धरणगाव बस स्टँड समोरील खोदलेल्या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

27

🔸युध्द पातळीवर काम पूर्ण करावे अन्यथा उपोषणास बसणार – आबासाहेब राजेंद्र वाघ

✒️पी.डी पाटील(विशेष प्रतिनिधी)

धरणगाव(दि.10नोव्हेंबर):- – शहराच्या मध्यभागी असलेल्या महामार्गाचे म्हणजेच बसस्टँड समोरील नवा रस्ता बनविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत मागील काही महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी रस्ता खोदून ठेवण्यात आला असून पुढील काम सुरू करण्यास दिरंगाई होताना दिसत असल्याने नागरिकांना सतत प्रचंड वाहतूकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला लागून असलेल्या महामार्गाच्या रस्त्याचे नव्याने काम सुरू असल्याने ऐन दिवाळीच्या सणासुदीला खोदकाम करून ठेवले असून काम इतक्या संथ गतीने सुरू आहे की, त्याचा मनःस्ताप नागरिक व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे.

एकंदरीत संबंधित ठेकेदाराच्या भोंगळ कारभार व नियोजन शून्य कारभार त्यातच वाहतूक पोलीस यांनी देखील संबंधित ठिकाणी बघ्याची भूमिका घेतलेली दिसतेय. या खोदलेल्या ठिकाणी तासंतास वाहतुकीच्या कोंडीने शहरात येणाऱ्या व शहराबाहेर जाणाऱ्या वाहनचालकांसाठी, कामगार व नागरिकांसाठी रोजची डोकेदुखी ठरत आहे.गेल्या महिनाभरापासून खोदून ठेवलेल्या रस्त्याच्या समस्येचा सर्वात जास्त त्रास बैलगाडी, गुरेढोरे, दिव्यांग, कामासाठी येणाऱ्या महिला व कर्मचाऱ्यांना होताना दिसत असून या रहदारीमुळे येतांना – जातांना नागरिक घसरून पडण्यासह अपघाताचे प्रकार होऊ लागल्याने सर्व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यांचे काम पालिकेला लवकर करायचे नव्हते तर, चांगला रस्ता उखडून ठेवला कशाला, असा संतप्त सवाल राजेंद्र वाघ यांच्यासह इतर त्रस्त प्रवासी व नागरीकांकडून यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराज स्मरकाजवळ व बस स्टँड समोर नवा रस्ता बनविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागतर्फे गेल्या महिनापासून हाती घेण्यात आले आहे. यासाठी प्रशस्त असलेला चांगला रस्ता उखडून ठेवला. त्यावेळी हे काम जलद गतीने होईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती परंतु आजमितीस महिना होत आला तरी कामाला म्हणावी तशी गती नाही व त्यातच रस्ता खड्डेमय झाला असल्याने वाहनचालकांसह कामगार विशेष करून महिलांना त्याचा जास्त त्रास होत आहे. वाहनचालकांना वाहन काढता येत नाही तर गुरेढोरे, दिव्यांग, विकलांग, महिलावर्ग व जेष्ठ नागरिकांची काय अवस्था असेल याची कल्पना न केलेली बरी. अत्यंत कासवगतीने सुरू असलेल्या कामामुळे हा सर्व रस्ता धोकादायक झाला असून, काम तातडीने पूर्ण करा.

सुरक्षित वाहतूक व्यवस्थेला मदत करा, अशी मागणी करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दरम्यान, एकंदरीत या रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सदरचे काम अत्यंत कासव गतीने होणे अयोग्य असून नागरिकांना होणारा मोठा त्रास लक्षात घेता संबंधित प्रशासनाने काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा नागरिकांसमवेत आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही असा इशारा प्रवासी, वाहनचालक व नागरिकांकडून देण्यात आला आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास साखळी उपोषणाला बसण्याचा सल्ला आबासाहेब राजेंद्र वाघ व त्यांच्या मित्र परिवाराने दिला आहे.