या दिवाळीत काढू धर्मद्वेषाचं दिवाळं

धर्माने या जगात सर्वाधिक संवेदनशील स्वरूप धारण केलं आहे. जेव्हा लोक कशानेच भांडत नसतील तेव्हा त्यांच्यात धार्मिक वादाची ठिणगी टाका ते निश्चितच भांडल्याशिवाय आणि एकमेकांच्या जीवावर उठल्याशिवाय राहणार नाहीत. मानव जातीत वादाला कोणतेच कारण मिळत नसले तर धर्म हे एकमेव सदाबहार कारण आहे. विज्ञानाची प्रगती होत असतांना मानवी समाजातील धर्माचा जोर कमी व्हायला हवा होता पण तो दिवसेंदिवस वाढतोच आहे. धर्माचा जोर वाढला की पर्यायाने धर्मद्वेषाचाही जोर वाढतो. त्यातुन निर्माण होणार्‍या परिस्थितीने मानवी प्रजातीचं सर्वार्थाने नुकसान होतं. या दिवाळीत आपल्याला या धर्मद्वेषाचं दिवाळं काढण्याची सुरुवात करायची आहे. त्याकरिता आधी आपला धर्म कोणता? तो काय सांगतो? त्याला कुठे किती प्रमाणात महत्व द्यायचं? हे ठरवावं लागेल.
प्रत्येकाला आपल्या जाती-धर्माचा अभिमान असतो परंतु प्रत्येकाला जात-धर्म हा जन्मजात मिळत असतो. त्यात मनुष्याला पर्याय नसतात. त्यात आपले काहीच कर्तृत्व नसते. त्यामुळे तुम्ही त्या जाती-धर्माचा अभिमान बाळगण्याला काहीच अर्थ नसतो. तुम्ही मानव जातीत जन्म घेऊन मानव जातीसाठी काय कार्य केलं? माणसांशी कसे वागलात? आपल्या धर्माचं नाव जगात उंचावेल असं तुम्ही काय कर्तृत्व केलं? त्या कर्तृत्वाचा तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे.

छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वामुळे हिंदू धर्माचं नाव जगात उंच झालं. एका माणसाच्या असामान्य कार्यामुळे त्याच्या धर्माचं नाक उंच झालं. ते खरं कर्तृत्व. पण ते शक्य झालं शिवरायांच्या चिकित्सक दृष्टिकोनामुळे. कारण शिवराय धार्मिक असतीलही परंतु धर्मांध नव्हते. धर्मवेडे नव्हते. हिंदू धर्मासाठी म्हणून त्यांनी स्वराज्य निर्माण केलं नाही. तर देशातील सर्वधर्मीय जनतेचं म्हणजेच माणसांचं जगणं अधिक सुकर व्हावं, सहज व्हावं, त्याला समान न्याय मिळावा, त्याच्यावर अन्याय-अत्याचार होऊ नये, त्याला मोकळेपणाने, निर्भीडपणे जगता यावं म्हणून स्वराज्य निर्माण केलं. हिंदू धर्म वाढविण्यासाठी ते लढले असते तर ते फक्त परधर्मीयांशी म्हणजेच मोघल, इंग्रज, सिद्दी यांच्याशीच लढले असते. परधर्मातील शिवरायांनी पराभूत केलेल्या शत्रूंना जबरदस्ती हिंदू धर्मात घेतले असते. परंतु त्यांना सुरुवात आपल्या धर्मापासून करावी लागली. अनेक मराठ्यांशी त्यांना लढावं लागलं. राजपुतांशी लढावं लागलं. शिवराय धर्मांध असते तर औरंगजेब, अफजलखान, शाहिस्तेखान यांच्यासह ते सर्व परधर्मीय आहेत म्हणून लढले असते पण शिवराय या सर्वांशी लढले ते स्वराज्याचे शत्रू म्हणून. स्वराज्याचे शत्रू मग ते मोघल असो, इंग्रज असो, स्वतः चे नातेवाईक मराठे असो शिवराय त्यांच्याशी लढले.

माणूस जगला तरच तो धर्म टिकवू शकेल कारण माणसासाठी धर्म आहे धर्मासाठी माणूस नाही हे सूत्र शिवरायांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी आपल्या धर्मातील अनेक वाईट गोष्टींना विरोध केला. नुसताच विरोध केला नाही तर त्या गोष्टी आपल्या आचरणातूनच कायमच्या काढून टाकल्या. त्यांनी कधीच शुभ-अशुभ मानले नाही, शहाजीराजे वारल्यानंतर माँसाहेब जिजाऊंना सती जाऊ दिले नाही, आपल्या आयुष्यात आणि आपल्या सैन्यात कधीच जातीभेद-धर्मभेद पाळला नाही.
त्याचसोबत स्त्री मग ती शत्रूची सुद्धा का असो ना तिचा कायम सन्मान केला. तिला कधी अपशब्द बोलले नाहीत. आपल्या मुस्लिम मावळ्यांच्या प्रार्थनेकरितासुध्दा गडांवर मस्जिदी बांधल्या. स्वराज्याचा शत्रू म्हणून औरंगजेबाला नामोहरम केलं असेल, अफजलखान मारला असेल, शाहिस्तेखानाची बोटे कापली असतील परंतु मुस्लिम धर्मावर खोटे आरोप करत कधी शिव्या-शाप दिले नाहीत. मुस्लिमांना कधी परकं समजले नाहीत. स्वतःच्या सैन्यातही मुस्लिम सरदार ठेवले. स्वराज्यात हिंदूंसाठी वेगळा आणि मुस्लिमांसाठी वेगळा असा कायदा नव्हता. सर्वांसाठी समान न्याय होता.

अफजलखानाला मारल्यानंतर त्याच्यासोबतचे शत्रुत्व सुद्धा संपले असे म्हणून अफजलखानाची कबर बांधणारा माझा राजा होता. असा शत्रूंचाही सन्मान करणारा माझ्या राजांचा धर्म आहे. तोच माझा हिंदू धर्म आहे. हा छत्रपती शिवरायांचा हिंदू धर्म मी मानतो.जगात जो बौद्ध धर्म आहे त्यातही अनेक उणिवा-अंधश्रद्धा आहेत. म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यात कालसापेक्ष परिवर्तन करून ’बौद्ध धम्म’ निर्माण केला. कर्मकांडामध्ये गुंतून माझ्या लोकांची फसवणूक व्हायला नको म्हणून 22 प्रतिज्ञा लिहिल्या. ’बौद्ध धम्म’ बाबासाहेबांच्या कर्तृत्वामुळे मोठा झाला. कर्मठ हिंदूंनी बाबासाहेबांना दलितांना लाख त्रास दिला असेल परंतु बाबासाहेबांनी कधीच विरोधकांना शिव्या-शाप दिले नाहीत, खोटे-नाटे आरोप केले नाहीत, त्यांचा बदला घ्यायचा म्हणून त्यांच्याशी भांडत बसले नाहीत. माणसाला आधी माणूस समजणारा हा माझ्या बाबासाहेबांचा बौद्ध धम्म मी मानतो.

मी ज्या धर्मात जन्मलो तोच धर्म कसा श्रेष्ठ आणि महान हे समजण्यात आणि इतरांना समजावून सांगण्यातच माझं आयुष्य खर्ची पडत. आपलाच धर्म कसा सर्वात चांगला, सर्वसमावेशक, महान आहे ह्याच्याच सुरस कथा आपण बालपणापासून ऐकत आलो असतो. त्यात काही गोष्टी वाईट असू शकतात किंवा मानवी समाजासाठी हानिकारक असू शकतात हा विचारच आपल्या मनाला कधी शिवत नाही. धर्माची चिकित्सा करणे हे तर महापाप समजले जाते. परंतु मी ज्या धर्मात जन्माला आलोय, जो माझा हक्काचा धर्म आहे तो धर्म नेमका आहे काय? कशासाठी? त्यात काय चांगलं? काय वाईट? अशी चिकित्सा करण्याचा मलाच अधिकार नसेल तर मी का म्हणून त्याला आपला धर्म मानू? आणि मी जर एखाद्या धर्माला आपलं मानत असेल तर मी त्या धर्मातल्या वाईट गोष्टी काढून टाकून तो धर्म आणखी शुद्ध आणि चांगला करण्याचा प्रयत्न का करू नये?

मी बौद्ध असेल, मुस्लिम असेल, हिंदू असेल, शीख असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल पण त्या अगोदर मी एक माणूस आहे. धर्मात कुणी कोणते कपडे घातले, टिकली लावली की नाही? अमुक जयघोष दिला की नाही, अमुक मांस खातो की नाही यावरून धर्माच्या चौकटी आखल्या जात असतील तर आपण फार मोठी चूक करत आहोत. कारण सगळे धर्म हे मानवी जीवन अधिक सुकर, सहज बनविण्यासाठी निर्माण झालेले आहेत. ते अशा चौकटीत बांधून अधिक कठीण आणि किचकट बनविण्यासाठी निर्माण झालेले नाहीत. 20 लाख वर्षांपूर्वी 2 पायांचा माणूस या पृथ्वीतलावर चालायला लागला. आणि या जगातील कोणताही धर्म निर्माण झाला तो फक्त 5000 हजार वर्षांपूर्वी. म्हणजे 9 लाख 95 हजार वर्षे माणसाला धर्माची गरज वाटली नाही. म्हणजेच माणसानेच धर्म बनवला हे सिद्ध होते. त्यावेळी मनुष्याला निसर्गाबद्दल, सूर्य-चंद्र-तार्‍यांबद्दल, पृथ्वी आणि समुद्राबद्दल जे काही ज्ञान होतं त्या आधारावर त्याने धर्म बनवला. परंतु आता विज्ञानामुळे अनेक गोष्टिमंधील फोलपणा उघड झालाय आणि आपण ते बदल स्वीकारले आहेत. जसे सतीप्रथा बंद झाली, केशवपन बंद झालं, विधवा पुनर्विवाह सुरु झाले, हिंदू धर्मात समुद्र ओलांडणे निषिद्ध मानले आहे तरी आज लाखो हिंदू समुद्र पार करून विदेशात जातात परंतु ह्या सर्व गोष्टीमुळे कधीच काही वाईट झालं नाही. धर्म बुडाला नाही. उलट लोक मोकळे जगत आहेत, प्रगती करत आहेत.

एखाद्या परधर्मीयाने शिव्या-शाप दिल्याने, वाईट बोलल्याने धर्माची बदनामी होत नसते तर धर्मातील नागरिकांच्या- धार्मिक गुरु म्हणवून घेणार्‍यांच्या अनैतिक वागणुकीमुळे धर्माची बदनामी होत असते. धर्मातील लोक इतरांसोबत कसे वागतात? कसे बोलतात? यावरून त्या धर्माची प्रतिष्ठा ठरत असते. धर्म बदनाम कशाने होतो? धर्माचे नुकसान केव्हा होते? जेव्हा कुणी व्यक्ती त्या धर्माचा वापर करून लोकांना फसवते. फसवतांना ती व्यक्ती विचार करत नाही की ज्याची फसवणूक होत आहे ती आपल्या धर्माची आहे की दुसर्‍या धर्माची. त्यावेळी फसविणे हाच तिचा धर्म असतो. कोणता धर्म असं सांगतो की आपल्या किंवा इतर धर्मियांची पिळवणूक करा?मी जन्म जर एखाद्या धर्मात घेतला तर तिथे माझा नाईलाज होता. ते माझ्या हातात नव्हतं. आई-वडिलांचा धर्म नकळत मला चिकटला म्हणून काय कुणी जबरदस्ती करेल की तू आता असेच वागला पाहिजे? तु अमुकच कपडे घातले पाहिजेत?

तु अमुकच पदार्थ खाल्ले पाहीजेत? जी व्यक्ती ज्या धर्मात जन्मली त्या धर्मातील लहानपणापासुनचे त्या व्यक्तीवर झालेले संस्कार मग ते कपडे घालण्याबद्दल असो, भाषेबद्दल असो की खानपानाबद्दल ते बघुन आपण तीच्याशी मनात वैर ठेवत असू तर आपण खुप मोठी चुक करतोय. कुणाचीही जात-धर्म बघुन नाही तर त्याची वागणूक बघुन आपण आपलं मत बनविले पाहीजे. काही हिंदू मुस्लिमांबद्दल व्देष बाळगत असतील तर त्यांना माझा सवाल आहे की, तुमचे किती मुस्लिम मित्र आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही राहीलात, घरोब्याचे संबंध आहेत? असेच काही मुस्लिम हिंदूविषयी मनात शत्रुत्व ठेवत असतील अशा मुस्लिमांनाही माझा तोच सवाल आहे की तुमची कीती हिंदू लोकांशी घनिष्ठ मैत्री आहे? घरी जाणे-येणे आहे? रोज सोबत राहणे आहे? हा सवाल इतर धर्माबद्दल बोलणाऱ्या सर्वच धर्मियांना आहे.

मग एकमेंकांसोबत राहील्याशिवाय, एकमेकांना समजून घेतल्याशिवाय, एकमेकांची संस्कृती समजून घेतल्याशिवाय तुम्ही जर राजकारण्यांची वक्तव्ये, खोटा प्रचार गृहीत धरुन परस्परांविषयी मनात व्देष बाळगत असाल तर तुम्ही आपल्या व भावी पिढीला मोठी व्देषाची बिमारी देत आहात. आज धार्मिक व्देषामुळे देशाचे वातावरण गढूळ झाले आहे. असेच चालत राहीले तर लवकरच हे वातावरण इतके विषारी बनुन जाईल की कोणत्याही धर्माच्या माणसाला इथे श्वास घेणे कठीण होवून जाईल. राजकारणी लोक यावर कधीच उपाय शोधणार नाहीत. तो आपल्यालाच शोधावा लागणार आहे. आपण सर्वात आधी माणूस आहोत.कोणत्याच प्राण्याला नाही तो तल्लख मेंदू, विचार करण्याची शक्ती, खरं-खोटं तपासण्याची क्षमता आपल्याला मिळाली आहे आपण माणव जातीच्याच सुखाकरिता त्याचा वापर करुयात. कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक नेत्यांच्या वक्तव्याला न भुलता प्रत्येक गोष्टीचा सद्सद्विवेकबुध्दीने विचार करुयात. कोणतीही व्यक्ती हिंदू किंवा मुस्लिम शिख, इसाई असण्या अगोदर तो माणूस आहे हे लक्षात ठेवूयात. या दिवाळीपासुन आपल्या देशाला लागलेल्या धार्मिक व्देशाच्या रोगाचं दिवाळं काढूयात. शेवटी माणसासाठी धर्म की धर्मासाठी माणूस हे सूत्र ज्याला कळलं तो या जगातला सुखी माणूस.

✒️चंद्रकांत झटाले,अकोला(मो:-९८२२९९२६६६)

धार्मिक , महाराष्ट्र, लाइफस्टाइल, लेख, सामाजिक , सांस्कृतिक
©️ALL RIGHT RESERVED