स्वातंत्र्यसंग्रामाचे निष्ठावान शिपाई!

[मौलाना अबुल कलाम आझाद जयंती: राष्ट्रीय शिक्षण दिवस विशेष]

मौलाना अबुल कलाम आझाद यांना इंग्रजांनी अहमदनगर येथील तुरुंगात ठेवले होते. त्या वेळी त्यांनी हे उद्गार काढले, “इंग्रजांना मी सत्ताधारी मानत नाही तर त्यांना मी विनंती का करू?” आझाद यांच्या पत्नीचे निधन झाले होते. तेव्हा इंग्रजांनी त्यांना निरोप दिला की, पत्नीच्या दफनविधीसाठी आम्ही तुम्हाला सोडू; पण तुम्ही तसे विनंतीपत्र इंग्रज सरकारला द्या. त्यावेळी त्यांनी इंग्रजांना असे बाणेदार उत्तर दिले. मौलाना आझादांचा जन्मदिवस ११ नोव्हेंबर हा ‘शिक्षण दिवस’ म्हणून साजरा करण्याचे केंद्र सरकारने नुकतेच जाहीर केले आहे, हे विशेष! अशा निर्भीड वाचस्पतीच्या जयंती निमित्त श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींनी आपल्या शैलीत केलेले त्यांचे हे गुणगौरव!.. संपादक.

मौलाना आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी सौदी अरेबिया या देशातील पवित्र भूमी मक्का येथे झाला. त्यांचे वडील मौलाना खैरुद्दीन हे धर्मगुरू होते. ही भूमी त्यांना न मानवल्याने ते आपल्या कुटुंबासह भारतात आले आणि त्यांनी कोलकाता शहरात वास्तव्य केले. मौलाना आझाद यांच्या मातोश्री मक्का येथील धर्मगुरूंच्या कुटुंबातील होत्या. आई आणि वडील या दोघांकडील घराणे उच्चशिक्षित होते. ‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या न्यायाने ते लहानपणापासूनच अतिशय हुशार होते. ते इस्लाम धर्माचे आधुनिक विचारवंत होते. आई आणि वडिलांची घराणी कट्टरपंथी असली तरी आझाद कट्टरपंथी नव्हते. त्यांनी इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणाचा अभ्यास करून त्यावर ‘तर्जुमानुल कुरान’ हे पुस्तकही लिहिले आहे. त्यांना अरबी, फारशी, इंग्रजी व उर्दू या भाषा चांगल्या अवगत होत्या व ते चारही भाषांतून लिखाण करीत असत. ते एक उत्कृष्ट वक्तेदेखील होते. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहत असत. ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक होते. अनेक हिंदू विचारवंत त्यांचे चाहते होते. ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक निष्ठावान शिपाई होते. फारसा गाजावाजा न करता कार्य करीत राहणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

मौलाना अबुल कलाम हे भारताचे एक प्रमुख राजकीय पुढारी होते. त्यांचे मूळ नाव मोहिउद्दीन अहमद असे असून अबुल कलाम म्हणजे वाचस्पती ही त्यांची पदवी होती. पुढे ‘आझाद’ (स्वतंत्र) हे टोपणनावही ते लावू लागले. वडिलांबरोबर सन १८९० साली ते कलकत्याला आले. पारंपरिक मुसलमानी शिक्षण पद्धतीप्रमाणे त्यानी फार्सी, उर्दू व अरबी या भाषांचे प्रथम अध्ययन केले. नंतर त्यांनी तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान व गणित यांचा अभ्यास केला. पुढे सर सय्यद अहमदखान यांच्या लेखांचा परिणाम होऊन त्यांनी इंग्रजीचा अभ्यास स्वतंत्रपणे सुरू केला. इ.स.१९०८मध्ये ईजिप्त, अरबस्थान, तुर्कस्थान, फ्रान्स आदी देशांना त्यांनी भेटी दिल्या. तेथील क्रांतिकारकांच्या संपर्कामुळे त्यांची राजकीय मते बदलू लागली आणि कलकत्त्यास परत येताच हिंदी मुसलमानांनी स्वातंत्र्यसंग्रामात पुढाकार घ्यावा, असे मत त्यांनी प्रतिपादित केले. लोकजागृतीसाठी सन १९१२ साली कलकत्ता येथे त्यांनी ‘अल्-हिलाल’ हे उर्दू साप्ताहिक सुरू केले. अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ या टोपणनावाने ते लेखन करीत. अल्-हिलालमधील प्रखर राजकीय टीकेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्याकडून दहा हजार रुपयांचा जामीन मागितला. आझादांनी तो दिला नाही, म्हणून ते वृत्तपत्र बंद पाडले. दोन वर्षांनी त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले. त्यामुळे आझादांना अनेक प्रांतांत जाण्यास बंदी घालण्यात आली; पुढे त्यांना सांचीला स्थानबद्ध करण्यात आले. मुसलमानांत त्यांच्या अटकेमुळे नवे वारे संचारले. इ.स.१९२० साली त्यांची सुटका झाली.

भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेतला नसता तर त्यांनी गुरू-शिष्य परंपरेत म्हणजेच पीर-मुरीदी परंपरेत खूप चांगले कार्य केले असते. त्यांच्या गळ्यात असणाऱ्या स्वरगंगेत लोक न्हाऊन निघत असत. परंतु संगीत क्षेत्रातही न रमता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ.राजेंद्रप्रसाद, अ‍ॅनी बेझंट, लालबहादूर शास्त्री, वल्लभभाई पटेल यांच्यासमवेत भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी उडी घेतली. सुरुवातीला ते सर सय्यद यांच्या विचारांनी भारावलेले होते. परंतु सर सय्यद यांनी इंग्रजांशी मैत्री केल्यामुळे प्रखर राष्ट्रवादी असलेल्या मौलाना आझाद यांनी त्यांच्याशी नाते तोडले. भारत हा आपला देश आहे. त्यावर परकीयांचा ताबा ही दडपशाही आहे, अशी त्यांची भूमिका होती. भारतावर स्वकीयांचीच सत्ता हवी, असे त्यांचे मत होते. कष्ट आणि निष्ठा यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. शेवटपर्यंत त्यांनी या विचारांवरच वाटचाल केली. इंग्रजांनी १८५७मध्ये संपूर्ण भारतावर ताबा मिळवला. त्याच लढाईत भाग घेणाऱ्या मुस्लिम घराण्यांमधील लोकांची इंग्रजांनी कत्तल केली व त्यांच्यावर अत्याचार केले. काही जणांना काळ्या पाण्याची शिक्षाही दिली तर अनेकांना दिल्लीच्या रस्त्यावर फाशी दिली.

यात मुसलमानांची संख्या अधिक होती. कारण इंग्रजांची अशी भूमिका होती की, मुसलमान हे या देशाचे राजे होते. त्या वेळी भारतीय मुसलमानांच्या मनात मोठ्या प्रमाणावर नैराश्य पसरले. पूर्वी बाप वा राजा या भूमिकेत वावरणारे मुसलमान इंग्रजांनी सत्ता बळकावल्यामुळे दुखावले गेले होते. त्यानंतर पन्नास-साठ वर्षांपर्यंत कोणीही मुलसमान इंग्रजांसमोर येण्यास तयार नव्हते. सर सय्यद यांच्यासारखे बुद्धिवंत इंग्रजांशी हात मिळवून त्यांच्या बाजूने बोलत असत. अशा वेळी त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात एका निष्ठावान राष्ट्रवादी मुसलमानाची भूमिका बजावली. मौलाना आझाद देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटत होते. म.गांधींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी देशाचे विभाजन स्वीकारले, पण जे मुसलमान भारत सोडून पाकिस्तानला स्थलांतरित होत होते, त्यांना त्यांनी विरोध केला होता. ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे सच्चे प्रतीक होते.

सन १९४७मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. पं.जवाहरलाल नेहरूंनी मौलानांकडे शिक्षण मंत्रालयाचे काम सोपवले व ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री झाले. त्यांनी त्या काळी अत्यंत बिकट परिस्थितीतही भारतात शिक्षणाचा प्रसार व प्रचार उत्तम प्रकारे राबवला. त्यांना युरोपच्या तत्कालीन समस्यांचे चांगले ज्ञान होते. जर्मन आणि इटलीच्या सत्ताधाऱ्यांची दडपशाही संपूर्ण जगासाठी मोठा धोका ठरणार आहे, असे ते सांगत. हिटलरच्या काळात अल्पसंख्याक व बुद्धिजीवींची सर्रास कत्तल होईल, हे मौलानांनी सांगितले होते आणि तसेच घडले. हे जगाने पाहिले व अनुभवलेही. हाऊस ऑफ लार्ड्सचे सदस्य लॉर्ड बटमली, ज्यांनी जवळपास ६० वर्षे इंग्लंड व भारताच्या राजकारणात भाग घेतला, ते मौलानांबद्दल म्हणतात, “मौलाना आझाद विशाल मनाचे व्यक्ती होते. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य व अखंडतेसाठी कायम प्रयत्नांची पराकाष्ठा केली.” स्वातंत्र्यलढ्यात त्यांची भूमिका खूप मोलाची ठरली. त्यांना युरोपियन साहित्याचेही चांगले ज्ञान होते. महाकवी बायरन आणि फ्रान्सच्या कादंबरीकारांची त्यांना चांगली माहिती होती. दि.२३ फेब्रुवारी १९५८ रोजी दिल्लीत मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन झाले.

मौलाना आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते; त्यांनी अनेक वृत्तपत्रांतून स्फुट लेखन केले आणि उर्दूत काही पुस्तके लिहिली आहेत. त्यांतील तजकेरा, गुब्बारे खातिर, कौले फैसल, दास्ताने करबला, तरजुमानुल कोरान ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. तरजुमानुल कोरान म्हणजे कुराणचा सटीप उर्दू अनुवाद असून तो फार लोकप्रिय आहे. याशिवाय त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे. केंद्र सरकारने इ.स.१९९२मध्ये त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ किताब प्रदान केले.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जयंती निमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!

✒️संकलक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी[भारतीय सत्पुरूषांच्या चरित्र-इतिहासाचे गाढे अभ्यासक]मु. रामनगर वॉर्ड क्र.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली.भ्रमणध्वनी -९४२३७१४८८३.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com

गडचिरोली, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED