भारत देशाचा जयकारा: वन्दे मातरम्!

29

(वन्दे मातरम् जन्मदिन विशेष)

वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार ‘राष्ट्रीय गीत’ म्हणून दर्जा प्राप्त झाला आहे. हे गीत कविश्रेष्ठ बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचले आहे. इ.स.१८८२मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीमध्ये हे गीत लिहिले आणि तेच भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रेरणागीत बनले. या गीताला कविवर्य गुरूदेव रवींद्रनाथजी टागोर यांनी संगीत दिले आहे. नागरिकांंच्या मनमंदिरात भारत देशाविषयी भक्ती, प्रेम आणि अभिमान जागविणारा श्रीकृष्णदास (बापू) निरंकारीजी यांचा हा वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील लेख वाचकांच्या सेवेत… संपादक.

“वन्दे मातरम्, सुजलां सुफलाम्!
मलयजशीतलाम्, शस्यश्यामलाम् मातरम्।”

कोलकाता विश्वविद्यालयाच्या स्थापनेनंतर सुरुवातीच्या काळात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी या विद्यापीठातून बीएची पदवी प्राप्त केली. इंग्रज सरकारने त्यांची नियुक्ती कलकत्त्याचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून केली. नंतर ते कलकत्त्याचेच डिस्ट्रिक्ट कलेक्टर झाले. ते प्रखर देशभक्त होते. त्यांना मागील शतकातील संन्याशांचे बंड आणि १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध यांचे फार आकर्षण होते. त्याच साली इंग्रज सरकारने ‘गॉड सेव्ह दी क्वीन’ हे ब्रिटिशांचे राष्ट्रगीत भारतात रुजू करण्याचा प्रयत्‍न केला. त्यांचे ते राष्ट्रगीत भारताचेही राष्ट्रगीत आहे, अशी वातावरण निर्मिती करण्याकरिता कार्यक्रमात, सैन्यात आणि शाळांमध्ये त्यांनी ते गीत रुजवण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे बंकिमचंद्र खुप संतप्त झाले. सन् १८७६चा तो काळ होता. भारतीय लोक या ब्रिटिश राष्ट्रगीताचा तिरस्कार करीत होते. बंकिमचंद्रांनी या विषयावर गहन विचार केला. त्यांच्या लक्षात आले, की गेल्या हजार वर्षांच्या गुलामगिरीमुळे भारत हा कधीच अखंड असा देश नव्हता आणि भारताचे कोणतेही राष्ट्रगीत नव्हते. म्हणून दि.७ नोव्हेंबर १८७६ रोजी त्यांनी देशभक्तीच्या भावनांनी ओथंबलेले, भारत देशाला मातृभूमी असे संबोधित करणारे आणि तिला नमन करणारे ‘वन्दे मातरम्’ हे सहा कडव्यांचे गीत लिहिले. आपल्या मित्रांना हे गीत वाचून दाखवल्यावर ते म्हणाले की, हे भारतीयांचे खरे राष्ट्रगीत असले पाहिजे. त्यांनी मागील शतकातील ‘संन्याशांचे बंड’ या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘आनंदमठ’ ही कादंबरी इ.स. १८८२ साली लिहिली. त्यांनी या कादंबरीत वंदे मातरम् हे गीत समाविष्ट केले होते. या कादंबरीत देशभक्त संन्यासी लोक ‘वन्दे मातरम्’ हे गीत सामूहिकपणे गाताना दाखवले आहे.

“शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीम्! फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीम्!
सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्, सुखदां वरदां मातरम्॥१॥”

भारताचा स्वातंत्र्य लढा १८५७च्या सशस्त्र क्रांतीपासून सुरू झाला. हा लढा यशस्वी झाला नसला, तरी याने पेटवलेली स्वातंत्र्याची मशाल पुढे अखंडितपणे निरनिराळ्या रूपांत प्रकट होत राहिली. बंगाल, महाराष्ट्र आणि पंजाब हे सशस्त्र क्रांतीचे केंद्र बनले. सुखदेव, भगतसिंंग, चंद्रशेखर आझाद, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या झपाटलेल्या क्रांतिवीरांनी इंग्रजांविरुद्ध ही क्रांतीची मशाल तेवत ठेवली. परंतु ही क्रांती वैयक्तिक पातळीवर किवा छोट्या समूहापर्यंत मर्यादित होती. सन १८७०च्या दशकात एका वेगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या म्हणजे सन १८८५ पूर्वीचा तो काळ होता. इंग्रजांचे कुटिल कारस्थान आणि जुलमी राजवटीमुळे भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची भावना जागृत होऊ लागली. अशा या वातावरणात ‘वन्दे मातरम्’ या गीताचा जन्म झाला.

“कोटि कोटि-कण्ठ कल-कल निनाद कराले!
कोटि-कोटि भुजैर्धृत-खर करवाले!
अबला केन मा एत बले!
बहुबलधारिणीं नमामि तारिणीं!
रिपुदलवारिणीं मातरम्॥२॥”

चॅटर्जींच्या आनंदमठ या कादंबरीला अभूतपूर्व यश मिळाले व ही कादंबरी खूप लोकप्रिय झाली. त्यामुळे वन्दे मातरम् हे देशभक्तीचे अप्रतिम गीत लोकांपर्यंत पोहोचले आणि या गीताला खूप लोकप्रियता सुद्धा मिळाली. इ.स.१८९६ साली काँग्रेसच्या कोलकाता येथील राष्ट्रीय अधिवेशनात गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गाऊन संपूर्ण अधिवेशन राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून टाकले होते. पुढे १९०१मध्ये पुन्हा काँग्रेसचे अधिवेशन तेथेच झाले असताना या अधिवेशनात श्री दखिना चरण सेन यांनी या गीताचा सामूहिक अभ्यास करून घेतला. चार वर्षांनी इंग्रज सरकारने या गीतावर बंदी आणली. तरीसुद्धा बनारस येथील काँग्रेस अधिवेशनात गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांची पुतणी श्रीमती सरलादेवी यांनी हे गीत गायले. त्याच साली इंग्रजांनी बंगालचे विभाजन केले. ही घटना ‘वंग-भंग चळवळ’ या नावाने इतिहासात नमूद आहे. वंग-भंगच्या विरोधात झालेल्या प्रचंड आंदोलनात वंदे मातरम् हे गीत प्रेरणादायी ठरले. त्यावेळी हिदू-मुस्लिम सर्वांनी त्याचे गायन केले. सर्वांनी एकजुटीने केलेल्या या उग्र आंदोलनामुळे इंग्रज सरकार हादरले आणि त्यांना बंगालची फाळणी रद्द करावी लागली.

“तुमि विद्या, तुमि धर्म! तुमि हृदि, तुमि मर्म! त्वम् हि प्राणा: शरीरे!
बाहुते तुमि मा शक्ति! हृदये तुमि मा भक्ति! तोमारई प्रतिमा गडी मन्दिरे-मन्दिरे॥३॥”

वन्दे मातरम् हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा बीजमंत्र होता. लाला लजपतराय यांनी त्या काळात लाहोरहून एक पाक्षिक काढले, त्याचे नाव होते ‘वन्दे मातरम्!’ हिरालाल जैन यांनी सन १९०५मध्ये भारतातील पहिला राजकीय चित्रपट बनवला व त्याचा शेवट वंदे मातरम् या गीताने केला. इ.स.१९१५पासून काँग्रेसच्या प्रत्येक राष्ट्रीय अधिवेशनात नियमितपणे आग्रहपूर्वक वन्दे मातरमचे गायन होऊ लागले. त्यावेळी ते इस्लामविरोधी नव्हते की जातीयही नव्हते. हिदू-मुस्लिम सर्वजण सारखेच वंदे मातरम्‌चा जयघोष करीत होते. अनेक क्रांतिकारक इंग्रजांचे अत्याचार सहन करत व वन्दे मातरमचा जयघोष करत फासावर गेले. स्वातंत्र्य आंदोलनात हा अतिशय लोकप्रिय असा जयघोष होता. कोणत्याही मोर्चामध्ये ‘भारत माता की जय’ आणि ‘वन्दे मातरम्’ हे जयघोष असायचे. सन १९२१मध्ये काँग्रेसने खिलाफत आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर मुस्लिम समाजातील धर्मांध व कट्टरतावादी लोकांचे महत्त्व वाढले. याबरोबरच वन्दे मातरम्‌ला इस्लामविरोधी आणि जातीय ठरवून त्याचा विरोध सुरू झाला. सन १९२३मध्ये काकीनाडा येथे झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात तत्कालीन अध्यक्ष महंमद अली यांनी या गीतात मूर्तिपूजा असल्यामुळे याला इस्लामविरोधी घोषित केले. मुस्लिमांच्या कट्टर व जातीय नेतृत्वापुढे झुकत काँग्रेसने आपल्या अधिवेशनात त्याचे गायन करण्याचा आग्रह सोडून दिला.

“त्वम् हि दुर्गा दशप्रहरणधारिणी! कमला कमलदलविहारिणी! वाणी विद्यादायिनी!
नमामि त्वाम् नमामि कमलाम्! अमलां अतुलाम्! सुजलां सुफलाम् मातरम्॥४॥”

सन १९३७मध्ये राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसने प्रतिपादन केले, की त्याच्या सहा कडव्यांपैकी पहिल्या दोन कडव्यांमध्ये देशाला मातृभूमी म्हणत देशाच्या सृष्टिसौंदर्याचे वर्णन केले असल्यामुळे त्यात मूर्तिपूजेचा काहीही संबंध येत नाही. परंतु शेवटच्या चार कडव्यांमध्ये काही ठिकाणी मातृभूमीचे हिदूंची देवी दुर्गेच्या रूपात वर्णन केले आहे. म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने वंदे मातरम् गीताच्या पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रीय गीत म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला व तो मंजूर पण झाला. परंतु सन १९४७मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस प्रणीत भारत सरकारने फक्त ‘जन गण मन’ या गीतालाच राष्ट्रगीत म्हणून घोषित केले. वन्दे मातरम्‌ची अवहेलना करणारी ही गोष्ट अनेक नेत्यांना पटली नाही. घटना समिती गठित झाल्यावर त्याला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यावर अनेकदा चर्चा झाली. अखेर घटना समितीचे अध्यक्ष देशभक्त डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी घटना लागू होण्याच्या दोन दिवसापूर्वी दि.२४ जानेवारी १९५०ला घटना समितीत हा ठराव मान्य करवून घेतला.

अशा प्रकारे वन्दे मातरम्‌ला राष्ट्रगानचा दर्जा मिळाला. दि.७ सप्टेंबर १९८१ला या राष्ट्रीय गीताची शताब्दी संपूर्ण देशात उत्साहात साजरी करण्यात आली. दि.७ सप्टेंबर २००६मध्ये या गीताला १२५ वर्षे झाल्याबद्दल त्याचा शतकोत्तरी रौप्य महोत्सवाचे समारंभ झाले. दि.२२ ऑगस्ट २००६ रोजी युपीए सरकारने संसदेत घोषणा केली, की शाळांमध्ये ७ सप्टेंबर रोजी वंदे मातरम् हे राष्ट्रगान गायन ऐच्छिक राहील. भारतीय जनता पार्टीने शाळांमधून हे राष्ट्रीय गीत म्हणणे अनिवार्य केले पाहिजे, अशी जोरकस मागणी केली. परंतु युपीए सरकारने ही मागणी मान्य केली नाही. या दिवशी देशभरातील शाळांमध्ये हे गीत अतिशय उत्साहाने गायिले गेले आणि अनेक मुस्लिम संस्थांनी याला समर्थनही दिले, हे उल्लेखनीयच!

“वन्दे मातरम् श्यामलाम् सरलाम्!
सुस्मिताम् भूषिताम् !धरणीं भरणीं मातरम्॥५॥”
!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे वन्दे मातरम् जन्मदिनाच्या निमित्ताने समस्त भारतीय बांधवाना अखंड देशभक्तीस प्रेरणादायी हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️संकलन व शब्दांकन:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.
(भारताच्या वैभवशाली इतिहासाचे गाढे अभ्यासक व विश्लेषक.)मु. एकता चौक, रामनगर वॉर्ड नं.२०, गडचिरोली.ता. जि. गडचिरोली.मोबा. ७७७५०४१०८६.
इमेल- krishnadas.nirankari@gmail.com