दिवाळी गरीब श्रीमंतांची?

संघटित कामगारांचे सर्वच ठिकाणी बोनस किती भेटला व किती भेटला पाहिजे यांवर चर्चा सुरू आहे,ज्यांना जेवढा मिळाला तेवढयात ते समाधानी नाही, तर ज्यांना काहीच भेटला नाही,काही तरी मिळावा म्हणून आंदोलनांची धमकी देतात,त्यामुळेच काही कामगारांना दिवाळीच्या दोन तीन महिने अगोदरच कामावरून कमी करण्यात आले. ते म्हणतात साहेब बोनस देऊ नका,पण कामावरून कमी करू नका आमच्या कुटूंबाची दिवाळी अंधारात जाईल. यासाठी अनेक शासकीय अधिकारी वर्गाच्या पाया पडून सामाजिक बांधिलकी ठेऊन न्याय मिळवून देण्यासाठी विनंती अर्ज करतात.तरी हा दिवाळी सण सर्वच जातीचा मोठा सण आहे,अशीही दिवाळी गरीब श्रीमंताची
सणांचा राजा असा दीपोत्सव एकादशी,वसुबारस,धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी,लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव. ही दीपावली हजारो वर्षांपासून गरीबाच्या जीवनात आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश का देत नाही?.

गरिबांनी मनोभावे लक्ष्मी पूजन केले तरी ती त्यांना प्रसन्न होत नाही, श्रीमंतांनी गरिबांचे उगड उघड शोषण करून ही लक्ष्मीची पूजा केली नाही तरी ती त्याला कशी प्रसन्न होते हे आम्हाला कधीच समजले नाही.इमानदारीने कष्टाची कामे करणाऱ्यांना लक्ष्मी प्रसन्न होत नाही.पण दारू विकणाऱ्यांना बियरबार वाल्यांना,बिल्डर,ठेकेदार,भ्रष्टाचारी अधिकारी,कर्मचारी यांना प्रसन्न होतांना कोणतीच गुणवंता पाहिली जात नाही.म्हणूनच गरीब श्रीमंतांची परिस्थिती नजरे खालून घालावी.सोन्याचे अंडे देणाऱ्या मुंबईत एक ठेकेदार म्हणतो सुरमाई साडे सातशे रुपयाला मिळते.पापलेट तेराशे रुपयांना.मटण आठशे रुपयांना,चिकन अडीचशे रुपयाला मिळते.आज काय घ्यावे? याचा विचार करत लिंबाखाली बसलो. तोच एका कामगाराचा फोन आला. म्हणाला, ‘साहेब जरा पैशांची नड होती.मी म्हणलं ‘हा, संध्याकाळी बघू.’ ‘होय साहेब’ म्हणत त्यानं फोन ठेवला.दुपारी अठ्ठावण्ण रुपये लीटरची चितळे दुधाची पिशवी, दीडशे रुपयांचा श्रीखंडाचा डबा आणि पासष्ट रुपयांची लोणच्याची पुडी घेऊन घरी गेलो. घरात गेल्या गेल्या बायकोनं ऑनलाईन मागवलेल्या तीन साड्या दाखवल्या. प्रत्येक साडी साडेसातशे रुपयांची होती. साड्या बघतानाच पुन्हा त्या कामगाराचा फोन आला. म्हणाला, ‘सायेब आत्ता जमलं का भेटायला? वैतागत म्हणालो, ‘अरे बाबा आत्ता लय उन आहे. मी येतो की संध्याकाळी.

’केविलवान्या आवाजात तो म्हणाला, ‘साहेब मी आलोय, चालत चौकापर्यंत.’ मला धक्काच बसला. म्हणालो, ‘अरे तु एवढ्या उन्हात दोन किलोमीटर चालत आलाय? खुपच गरज आहे का पैशांची?’ हतबल होत म्हणाला, ‘होय साहेब’ भुवयांचा आकडा करत म्हणालो, ‘किती पैशे पाहिजेत?’ तसा दबक्या आवाजात म्हणाला, ‘शंभर रुपये पायजे होते साहेब.’‘थांब थांब आलो मी.’ असं म्हणत गाडी चालू करुन चौकात गेलो. मला पाहताच त्यानं काळपट तोंडावरचा घाम पुसला. आदबीनं हसला. म्हणालो, “काय रे कशाला एवढे अर्जंट पैसे पायजे होते? सासऱ्याना दारू पाहिजे का मेहुणा हारला जुगारात?.तसा तो उसणं हसू तोंडावर आणत म्हणाला, ‘साहेब तीन दिवस झालं हाजरीच नाय मिळाली. काल दळण टाकलय हितल्या गिरणीत. ते आणाय पैशेच नाय. रात्रीचे पाव खाल्ले पोरींनी. पण आता भुक लागली म्हणून रडाय लागल्यात. म्हणून मग तुम्हाला फोन केला. ’याची एक पोरगी दोन वर्षांची, दुसरी तीन महिन्याची. दीर्घ उसासा घेत मी त्याच्या हातात शंभरच्या दोन नोटा टेकवल्या. तसा हसत म्हणाला, ‘एवढे नको साहेब. शंभर बास होत्यान. पगार झाल्यावर तुम्हाला वापस करीन.’त्याच्या उत्तरांनी तोंडातली थुंकीच सुकली.

दोन्ही हात जोडून नमस्कार करत तो गिरणीच्या दिशेनं चालत निघाला.माझ्या घरातले मासे, श्रीखंड, दुध, लोणचं सगळं बेचव करीत तो बाजरीच पीठ आणायला निघाला होता.माझी बायको दोन अडीच हजारच्या साडया पाहुन जेवढी खुश झाली, त्याहुन जास्त खुश याची बायको होणार होती कारण तीच्या लेकरांना भाकरी मिळणार होती.निशब्द. वाचकांनो सगळ्या गोष्टींचं सोंग करता येतं, पण पैशाचं व पोटाच सोंग नाही करता येत. आपल्यापैकी बरेच लोकं चांगल्या नोकरीला आहेत. सुरक्षित नोकरी करून सुरक्षित ठिकाणी राहतात. त्यामुळेच आर्थिक परिस्थिती कुटुंबाच्या सर्व गरजा सर्वोपरी पूर्ण केल्या जातात. पण काबाड कष्टकऱ्यांना ५०-१०० रूपये देताना हात आखडू नका. आज मजुरांचे दिवस वाईट आहेत. बऱ्याच लोकांवर कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे नोकरी गमवावी लागली.त्या कुटुंबावर खरोखर कठीण प्रसंग आला आहे. कष्ट करणाऱ्या गोर-गरीब जनतेला सध्या आपल्या मदतीची गरज आहे, शक्य तेवढ्यांना शक्यती मदत करावी. दिवाळी कोणाच्या घरात कशी साजरी होत आहे ती सामाजिक बांधिलकी म्हणून थोडे लक्ष द्यावे.

श्रीमंतांची पोर मोठं मोठे फटाके,बॉम्ब उडवतांना पाहून गरिबांची मुलं तोंड वासून कौतुकाने पाहतात.पांच दहा हजार रुपयांची फटाके वीस मिनिटांत फोडून त्यांना कोणता आनंद उपभोगता हे त्यांनाच माहीत.बारा तास अंग मेहनतीचे काम केल्यावर किती मजुरी मिळते त्यांनाच पैशाची खरी किंमत कळते,त्यामुळेच ते असे फटाके बॉम्ब फोडू शकत नाहीत,दुसरी परंपरा म्हणून घराबाहेर दिवे लावल्यानंतर आपल्या जीवनात प्रकाश आला नाही.आणि येणारही नाही.तसेच आपल्या जीवनात झगमगाटही येणार नाही.आपल्या जीवनात प्रकाश तेंव्हा येईल जेंव्हा आपल्या आतील दिवा पेटेल. तेंव्हाच आपले जीवन प्रकाशमय होईल. आणि दुसरे असे की, घराचे दरवाजे उघडे ठेवल्याने धन मिळणार नाही,परंतु मनाचे दरवाजे उघडल्यावर खजाना निश्चित मिळणार आहे.म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितले आहे.”अत्त दिप भव” म्हणजे स्वयं प्रकाशीत व्हा.दिवे कंदील लावून आर्थिक परिस्थिती सुधारणार असेल तर गरीब लोक दिसलेच नसते.गरीब गरीब झाले नसते आणि गरिबाचे शोषण करून श्रीमंत श्रीमंत झालेच नसते.दिवाळी ही सर्वच जाती धर्माचे लोक पारंपारिक पद्धतीने साजरी करतात.

एकादशी,वसुबारस,धनत्रयोदशी,नरकचतुर्दशी,लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर चालणाऱ्या सणाचा एकमेकाशी कोणता संबध आहे याचा इतिहास वाचण्याची कोणीच तसदी घेत नाही.त्यामुळेच सर्वच समाजाचे लोक पारंपारिक पद्धतीने दिवाळी साजरी करतात.

✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप मुंबई)मो:-९९२०४०३८५९

महाराष्ट्र, मुंबई, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED