BDS प्रणाली बंद असल्यामुळे PF धारक हक्काच्या पैशांपासून वंचित -आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीचे उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना पत्रं

25

🔸मागणी मान्य न झाल्यास शिक्षक भारतीचा आंदोलनाचा इशारा

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.11नोव्हेंबर):-राज्यभर BDS प्रणाली बंद असल्यामुळे PF धारक त्यांच्या हक्काच्या पैशांपासून वंचित आहेत. त्यासाठी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीच्या वतीने आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड आणि वित्त विभागाचे प्रधान सचिव यांना पत्रं पाठवण्यात आली आहेत. लवकरच आमदार कपिल पाटील स्वतः प्रत्यक्ष भेट घेऊनही मंत्री महोदयांना याबाबतची परिस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत.

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी वैयक्तीक कामं, मुलांच्या लग्नांसाठी, शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी, गृह कर्ज हफ्ता भरण्यासाठी स्वतःच्या PF खात्यातून पैसे मिळण्याबाबत अर्ज केलेले आहेत. मात्र राज्यभर BDS प्रणाली बंद असल्यामुळे त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीयेत. वेळेवर पैसे न मिळाल्याने शिक्षक, कर्मचारी यांच्या समोर मोठा आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. अनेकांचे उपचार थकले आहेत. उच्च शिक्षणासाठी बाहेर जाणाऱ्या मुलांची फी थकली आहेत, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.

शिक्षक, कर्मचारी यांना त्यांच्या हक्काचे पैसे देणे ही शासनाची जबाबदारी आहे. असे न झाल्यास शासनाबद्दल एक अविश्वासाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे तात्काळ BDS प्रणाली सुरू करून PF धारकांना महिना अखेरपर्यंत त्यांचे हक्काचे पैसे न मिळाल्यास शिक्षक भारती राज्यव्यापी आंदोलन करेल, असा इशारा शिक्षक भारतीने दिला असल्याचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र झाडे,विभागीय अध्यक्ष भाऊराव पत्रे,विभागीय सरचिटणीस सुरेश डांगे,सल्लागार रावण शेरकुरे,जब्बार शेख,नंदकिशोर शेरकी,विलास फलके,विजय मिटपल्लीवार,भास्कर बावनकर,पुरुषोत्तम टोंगे,राकेश पायताडे,सतीश डांगे,प्रविण पिसे,प्रशांत सुरपाम यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.