आजादी का अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे महाशिबिराचे आयोजन

25

🔸विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन व वैद्यकीय तपासणी शिबिराचा घेता येणार लाभ

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.12नोव्हेंबर):- जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे करण्यात आले आहे. आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनात व निर्देशानुसार आयोजित या महाशिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता बी.अग्रवाल यांच्या हस्ते सकाळी 10.30 वाजता होणार आहे. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या मेळाव्यामध्ये प्रथम सत्रात महिला विधी सेवा शिबिरामध्ये माविमच्या सहाय्यक सनियंत्रण अधिकारी, विद्या रामटेके विविध कायदेशीर तरतुदींची सविस्तर माहिती देणार आहेत. त्यानंतर महिला बचत गटांना उपलब्ध नवीन संधी याबाबत आणि विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

वन परिसरातील जमिनींना सौरकुंपण करण्याबाबत आवश्यक सामग्री, यंत्रणा आदींबाबत मार्गदर्शन वर्गाचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबतच सौर कुंपण मॉडेलचे सविस्तर सादरीकरण या कार्यक्रमाप्रसंगी केले जाईल. या महाशिबीरामध्‍ये जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे वैद्यकीय तपासणी शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे.

तरी या महाशिबिराचा लाभ जिल्ह्यातील महिलांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.