मौजा आडद येथे नव्या स्वरूपातील डिजिटल सातबाराचे वाटप

✒️अमोल उत्तम जोगदंडे(तालुका प्रतिनिधी)मो:-8806583158

उमरखेड(ता.१२नोव्हेंबर):-मौजा आडद येथे नव्या स्वरूपातील डिजिटल सातबाराचे घरोघरी मोफत वाटप मोहिमेअंतर्गत डिजिटल संगणकीकृत सातबारा यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आडद येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .गावचे सरपंच विठ्ठल ठाकरे ,पोलीस पाटील यशवंत कबले,तुकाराम आमले ,किसन कबले, डॉ.पंडित संवगडे, गजानन टाकरस, कैलास धनवे ,गजानन खरात, प्रल्हाद कबले,बालाजी बुरकुले, पांडुरंग कबले,गावचे तलाठी जी.एस.मोळके,तरोडा यथिल तलाठी बि.जे. ढोखळे आणि मंडळाधिकारी यु.यु.जुमडे हे यावेळी उपस्थित होते.

आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. देशाच्या व राज्याच्या आर्थिक जडणघडणीत शेती क्षेत्राचा मोलाचा वाटा आहे .शेतीची संपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी ,यासाठी गाव नमुना नमुना नंबर सातबारा हा महत्त्वाचा दस्तावेज आहे .घर जमीन असो की शेत जमीन या सर्वांची नोंद हि गाव नमुना नंबर सात-बारा उतारावर केली जाते. त्यामुळे खरेदी- विक्रीबरोबरच शेतकऱ्यांना पीक कर्ज, विमा योजना यासह शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सात-बारा उतारा आवश्यक असतो. जमीनीच्या संदर्भात जे २१ प्रकारचे वेगवेगळे नमुने आहेत,त्यातील सात-बारा अत्यंत महत्त्वाचा प्रकार आहे.राज्याच्या महसूल विभागाने ई-फेरफार प्रकल्पाअंतर्गत सामान्य खातेदार व नागरिकांसाठी महाभूमी संकेतस्थळावर डिजिटल सात-बारा उपलब्ध करून दिला आहे. नव्या रूपातील या अद्ययावत उतारा ची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचावी, यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त घरोघरी मोफत सात-बारा वाटप मोहीम सुरू करण्यात आली .महात्मा गांधी जयंती पासून या मोहिमेची सुरूवात झाली आहे .आशा प्रकारचा प्रयोग करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. सातबारा डिजिटल करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेतकऱ्यांला राज्याच्या कानाकोपऱ्यातुन एका क्लिक वर सात-बाराउपलब्ध व्हावा हा आहे.

सोप्या व सुटसुटीत पद्धतीत हा सात-बारा उतारा मिळणार आहे.
यामध्ये क्यु आर कोड, राजमुद्रा असलेला हा नव्या स्वरूपातील हा बदललेला ऑनलाईन उपलब्ध असला तरी अद्याप सर्वच खेड्यामध्ये किंवा ग्रामीण भागात ऑनलाइन उतारा काढण्याची सोय उपलब्ध होईलच असे नाही. तसेच नव्या स्वरूपातील सातबारा उतारा कसा आहे हे शेतकऱ्यांनाही कळावे, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावोगावी शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटप सुरू आहे. या उतार्या सोबत एक प्रतिसाद फॉर्म दिला जात आहे .यामध्ये आपल्या सात-बारा उतार्यात काही त्रुटी, दुरुस्ती असतील तर त्याची माहिती संबंधित तलाठी यांच्याकडे द्यायचे आहे. त्यानुसार नंतर त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य शासनाने ही मोहीम सुरू केली आहे.

संगणकीकृत डिजिटल स्वाक्षरी ने प्राप्त होणार्या या अधिकार अभिलेख विषयक शेतजमिनीचा सातबारा आद्ययावत उताऱ्याच्या प्रती गावामध्ये संबंधित तलाठी मार्फत प्रत्येक खातेदारास घरोघरी जाऊन मोफत देण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना मोफत सातबारा घरपोच वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत तहसीलदारांना नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या असून तलाठी यांच्या मार्फत सातबारा वाटपास सुरुवात झाली आहे. वाटप केलेल्या सातबा-रामध्ये काही त्रुटी किंवा विसंगती असल्यास खातेदाराचा अभिप्राय घेऊन त्याची पुर्तता केली जाईल. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त नव्या स्वरूपातील डिजिटल सातबाराचे मोफत वाटप सुरू आहे एका खातेदारास एकदाचा सात-बारा मोफत मिळणार आहे.

त्यानंतर आवश्यक असल्यास ऑनलाईन पद्धतीने हा सातबारा आपल्याला काढता येणार आहे. त्यासाठी bhulekh.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर जाऊन काढू शकतो. सर्वच शासकीय उपयोगासाठी हे डिजिटल स्वाक्षरी सात-बारा आठ -अ ई उतारे ग्राह्य धरले जाणार आहेत. यासंबंधी महसूल विभागाने एक शासन निर्णय सुद्धा जारी केला आहे. त्यामुळे आता सर्व पतसंस्था शासकीय कार्यालय आणि बँकांचे कार्यालयांमध्ये हा सातबारा उतारा चालणार आहे. माहिती-तंत्रज्ञानाचा या उपयोगाचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेतल्यास त्यांचा वेळ व श्रम वाचणार आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED