‘जय भीम!’ माझ्या नजरेतून

71

दिवाळीच्या सुट्ट्या सम्पत आल्या; काही जणांच्या पूर्वीच सम्पल्याही. दिवाळीत काय करावे? सुट्ट्या कशा आनंदात घालाव्यात यासाठी वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येकजण आखत असतो. त्यात बऱ्याच जणांचा आणि माझाही एक विशेष कार्यक्रम असतो; तो म्हणजे मनोरंजनाचा, चित्रपट पाहण्याचा! ज्याची मला बालपणापासूनच प्रचंड आवड आहे. लहानपणी मारधाड असणारे चित्रपट पहायचो, नन्तर विनोदी आणि आता थोडे विचारशील चित्रपट पाहण्याकडे कल आहे. ही झाली माझी चित्रपट पाहण्यातली उत्क्रांती!सध्या व मागच्या एक-दीड वर्षांपासून चित्रपटगृह बंद असल्याकारणाने मी ‘ऍमेझॉन प्राइम’चे वार्षिक सबस्क्रिप्शन घेतले आहे. ज्याला आपण ओ.टी.टी. प्लॅटफॉर्म म्हणतो. त्यामध्ये मनोरंजनाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातला आपल्या आवडीचा, जुनाचं, परिचयाचा प्रकार म्हणजे सिनेमा! 
  मग काय सिनेमाचा शोध सुरू झाला. त्यात ट्रेंडिंगवर होता- ‘जय भीम!’ सिनेमा. त्या सिनेमाची मला कुठलीही पार्श्वभूमी माहिती नसताना, चित्रपटाच्या शिर्षकाचा अर्थाअर्थी काहीही संबंध न लावता मी तो चित्रपट पहायचे ठरवले. *सिनेमाला 9.8/10 ची आय.एम.डी.बी. रेटिंग पाहून मी अवाक् झालो.

हमी मी चित्रपट पाहण्यापूर्वी त्याचे यु ट्यूबवर जाऊन ट्रेलर पाहत असतो. ‘जय भीम’ त्याला अपवाद नव्हता. त्याचा ट्रेलर पाहिल्यानंतर मी निःशब्द झालो. केवळ स्क्रीनवरील हलणारे चित्र पाहणे इतकी सोपी बाब नव्हतीच ती! टिव्हीचा डिस्प्ले थरथर कापावा इतके वास्तव व ह्रदयाला जाळणारा विस्तव होता तो! मी खूपच भावनाशील असल्याकारणाने मला छळ पाहणे सहन होत नाही. मग मीच कोशात जातो. माझ्या मेंदूचे सर्किट फार अस्ताव्यस्त होऊन जाते. विचार बंद पडतात; आणि यातून सावरायला मला निदान काही दिवस लागतात. म्हणून मी हा चित्रपट न पहायचे ट्रेलर पाहूनच ठरवले. कारण हे सर्व पाहणे माझ्यासाठी असहनिय होते. वेदनादायी होते. 

   विषय असा आहे, की सम्पूर्ण समाजात चित्रपट पाहणारा, त्यावर चर्चा करणारा मी काही एकटाच नाही. त्यामुळे व्हाट्सएप व इतर सोशल प्लॅटफॉर्मवर, काही न्यूज चॅनेलवर ‘जय भीम’ विषयी चर्चा सुरू होती. मी स्वतः चित्रपट पाहिला नसल्यामुळे, ती चर्चा मला फक्त वरवरच कळत होती. मला जर सम्पूर्ण विषय ईतेम्भूत माहिती करून घ्यायचा असेल तर चित्रपट पाहणे जरुरी होते. समाजाचा आरसा मांडण्याचे काम एखादा चित्रपट करत असेल आणि मी माझ्या लेखणीतून तो आरसा आपल्यासमोर पेश करत असेल तर मला आधी तो आरसा पाहणे नितांत गरजेचे होते. ह्रदयाची गतीच या विचाराने वाढली होती, पण आता ‘जय भीम’ सिनेमा पहायचा निर्धार पक्का झाला होता.

  तारीख होती 4 नोव्हेंबर 2021 ची. आता तुम्ही म्हणाल 4 नोव्हेंबरला सिनेमा पाहून, हा इतक्या उशिरा त्यावरती लेखन का करत असेल? मुळात काही लेखन मी पूर्वीच सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे. तसेच, हे लेखनही त्याच काळातले आहे. पण, दिवाळीच्या शुभेच्छांच्या वर्षावात हे लेखन भरकटू नाही तसेच जय भीम सिनेमा आपल्या मूर्तातून अमूर्तात जाण्याच्या वेळेला पुनः मूर्त करावे म्हणून मुद्दाम हा उशीर केला. भावनिक, सत्य घटनेवर, गंभीर-विचारशील सिनेमा असल्याकारणाने मी तो पाहण्यासाठी रात्रीची वेळ निवडली. कारण मला ती नीरव शांतता हवी होती. जेवण वैगरे सर्व कार्यक्रम आटोपून सिनेमा पहायला बसलो. टीव्हीवर जय भीम आता सुरू झाला. पहिली गोष्ट आधी स्पष्ट करतो, जय भीमचे सुरुवातीचे शीर्षक आणि शेवटी त्याचा अर्थ, जो मराठा पोयट्रितुन घेतलेला पाहिला तर ‘जय भीम!’ हे दोन शब्द फारसे ऐकिवात चित्रपटात आले नाही, दिसले पण नाही. पण, शेवटी वाचलेला अर्थ व पाहिलेला सम्पूर्ण सिनेमा सगळेच सांगून गेला.
  ही कथा आहे; सन 1995 च्या सत्य घटनेवरील आधारित! कथाकार,लेखक म्हणजे ‘टी.जे.गनानावेल’. दिग्दर्शक स्वतः तेच आहेत. कथेचा नायक ‘दाक्षिणात्य सुपरस्टार- सुरीया शिवकुमार’ ज्याला तुम्ही तमिळच्या सिंघम चित्रपटाच्या सिरीजमध्ये पाहिले असेल. वकील- ‘के.चंद्रु’ ची अजरामर राहील अशी भूमिका त्याने साकारली आहे. चित्रपटाची निर्मिती त्याने व त्याच्या बायकोनेच (ज्योतीका) केली आहे. चित्रपटातील मुख्य सहकलाकार जो ‘राजाकन्नू’च्या भूमिकेत दिसला तो म्हणजे के.मणीकंदन आहे. तो केवळ या चित्रपटातील अभिनेता नसून त्याने अस्सल जीवनात बरेच तमिळ चित्रपट दिग्दर्शीत तसेच लिहले आहेत. चित्रपटातील मुख्य अभिनेत्रीचे नाव ‘लिजोमोल जोस’ आहे. तिने ‘राजाकन्नू’च्या गरोदर पत्नी ‘सेनगनी’ ची भूमिका साकारली आहे. ‘लिजोमोल जोस’ ही पूर्वी तामिळ,मल्याळम,कन्नडची प्रसिद्ध अभिनेत्री ‘भावना’ची मेकअप आर्टिस्ट राहिलेली आहे. याव्यतिरिक्त पोलीस महानिरीक्षक म्हणून प्रकाश राज दिसले. ज्यांची वेगळी ओळख सांगण्याची आपल्याला गरज नाही. दुसरी एक महत्वाची अभिनेत्री म्हणजे चित्रपटातील गोरगरिबांना शिकवणारी शिक्षिका, सोशल ऍक्टिव्हिस्ट ‘मिथरा’ होय. जी भूमिका ‘रजीशा विजयन’ने केली आहे. तिने अनेक मल्याळम चित्रपटात काम केले आहे. तसेच बरेच टीव्ही शोज होस्ट केले आहेत. याव्यतिरिक्त राव रमेश (चित्रपटातील पात्र- एस.राम मोहन- ऍडव्होकेट जनरल), गुरुमुर्थी- पोलीस उपनिरीक्षकची भूमिका ‘तमीज’ने केली आहे. ‘राजाकन्नू’सोबत अटकेत असलेले ‘मोसाकुट्टी’ तसेच ‘इरूटप्पन’ ची भूमिका अनुक्रमे ‘राजेंद्रन’ आणि ‘एम.चिनराज’ने केली आहे.

  मुळात एवढया लोकांची नावे मी का सांगत असेल आपल्याला?यासाठी सांगत आहे, की एका ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. आणि तुम्ही त्या ऐतिहासिक चित्रपटाचे साक्षीदार आहात. आपला इतिहास ज्या आदिवासींच्या मुळापासून सुरू होतो, त्यांचा संघर्ष या सर्वांनी त्यांच्या भूमिकेतून जीवंत केला आहे. त्याचे ते खरे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे त्यांचे खरे नाव तुम्हाला कळायलाच हवे! असो!  कहाणी सरळ, सोपी आहे. फक्त ती पाहणाऱ्यांसाठी! पण, ज्यांच्यावर या सर्व परिस्थितीने जुलूम केले त्यांचा संघर्ष त्यांनीच भोगला. जो थोडाही सरळ आणि सोपा तर नव्हताच; ज्याचे व्रण कितीतरी पिढ्या नासवून गेले असतील, हे न ऐकलेले बरे! 
   चित्रपटात ‘इरुलर’ आदिवासी जमातीच्या हालअपेष्टा मांडण्यात आल्या आहेत. त्यांची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार दोन-सव्वादोन लाखाच्या आसपास आहे. तामिळनाडू, कर्नाटक व केरळ या मुख्य तीन राज्यात ही आदिवासी जमात विभागली गेली आहे. पण, बहुसंख्य जमात ही तामिळनाडूमध्येच आहे. ‘इरुलर’ जमातीतील लोकांना ‘इरूला’ म्हणतात. ‘इरूला’ म्हणजे ‘ काळे लोक किंवा श्याम वर्ण’ अर्थाअर्थी दोन प्रकारचे अर्थ इथे लागू होतात. जसे, ही आदिवासी जमात ज्या ‘निलगिरी’ पर्वतमालेत राहते तो अत्याधिक घनदाट अरण्याचा प्रदेश आहे. झाडे इतकी दाट आहेत, की सूर्याचा प्रकाशही जमिनीवर फारसा येत नाही. त्यामुळे या जमातीचा प्रदेश ‘काळोखा’ने व्यापलेला असतो. म्हणून, ‘इरूला’ जमात गणल्या गेली असावी. तसेच ‘इरूला’चा रंग हा काळा असल्यामुळेही ‘इरूलर’ जमातीची नाव पडले आहे.

 ‘इरूला’ला पोटाची खळगी भरण्यासाठी मुख्य व्यवसाय म्हणजे ‘उंदीर मारून खाणे’ तसेच गावातील विषारी साप पकडून जंगलात नेऊन सोडून जे काही संबंधित धन्याकडून मिळेल त्यातून पोटाची भूक भागविणे होय. उंदीर पकडण्यासाठी धूर तोंडातून सोडल्यामुळे बऱ्याच इरुलांना फुफ्फुसाचे रोग झाले आहेत. आजही या जमातीची स्थिती फारशी समाधानकारक नाही. ही खरीच शोचनीय बाब आहे.
  1995 चा काळ म्हणजे भारत स्वातंत्र्यानन्तरच्या 5 व्या दशकाच्या शेवटचा काळ. जिथे आपण 50व्या वर्षी स्वातंत्र्यप्राप्तीचे ‘सुवर्ण’ महोत्सव साजरे करतो, साधारणपणे तो कालावधी. पण, चित्रपट पाहिल्यावर कुठेच असे वाटत नाही की हा स्वातंत्र्याचा कालावधी असेल? तसेच हा ब्रिटिशकाळही न वाटता तो इ.स.पू. टोळी काळ वाटतो, नाहीतर परकीय राजसत्ता भारतीयांवर येऊन जे अनन्वित अत्याचार करत होत्या तो मध्ययुगीन काळ वाटतो. *काळ असा की दु’ष्काळ लाजेल आणि काळा रंग हासेल इतका लाजीरवाणा तर नक्कीच वाटतो.*

 ‘राजाकन्नू’ जो सामान्य ‘इरूला’ असून आपल्या पत्नीवर व कुटुंबावर खुप प्रेम करतो. तो चित्रपटात एका ठिकाणी म्हणतोही की त्याची बायको त्याच्यासाठी राणीच आहे. तिच्यासाठी तो परगावी दूर जाऊन काम करून चार पैसे जोडत असतो. दरम्यानच्या काळात तो गावातील सरपंचाच्या घरचा विषारी साप पकडतो. त्याला बक्षीस मिळणे तर सोडून द्या- जाता जाता सरपंचाची बायको म्हणते *”तू इतका घाणेरडा, माझ्या माहेरचा असू शकत नाही.”* ते दृश्य पाहून अत्यन्त वाईट वाटते. ती कोणी का स्त्री असेना, तिचा कोणता का वंश असेना, म्हातारपणी जेव्हा ती पाय मोडून चारपायीवर पडून जेव्हा शेवटच्या घटका तिथेच शी करून मोजत असेल न तेव्हा वाटणारी घाण इतरांसोबत तिच्या वाट्याला येईलच की! त्यामुळे आपल्यासारख्या दुसऱ्या माणसाला ‘घाण’ म्हणून उल्लेखण्याचा तिला अधिकार कोणी दिला नाही; आणि अधिकार नाहीसुद्धा!
  ‘राजाकन्नू’ परगावी कामाला जाण्याच्या नेमक्या त्याच काळात सरपंचाच्या घरी सुवर्णाची चोरी होते. याठिकाणी गावचा सरपंचच व्हीक्टीम असल्यामुळे चौकशी उच्च स्तरावरून होण्यासाठी दबावतंत्र वापरले जाते. या दबावतंत्राचा फायदा सरपंचला होतोही! सरळ पोलीस अधीक्षक या केसमध्ये लक्ष्य घालतात. स्थानिक पोलिसांवर दबाव आल्यामुळे, ते ‘राजाकन्नू’ला बळीचा बकरा बनवून पेश करतात. समाजात एक अलिखित परंपराच आहे. श्रीमंती व गरिबीवरून माणसाची इमानदारी तपासण्याची. त्याला ‘राजाकन्नू’ अपवाद नव्हता. त्याच्यासोबत त्याचा भाऊ आणि पुतण्याला पकडून त्यांच्यावर अमानुष अत्याचार केला जातो. अत्याचार इतका की, ‘राजाकन्नू’ला ती मारहाण असहनिय होऊन तो त्यातच मृत्यमुखी पडतो.

   दुःख, अवहेलना, अत्याचार, नकार आणि तिरस्कार याने भरलेलीही गोष्ट व सत्यकथा आहे. पुरुषांवर अत्याचार होणे, हे तर दोन्हीकडच्या बाजूने गृहीतच धरले होते. पण, ज्यावेळेस ‘राजाकन्नू’ची बहीण जिच्या स्त्रीत्वावर हल्ला होतो, ती स्थिती आणि तीच काळी वेळ डोळ्यांनी पाहू नये आणि पाहिली तर अश्रू थांबू नये अशी होती. त्याची गरोदर बायको जिला 6-7 वर्षाची एक लहान मुलगी आहे, तिला त्या गरोदर अवस्थेत पोलीस स्टेशनला नेऊन अपरिमित मारहाण करतात. जेव्हा ती तिच्या गरोदरपणाचा दाखला देऊन काहीतरी सहानुभूती दाखवली जाईल याची भाबडी आशा ठेऊन याचना करते, तेव्हा ”मोठी राणी झाली का?” असे हिणवून आणखी मारतात. या घटनेला केवळ ‘अमानुष’ म्हणून थांबणे जरा संकुचित वर्णन होईल. जनावरांना छळत नाहीत त्यापलीकडचा हा छळ होता. शरीरासोबतच्या मानसिक वेदना तर त्याहून भयंकर होत्या.
  यात काय कमी होते म्हणून ‘राजाकन्नू’ त्याच्या नातेवाईकांसोबत तुरुंगातुन फरार झाला म्हणून सगळीकडे दवंडी पेटली जाते; आणि ती खरी मानली पण जाते. ‘राजाकन्नू’ कुठे गेला? तो परत मिळाला की नाही? सेनगिनीला वकील ‘चंद्रु’ने मदतीसाठी केलेले आटोकाट प्रयत्न या चित्रपटात दाखवले गेले आहेत.
*चित्रपटात एकही प्रसंग असा नाही की तुमच्या अंगावर काटा येणार नाही.* ‘राजाकन्नू’चा तामिळनाडू-पोंडेचारी सीमेवर सापडलेला मृतदेह पाहून मला अक्षरशः अश्रू अनावर झाले होते. ‘राजाकन्नू’ मेला की जीवंत आहे? हे पाहण्यासाठी त्याच्या डोळ्यात टाकलेली मिर्चीपुड तुमच्या डोळ्याला पाणी आणत नसेल तर मन, ह्रदय तपासावेच लागेल.
  पोलीस प्रशासन आपली अब्रू वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते. पण, जशी या चित्रपटात नकार दृश्यवणारी बाजू दाखवली, तसे *यात निष्पक्ष दोन न्यायाधीशांचे बेंच, वकील ‘चंद्रु’, पोलीस महानिरीक्षांनी केलेली सत्य तपासणी आणि ती शिक्षिका ‘मिथरा’ हे सर्व घटक तितकेच न्याय मिळवून देण्यासाठी सकारात्मक होते.*
  ‘चंदृ’ जी ने शेवटापर्यंत लढलेली लढाही, ‘हेबेईस कॉर्पस’ म्हणून खटल्याकडे न्यायव्यवस्थेला पाहायला लावून, पटवून दिलेले प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगे होते.
*चित्रपटाचा नायक आणि खऱ्या आयुष्यातील महानायक म्हणजे, जस्टीस के. चंद्रु आहेत. त्यांनी समाजसेवेसोबत वकिली आणि मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आहे. त्यांच्या 6 वर्षाच्या कालावधीत 96000 खटले त्यांनी निकाली लावली. त्यात मजुरवर्ग, स्त्रिया, पिछडे,दबलेले सर्वांना न्याय मिळवून दिला. गरिबांच्या खटल्याला एक रुपयाही मानधन न घेता केसेस लढल्या. देव,देवदूत म्हणायचं असेल तर अशा लोकांना म्हणा! भक्त व्हायचे असेल तर यांचा व्हा! पुण्य मिळेल की नाही माहीत नाही, पण पुण्य वाटालं एवढं नक्की आहे.*
  46 वर्षाचा अभिनेता ‘सुरीया सिवकुमार’ चित्रपटाबरोबर अस्सल जीवनात नायकाला शोभेल असे काम करून गेला. स्वतः चित्रपटाला पैसा लावला. चित्रपटात ना ग्लॅमर होते, ना गाणे! चित्रपट पडला तरी नुकसान होते आणि चालेल की वाद होईल? याची भीती असताना त्याने ती हिम्मत केलीच. नायक कसा असावा? याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ‘सुरीया’ ! “तू तामिळचा असशील नाहीतर दक्षिणेचा भाग, जय भीम या एका सिनेमाने तू खरं झालायस आमच्या मनाचा बादशाह!!” इतके तर लिहुच शकतो भावा!
*या खटल्यात दबलेल्या लोकांवर होणारा अत्याचार हा प्रमुख गाभा असला, तरी त्यात आणखी एक बाजू आहे ज्यात सुधारणा होणे आवश्यक आहे. ते म्हणजे ‘कस्टोडियल डेथ’ होय. आजही 2021 च्या मागच्या  सहामाहित राष्ट्रीय मानवी हक्क संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार दररोज पाच जण पोलीस स्टेशनमध्ये होणाऱ्या टॉर्चरमुळे मरत आहेत. एन.सी.ए.टी.च्या आकडेवारीनुसार यातले 63% हे अटक केल्याच्या 24 तासातच मृत्युमुखी पडत आहेत. ⅔ मागास समाजातील लोक याठिकाणी मृत्यमुखी पडतात हे वेगळे सांगणे नको; आणि तो जुनाच कुतर्क याठिकाणी लावला जात असेल की मागास लोकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती असते. तर बाकीचे ⅓ कोणत्या सामाजतले होते? हे विचारून पहा!*
  एन.सी.ए.टी. ने 2004 ते 2018 मध्ये एकूण 500 ‘कस्टोडियल डेथ’ ची नोंद घेतली आहे. ज्यात गुन्हेगार पोलीस कर्मचाऱ्यांवर चार्जशीट दाखल होण्याची टक्केवारी केवळ 10% आहे. ( म्हणजे 54 केसेस)
  हे असे होते का? आपल्याला जगण्याचा नैसर्गिक अधिकार असून घटनेच्या 20 व्या व 21 व्या कलमाने तो मूलभूत अधिकार म्हणून बहाल केला आहे. या अधिकारांवर गदा येत असेल तर घटनेत विशेष 32 व्या कलमाची तरतूद आहे. ज्यामध्ये ‘हेबेईस कॉर्पस’ विषयी नोंद आहे. म्हणजे आपल्याला विनाकारण, बेकायदेशीर 24 तासाच्यावर मॅजिस्ट्रेटसमोर पेश नाही केले तर बंदिवासातुन मुक्तीचा अधिकार आहे. ज्यामुळे सर्वोच्च न्यायालयात न्याय मागण्याचा आपल्याला अधिकार प्राप्त होतो. हे आपण विसरलो आहोत. ज्यांना आपले हक्क माहीत नाहीत, त्यांच्याकडून कर्तव्याची काय अपेक्षा ठेवावी. त्यांना आरसा दाखवण्याचे काम ‘जय भीम’ चित्रपटाने केले आहे.
*पोलीस प्रशासनावर सिंघम, गर्व, असे बरेच चित्रपट आलेत. कालपरवाचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट त्याच खाणीतला! ज्यात पोलिसांविषयी जाज्वल्य अभिमान दाखवण्यात आला आहे. त्यामुळे हिंदी असो नाहीतर दक्षिणात्य चित्रपटसृष्टी त्यांना पोलिसांबद्दल अभिमानच आहे. किंबहुना मीही मागे पोलिसांवर लेख व कविता लिहून त्यांचा उर फुगवलेलाचा आहे. त्यामुळे एक व्यक्ती खराब म्हणून सगळेच खराब होत नाही, आणि अनेक चांगले असले तरी एखादा नको असलेला किडा असतोच! आपल्याला तो किडा शोधून सावधान राहायचे आहे; आणि इमानदार पोलीस कर्मचाऱ्यांना सॅल्युट करायचे आहे.*
  हा चित्रपट इमानदार पोलीस कर्मचाऱ्यांना ते किती इमानदारीने काम करतात याची आठवण करून देण्यासाठी आहे, आणि मी इतका निगरगट्ट आणि असंवेदनशील नाही, हे पाहून समाधान व्यक्त करण्यासाठी आहे.
*’जय भीम’ नाव म्हटलं की आपल्याला फक्त एक विशिष्ट जात दिसते. त्या घोषणेत दबलेला संघर्ष व त्या घोषणेतून मिळणारी ऊर्जा कधी अजमावून पहा, जागे व्हाल!*
*”माणूस म्हणून जन्मले*
*माणूस म्हणून जगा..*
*तुम्हाला तुडवत असतील*
*त्यांना इथेच तोडा…!!!”*

✒️लेखक- अमोल चंद्रशेखर भारती,नांदेड(मो:- 8806721206)