गुरू भोजलराम: शिष्य जलाराम!

23

(संत जलाराम बापा जयंती विशेष)

आजही गुरूदेव संतश्रेष्ठ जलाराम बापांची श्रद्धापूर्वक प्रार्थना केल्याने भक्तांच्या समस्त मनोकामना पूर्ण होतात, असे म्हटले जाते. त्यांचे अनुभव ‘पर्चा’ म्हणून संत जलाराम ज्योती नावाने पत्रिकेत छापली जाते. श्रद्धाळू लोक गुरूवारी उपवास करून अथवा अन्नदान करून बापांना पूजत असतात. पावन जयंती दिनी त्यांना श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजींच्या लेखरूपाने कोटी कोटी दंडवत प्रणाम… संपादक

गुरूदेव संतश्रेष्ठ जलाराम बापा हे एक भारतीय संत होते. ते रामभक्त असून ‘बापा’ या नावाने सुपरिचित होते. त्यांचा जन्म दि.१४ नोव्हेंबर १७९९ रोजी गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील वीरपूर गावी झाला. त्यांच्या वडिलाचे नाव प्रधान ठक्कर आणि आईचे नाव राजबाई होते. बापांची आई एक फार मोठी धार्मिकवृत्तीची महिला होती. साधु-संताची ती खुप सेवा करत असे. तिच्या सेवेने प्रसन्न होऊन संत रघुवीरदासजींनी आशीर्वाद दिला, कि तिचा दुसरा प़ुत्र जलाराम हा ईश्वर व साधु-भक्तीच्या सेवेची मशाल बनेल.अवघ्या १६ वर्षांच्या वयात संतशिरोमणी जलारामजींचा विवाह वीरबाईसोबत झाला. परंतु ते लवकरच वैवाहिक बंधनापासून दूर होऊन सेवा कार्यांस लागू इच्छित होते. जेव्हा संत जलारामजींनी तीर्थयात्रेस निघण्याचे ठरविले, तेव्हा पत्नी वीरबाईंनीही बापांच्या कार्यांत सहभागी राहण्याची इच्छा बोलून दाखविली. ती त्यांच्याबरोबर चालू लागली. १८ वर्षांच्या वयामध्ये बापांनी फतेहपूरच्या संत श्री भोजलराम यांचा आपले गुरु म्हणून स्वीकार केला. गुरुवर्यांनी गुरूमाला आणि रामनामाचा मंत्र देऊन त्यांना सेवा कार्यात पुढे धजण्यास सांगितले. तेव्हा संत जलाराम बापांनी ‘सदावर्त’ नामक भोजनशाळा उघडली.

जेथे २४ तास साधु-संत तथा गरजू लोकांना भोजन दान केले जात होते. तेथून कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ शकत नव्हते. ते आणि माता वीरबाई दिवसरात्र मेहनत करत होते.
वीस वर्षांचे होईपर्यंत सरळपणा व ईश्वरप्रेमाची ख्याती चौफेर पसरली होती. लोकांनी तऱ्हे तऱ्हेने त्यांच्या जोर, धीर, प्रेम, ईश्वराची अनन्य भक्ती यांची परीक्षा घेतली. त्यात ते खरे उतरले. त्यामुळे लोकांच्या मनात संतश्रेष्ठ जलाराम बापांच्या प्रती अगाध सन्मान निर्माण झाला. त्यांच्या जीवनात त्यांच्या आशीर्वादाहून अधिक चमत्कार लोकांनी पाहिले. त्यात प्रामुख्याने मुलांचे आजार बरे होणे व निर्धनांचे सधन होणे आदी. त्यामुळे सेवेकऱ्यांची संख्या दुणावली. हिंदू-मुस्लिम सर्वधर्मीय बापांकडून भोजन व आशीर्वाद प्राप्त करत. एकदा तीन अरबी तरूणांनी वीरपूर येथे बापांच्या आग्रहास्तव भोजन केले. भोजनानंतर ते तरूण वरमले. कारण त्यांनी आपल्या बॅगांमध्ये मारलेले पक्षी ठेवले होते. बापांच्या सांगण्यावरून जेव्हा त्यांनी बॅग उघडली, तेव्हा ते पक्षी फड फड करत उडून गेले. एवढेच नव्हे तर बापांनी त्यांना आशीर्वाद देऊन त्यांच्या मनोकामनाही पूर्ण केल्या होत्या.

सेवा कार्यांच्या बाबतीत बापा म्हणत, कि ही प्रभुची इच्छा आहे. हे प्रभुचे कार्य आहे. परमेश्वराने मला हे कार्य सोपविले, म्हणून प्रभू पाहात आहे, कि प्रत्येक व्यवस्था ठीक आहे का? एक वर्षी भयंकर दुष्काळ पडला. त्यावेळी माता वीरबाई तथा स्वतः बापांनी २४ तास लोकांना खाऊ-पिऊ घालून लोकसेवा केली. विरपूर येथेच दोन वर्षांपूर्वी मातेने आणि दि.२३ फेब्रुवारी १८८१ रोजी संतशिरोमणी जलाराम बापांनी प्रार्थना करत आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला. त्यावेळी त्यांचे वय ८१ वर्षे होते.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे पावन जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन !!

✒️संकलक:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी. (संत व संतसाहित्याचे गाढे अभ्यासक.)मु. रामनगर वॉर्ड क्र.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली.भ्रमणध्वनी – ९४२३७१४८८३.