कुशल बनविणारे शिक्षण हवे !

आज भारतापुढे अनेक ज्वलंत प्रश्न उभे ठाकले आहेत. त्यातील बेरोजगारी दारिद्री हा अतिशय बिकट आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. उघड बेरोजगारी…… सलणारी बेरोजगारी….. छुपी बेरोजगारी अशा भयाण रुपात या देशात ठाण मांडून बसली आहे. देशाच्या, राज्याच्या सरकार समोर बेरोजगारी अनेक समस्यांना जन्म देत आहे. अनेक वर्षापासून तांडवनृत्य करीत आहे ही बेरोजगारी…… या बेरोजगारीने सामाजिक शांती गिळंकृत करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे असंख्य तरुणांचे जीवन दिशाहीन झाले आहेत. या बेरोजगारीमुळे आज गुन्हेगारी वाढत आहे. अनेक समस्यांची जननी आहे ही बेरोजगारी….. कुटुंबात बेरोजगारीमुळे आर्थिक दारिद्र्य आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष जीवघेणा आहे. ह्या बेरोजगारीचा प्रश्न देशपातळीवर सोडविण्याचा प्रयत्न आज सरकारला करायला हवाय. आज कुटुंबातील असंख्य युवक-युवती स्वतःचेच वितभर पोट भरण्यासाठी असमर्थ आहेत. तर ते आज कुटुंबातील आई – वडील, म्हातारी आजी – आजोबा, बहिण भाऊ, मुलं-बाळं यांची ते काय काळजी घेणार…….

आज या देशात बेरोजगारी गरिबी, दारिद्र्य, गुन्हेगारी इतकी फोफावत चालली आहे की, ते मला सांगायची गरजच नाही. जळी स्थळी ती दिसतेच आहे. तुमच्या मांडीवरचा त्या गोंडस कोमल फुलाला कुरवाळताना तुमच्या मनात कधी त्याच्या भविष्याचा विचार येत नाही का ? समाजाची परिस्थिती बदलली नाही तर काय असेल त्याच्या भविष्यात ? त्याच्या, तुमच्या छोट्या बहिणीच्या आणि आजूबाजूच्या सगळ्या पोरांच्या ? तुमच्या आमच्या मुलानेही आपल्यासारखेच मरेस्तोवर राबावे असे तुम्हाला वाटते का ? रोज उठून भाकरी कशी मिळवायची एवढी एकच चिंता त्याच्या मनात कुरतडत असावी आणि दारूच्या याशिवाय दुसरा कोणताही आनंद त्याच्या जीवनात असूच नये ? तुमच्या पतीने, मुलांनी त्या बापाच्या पैशावर माज करणाऱ्या मालकाच्या पोराच्या दयेवर जगत राहावे असे तुम्हाला वाटते का ? तुमचा नवरा आणि मुलगा नेहमीच मालकांचा गुलाम बनवून राहावेत, आणि मालकाने त्यांना पिळून काढावे.

गटारातल्या यापेक्षा त्याची जास्त लायकी समजू नये, अशी इच्छा आहे का ? ही राजकीय पुढारी आश्वासने देतात की, आम्ही सत्तेत आलो की, सारी व्यवस्थाच उलटवून टाकू, बदलून टाकू. प्रचारातील ही पोकळ आश्वासने या देशातील तरुणांना दिशाहीन बनवीत आहेत. राजकारणी नेत्यांनो जनतेच्या भावनांशी खेळाल पण ते किती वेळ ? सरकार बेरोजगारीच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहतो हा मुख्य प्रश्न आहे.आज बेरोजगारीने तरुण वर्ग त्रस्त आहे आणि कित्येक जण बेरोजगारीला कंटाळून जीवन संपवीत आहेत. ते आपण वर्तमानपत्रातून वाचत असतो. तेव्हा तुमचा उर भरुन येतही असेल. तुमच्या वस्तीत येऊन तुम्हाला अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचे आव्हान करणाऱ्या तरुण मुला मुललींना पाहून तुम्हाला आपली मुलगा मुलगी त्या जागी दिसू लागताच ना ?

सगळेजण एकत्र येऊन सगळ्या बरोबर काम करीत आपल्या श्रमाचा, सृजनशीलतेचा संपूर्ण आनंद उपभोगाल…. आपल्या सगळ्या क्षमतांचा पुरेपूर वापर करून विकास करून माणसासारखे जगायला लागतील. सुखी होती म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन या अन्यायाविरुद्ध बेरोजगारी दारिद्र्य विरुद्ध सरकारला जाब विचारायला पाहिजे. आता कोणी असे म्हणतील की आपण खूप थोडे आहोत. इतके मोठे काम करण्यासाठी अगदीच कमजोर आहोत. पण अन्याय सहन करणारे आपल्यासारखेच किती लोक असतील.
राजकारणी नेत्यांनी संसद अधिवेशनात महत्त्वाचे न ठरणारे, प्रश्न हाताळत बसून नुसते हात शेकू नये. तर देशातील बेरोजगारी सारख्या गंभीर प्रश्नाला हात घालून तो सोडविण्याचा प्रयत्न करावा. यासाठी आमच्या शिक्षण पद्धतीत योग्य तो बदल घडवून पोट भरणारे…. हाताला कुशल बनविणारे….. शिक्षण समाजातील रुजवायला हवे ! चाकरीवर भाकरी मिळवण्याची प्रवृत्ती बनवण्यापेक्षा….स्वतःची भाकरी स्वतः निर्माण करण्याची धमक युवकांमध्ये निर्माण करणारे शिक्षण जोवर आम्हाला देता येणार नाही, तोवर गावागावातून गल्लीबोळातून बेरोजगारांचे लोंढे वाढतच राहणार आहेत. यावर मात्र राज्यकर्ते आश्‍वासनांची खैरात वाटून स्वतःची पाठ थोपटून घेतील. याशिवाय दुसरे काय करणार आहेत ? देशात बेरोजगारी, गरिबी, दारिद्र्यी, महागाई प्रचंड प्रमाणात फोफावत आहे. पण याकडे कुणाचं लक्ष नाही.

या देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत. पण त्यावर काही उपाय शोधणार नसू तर त्याच्या कधीतरी मोठा स्पोर्ट सामाजिक समीक्षेच्या रूपाने होईल. प्रत्येकाला पोट आहे आणि ते वीतभर पोट जगण्यासाठी पैसा आणि हाताला काम हवे ! हा पैसा मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या तरुण-तरुणींच्या हातांना काम हवे. परंतु हे कामच आम्हाला मिळाले नाही तर आम्ही आमचे, आमच्या कुटुंबाचे पोट भरायचं कसं ? दुर्दैवाने शाळा – कॉलेजमधून बेरोजगारांचे लोंढेच लोंढे बाहेर पडत आहेत. पोट भरलेले असेल तर असंख्य उपाय सुचतात. पण उपाशीपोटी व्याकुळता वाढते आणि भुकेमुळे मानव हतबल होतो. निराश होतो. व्याकुळतेमुळे अत्याचार, अविचार घडतात, जीवन बेताल होतं. मनुष्य बेभान दिशाहीन होत असतो. अशा घडीला देशाचे नेतृत्व करणार्‍या व राज्याचे नेतृत्व नेतृत्व करणार्‍या सरकारचे कर्तव्य ठरते की, शांत चित्ताने विचार करून देशातील दारिद्री, गरीबी, महागाई, बेरोजगारी सारखे अति ज्वलंत प्रश्न सोडवावे. केवळ चर्चा करून आणि आश्वासनांची खैरात वाटून पोटातील आगडोंब विझवता येणार नाही. यापेक्षा ठोस कृतीला हात घालावा. चर्चेतून, वर्तमानपत्रातून महागाई, दारिद्र्यी, गरिबी, बेरोजगारीबद्दल खूप कळवळून बोलले जाते. पण या वांझोट्या चर्चेने गरिबांचे पोट भरते का ? फक्त चर्चा करुन आश्वासने देऊन “गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा” केल्यागत स्थिती आहे सरकारची….. बेरोजगारीबद्दल लवकरात लवकर दूरगामी उपाय शोधायला हवे. बेरोजगारीचा प्रश्न लवकर सोडविण्यात यावा. कारण ही अनेक समस्यांची जननी आहे….! हीच बेरोजगारी झोंबते आहे आमच्या जिवारी….!

✒️अंगुलिमाल मायाबाई उराडे(मु. पोष्ट-बेंबाळ,ता.-मुल , जिल्हा:- चंद्रपूर)मो. 9689058439

महाराष्ट्र, लेख, शैक्षणिक, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED