आंबेडकरी चळवळ : धगधगती क्रांतिज्वाला

43

संविधानाच्या सत्यनिष्ठेने
सारे गगन भेदून जाऊ.
आंबेडकरांच्या ज्ञानक्रांतीने
चळवळीला नवी ऊर्जा देऊ…

जगामध्ये अनेक क्रांत्या झाल्या त्याच क्रांतीच्या बळावर जगात नवीन स्थित्यंतरे घडून आली .जगातील मानव हा समान असून सर्व मानवाचे हक्क समान आहेत. ही विचारगर्भीता प्रबोधन युगापासुन निर्माण झाली. भारतीय समाजव्यवस्था व राज्यव्यवस्था मनूकपटाच्या विकृतीने ग्रासली होती. मानवाचे हक्क व माणूसपण नाकारणारी या व्यवस्थेने भारतीय माणसांना गुलाम केले होते. या गुलामीचे जोखंड झुगारून देण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी क्रांतिकारी लढा दिला. त्यातून देशात नवे परिवर्तनशील वैचारिक महामंथन घडून आले. या वैचारिक महामंथनातून आंबेडकरी विचारांच्या ज्ञानक्रांतीने आंबेडकरी चळवळ नव्या क्रांतीयुद्धासाठी सज्ज झाली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो अथक संघर्ष केला त्याला जगात तोड नाही .विद्येच्या बळावर आपण किती महानक्रांती करू शकतो यांचे वास्तववादी उदाहरण म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली महानक्रांती होय. त्यांनी केलेला महाड चवदार तळे सत्याग्रह, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकार्य, गोलमेज परिषदेतील प्रभावी मांडणी, स्वतंत्र मजूर पक्ष ,मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत अशी पत्रकारिता, वैचारिक व संशोधनात्मक लेखन, ग्रंथनिर्मिती, जाती व्यवस्थेवरील मूलगामी संशोधन, नवीन शैक्षणिक क्रांती, शेतकरी ,कामगार व स्त्री यांच्या जीवनाला दिले बळ, भारतीय संविधान निर्माता, बुद्ध धम्माचा स्वीकार, शेड्युल कास्ट फेडरेशन आणि कायदा मंत्रीपदावर असताना त्यांनी केलेले आमूलाग्र परिवर्तन यातून नवीन ध्येय व नवीन दृष्टी भारताला मिळाली .या क्रांती तेजाने आंबेडकरी चळवळ नवा आविष्कार घडवत होती. राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात आंबेडकरी चळवळीने नवा जोश निर्माण केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका ! संघटित व्हा !! संघर्ष करा !!! या मूलमंत्राने बौद्ध बांधवांनी अभूतपूर्व अशी वैचारिक ,शैक्षणिक व वाड़्:मयीन झेप घेतली तिला जगात तोड नाही. देशातील प्रस्थापित मंडळी फक्त आंबेडकरवादी विचारायला घाबरतात. या चळवळीचे शक्तीस्थान म्हणजे वेदना, विद्रोह व नकार हा होय. मूलतत्त्ववादी विचारांना मुळासकट उपटून फेकणे हा त्यांचा पण आहे. लोकशाही मूल्यांचा उपयोग करून नवा समतामूलक समाज निर्माण करणे. नवा भारत देश बनविण्यासाठी आंबेडकरी चळवळ अत्यंत महत्त्वाची काम करत आहे .

धगधगणाऱ्या क्रांतीनिखा-यातून
झेप घ्या रे फिनिक्सवीरांनो.
फसव्या काजव्यांच्या कर्दनकाळाचा
वेध घ्या रे क्रांतीवीरांनो….

आंबेडकरी विचार प्रवाहतूनच नव्या संघटना निर्माण झाल्या. आंबेडकरवादी साहित्याने मराठी साहित्याला जागतिक परीप्रेक्षाच्या शिखरावर नेले. जीवनवादी वास्तवगर्भी लेखनातून माणसाचे होणारे शोषण अन्याय ,अत्याचार यावर ताशेरे ओढले. नवा मूल्यवर्धक समाज तयार केला .राजकीय क्रांतीला नवा आयाम दिला. आंबेडकरी चळवळीतून समाजउत्थानाचा नवा बदल होत असताना आंबेडकरी चळवळीमध्ये शिरलेल्या मी पणाच्या अहंकाराने आज आंबेडकरी चळवळीची दशा व दिशा अत्यंत शोचनीय बनली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संदेशाला विसरून स्वार्थ हित पाहणारी मंडळी राजकारणात, समाजकारणात ,साहित्यिकारणात, धम्मकारणातत असल्याने आंबेडकरी चळवळीचे मोठे वाटोळे झाले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे अनेक गट तयार झाले आहेत. भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल ,आंबेडकरवादी साहित्य यामध्ये गटागटाचे राजकारण शिरल्याने आंबेडकरी चळवळीची दिशा भरकटली दिसते. ज्या समाजव्यवस्थेला उलथवण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रक्ताचे पाणी केले. रणसंग्राम लढले. त्याच व्यवस्थेला संजीवनी देण्याचे काम अनेक महाभाग करताना दिसत आहेत. आजचा आंबेडकरी तरुण व चळवळीपासून दूर जात आहे. चंगळवाद व चंदेरीदुनियेचा दिवास्वप्न तो वावरत आहे .बावीस प्रतिज्ञाच्या विरोधी वागत आहे. आपली झोपडी सोडून दुसऱ्याच्या राजमहालात जात आहे. ही अत्यंत क्लेशदायक घटना आहे . डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या वैभवाला नेस्तनाबूत करण्यासाठी प्रस्थापित लोक डाव टाकत आहेत. त्या डावात काही स्वार्थी व्यक्ती जात आहेत.

आज आंबेडकरी चळवळीला चिंतनात्मक विचारांची गरज आहे. आपण कुठे चुकलो त्यांचे आत्मनिरीक्षण करायचे आहे. समाजामधील होणाऱ्या अन्याय अत्याचारावर पेटून उठायचे आहे. आपण व आपला परिवार इतके विश्व न पाहता भारत देशातील इतर समुहातील आंबेडकरवादी व्यक्ती आपला बंधू आहे. त्यांच्या दुःखात सहभागी होणे, त्याला सहकार्य करणे हेच आपले परम कर्तव्य आहे. देशातील राजकारणाची व समाजकारणाची दिशा ओळखून नवा आकृतीबंध तयार करून समदुःखी लोकांना सोबत घेऊन नवे आयुध निर्माण करणे ही काळाची गरज आहे. तेव्हाच आंबेडकर चळवळीला सोन्याचे दिवस येतील. बुद्धधम्माच्या क्रांतीगर्भातच मानवमुक्तीचा नवा प्रबुद्ध भारत निर्माण होईल. आंबेडकरी चळवळ म्हणजे धगधगती क्रांतिज्वाला आहे. आंबेडकर चळवळीला नव्याक्रांतीगर्भाची गरज आहे .

अंधाराच्या कर्मठावर
प्रकाशाची बारूद पेरा.
अमाणुषतेच्या विकृतीवर
सविधानऊर्जेचा मारा करा….
सोडून द्या रे कुबड्या सार्‍या
रक्तात स्फुलिंग चेटवा.
आंबेडकरी चळवळीत
नव्या ऊर्जेची मशाल पेटवा…

✒️संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००