एसटी कामगारांच्या संपामुळे 59 आगारे बंद; एन दिवाळीत प्रवाशांचे हाल

29

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.5नोव्हेंबर):-राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला आहे. बंद झालेल्या आगारांची संख्या ३७ वरून गुरुवारी ५९ वर पोहोचली एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीला २३ पैकी २२ कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

मात्र, त्या संपात सहभागी नाहीत. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी ही एकमेव संघटना संपाच्या भूमिके वर ठाम असून, शुक्रवारी न्यायालयात भूमिका मांडणार आहे. औरंगाबाद, बीड, पाटोदा, गेवराई, परळी, आंबेजोगाई, आष्टी, माजलगाव, धारूर, तुळजापूर, हिंगोली, गडचिरोली, वसमत, जिंतूर, पाथरी, उरण, वाडा, सोलापूर, मंगळवेढा, नंदुरबार, जत, जामखेड, श्रीगोंदा या आगारांतील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी संपात उडी घेतली. बुधवारी ३७ आगारांतील कर्मचाऱ्यांनी संप पुकारून सेवा बंद ठेवली होती. त्यात गुरुवारी २२ आगारांची भर पडल्याने संप चिघळला. संपातील सहभागानुसार कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत महामंडळाने दिले आहेत.

काही कर्मचाऱ्यांना एक दिवसासाठी आठ दिवसांची वेतन कपात, काही कर्मचाऱ्यांचे निलंबन, तर काही कर्मचाऱ्यांची बडतर्फी अशी कारवाई करण्यात येणार आहे. एसटीत एकूण २३ कामगार संघटना असून, विविध मागण्यांसाठी त्यांची कृती समिती स्थापन करण्यात आली आहे. विविध मागण्यांसाठी २७ ऑक्टोबरला बेमुदत उपोषण सुरू के ल्यावर २८ ऑक्टोबरला अघोषित संप सुरू झाला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता मिळाल्यानंतर तसेच राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळ विलीनीकरण, वार्षिक वेतनवाढ या मागण्यांवर दिवाळीनंतर चर्चेचे आश्वासन एसटी महामंडळाने दिल्यानंतरही संप सुरूच राहिला.