खाजगी वाहन चालकांची मनमानी रोखण्यासाठी; आरटीओ अधिकारी एसटी स्थानकात

26

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.14नोव्हेंबर):-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे सर्वत्र आंदोलन सुरू आहे. बीड आगारात मागील दहा दिवसांपासून कर्मचारी संपावर आहेत.दरम्यान बसेस बंद असल्याचा फायदा बहुतांश खाजगी वाहन चालकांकडून होत असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे आरटीओ अधिकार्‍यांच्या उपस्थितीत बीड आगारातून खाजगी गाड्या सोडल्या जात आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्य सरकारने खासगी वाहतुकीस परवानगी दिलीय. मात्र त्याचाच फायदा अनेक खाजगी वाहन चालकांकडून घेतला जात आहे. त्यामुळे हा प्रकार रोखण्यासाठी, आरटीओ कर्मचाऱ्यांनी वाहनांची तपासणी करून चाकरमान्यांचा प्रवास सुखकर केला आहे.जे खाजगी वाहन चालक अतिरिक्त भाडे वसूल करतायत त्यांच्यावर आरटीओ मार्फत कारवाई देखील होत आहे. खाजगी वाहतूक सुरू असली तरी प्रवाशांची काही प्रमाणात का होईना गैरसोय होत आहे. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावावा अशी भावना प्रवाशांनी व्यक्त केलीय.