज्ञपणाने अनेक अतार्कीक व कालबाह्य परंपरांना हद्दपार करता येते.याची प्रचिती वाशीम जिल्ह्यातील केशवराज काळे,गजानन धामणे, पंडीत देशमुख,गणेशनाना शिंदे,गोपाल खडसे,अजय सोनुनकर इत्यादी मान्यवरांच्या अभिनव उपक्रमातून येत आहे.

पत्नी ही आपली पूर्णांगिनी,जीवनसाथी असते.लग्ना नंतर पत्नी सदैव आपल्या पतीसह आपल्या सासरच्या सर्वांची जबाबदारी घेते.सर्वांची काळजी घेते.कुटूंबातील विविध फुलांना एकाच माळेत ओवणारा धागा बनते.पत्नी कुटूंबातील सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होते.म्हणूनच तिच्या त्यागाचा,समर्पणाचा व सेवेचा यथोचित सन्मान व्हायला हवा.कुठेतरी पत्नीच्या पाठीवर शाबासकीची थाप पडायला हवी.आपले परिजन आपल्या कामगिरीचे मुल्यांकन करुन आपल्याशी आत्मीयतेने, जिव्हाळ्याने व वात्सल्याने जुळलेले आहेत.हा एक ठोस संदेश आपल्या पत्नीच्या मन-मस्तकावर बिंबवला जावा आणि कुटूंबाच्या सर्व फुलांना एका सुंदर व सुगंधीत पुष्पमालेत परावर्तीत करणारा धागा अधिकाधिक मजबूत व्हावा.शिवाय दिवाळसणात कोणत्या गुढ,अनभिज्ञ व मातीच्या लक्ष्मीचे पूजन करण्याऐवजी आपल्याच परिवारातील खऱ्याखुऱ्या लक्ष्मीचे पूजन व्हायला पाहिजे.

हा कालसुसंगत व पुरोगामी विचार परिवर्तनवादी चळवळीत काम करणाऱ्या अनेक मान्यवरांनी मागील अनेक वर्षांपासून अंगीकारला आहे.विशेष म्हणजे दरवर्षी गृहलक्ष्मीचे पूजन करणारांची संख्या वाढत आहे,ही फारच आनंदाची बाब आहे.समाजातील अनिष्ट,काल विसंगत अशा रुढी,परंपरा व प्रथा हद्दपार करायच्या असतील तर प्रत्येक कुटूंबास हितकारक अशी कालोचित, बुद्धीप्रामाण्यवादी व विज्ञानवादी परंपरा समाजात प्रस्थापित करण्यासाठी युवकांना आता पुढे आले पाहिजे.हाच आमचा गृहलक्ष्मी पूजना मगील एकमात्र उद्देश आहे.