जगेल तर देशासाठी..” जातकुळीपासून तोडण्याचे षढयंत्र?

25

१४ नोव्हेंबर. सत्यशोधक लहुजी साळवे यांची जयंती. जयंती निमित्त लहुजीबाबांना विनम्र अभिवादन….!!!

लहुजींच्या जयंती निमित्त राज्यभरातील दलित बहुजन समाजातील कार्यकर्ते लहुजींना अभिवादन करत आहेत. सोशल मीडियावर लहुजींचा प्रभाव पाहून बरं वाटलं. प्रभाव असलाच पाहिजे. परंतु कपोलकल्पित इतिहासाचे पारायण करुन नव्हे तर सत्यशोधकी इतिहास मांडून लहुजींचे अजरामर कार्य समाजासमोर आणले पाहिजे. आपण जर सत्यशोधकाला कपोलकल्पित इतिहासात घुसडून मांडणार असू तर ती सत्यशोधक लहुजींची फरफट ठरणार आहे. अशा ह्या हेतूने काही ऐतिहासिक संदर्भ देण्याचा प्रयत्न केला आहे. कारण की, मोठमोठ्या विद्वानांच्या पोस्ट मध्ये “जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी” असे वाक्य लहुजींच्या तोंडी घातल्याचे वाचायला मिळते आहे. हे वाक्य कधी आणि कुणाकडे, कुणासमोर म्हटले आहे किंवा कुठल्या पुस्तकात किंवा कोणत्या इतिहासकाराने लिहून ठेवले आहे कळायला मार्ग नाही. असो, आपण ते माण्य जरी केले तरी खडकीच्या युद्धात इतक्या लहान-लहान लेकरांना घेऊन कोण कशाला गेलं असेल तो स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. लहान मुलांना सैनिक सोबत घेऊन गेले असतीलही कदाचित आणि त्या पेशव्यांच्या सैन्यात लहुजींचे वडील राघोजी साळवे हे धारातीर्थी पडले हे मान्य करून त्यांच्या शौर्याला आपण सलाम करुयात…!!!

मुद्दा आहे सदरच्या लढाई प्रसंगी रणमैदाणावर लहुजी साळवे यांनी घेतलेल्या भीष्म प्रतिज्ञेचा. लढाई होती संस्थानिक पेशवे विरुद्ध ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी. कारण त्या काळी देशासाठी कुणीही लढत नव्हते तर आपापले संस्थान वाचविण्यासाठी झालेल्या लढाया होत्या. कारण त्या काळी कुणीही ‘देशभक्त’ नव्हतं आणि कुणीही ‘देशद्रोही’ नव्हतं कारण देश ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. वसाहती, संस्थाने, साम्राज्ये होती. म्हणून झालेल्या लढाया ह्या संस्थानिकांच्या होत्या.

जसे की,
१. पाणीपतची लढाई-१७६१
मराठा साम्राज्य विरुद्ध बाबर, इब्राहिम लोधी, राजा विक्रमजीत यांच्यात झालेली लढाई.
२. वांदीवाशची लढाई(कर्नाटक)-१७५६-१७६३
इंग्रज विरुद्ध फ्रेंच यांच्यात झालेली लढाई.
३. प्लासीची लढाई(हुबळी, बंगाल)-१७५७
बंगालचा नबाब सिराजउदोला विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेली लढाई.
४. पाणीपतची तिसरी लढाई-१७६१
मराठा साम्राज्य विरुद्ध दुर्राणी साम्राज्य, अवधचे नबाब, रोहिले यांच्यात झालेली लढाई.
५. बक्सरची लढाई-१७६४
ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध नबाब मीर कासिम, अवधचे नबाब शुजा उदौला, मुघल बादशहा शाह आलम, काशीचा राजा बलवंतसिंग यांच्यात झालेली लढाई.
६. मैसूर ची लढाई- १७९९
टिपू सुलतान विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनी, निजाम, मराठे यांच्यात झालेली लढाई.
७. आसईची लढाई-१८०३
मराठा सरदार शिंदे विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनी, बाजीराव पेशवे, पटवर्धन, पाटणकर, निपाणकर, बापू गोखले, मैसूरकर यांच्यात झालेली लढाई.
८. हडपसरची लढाई-१८०२
यशवंतराव होळकर विरुद्ध बाजीराव पेशवे यांच्यात झालेली लढाई.
९. मराठा इंग्रज लढाई दुसरी-१८०३
ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध दौलतराव शिंदे, यशवंतराव होळकर, राघोजी भोसले यांच्यात झालेली लढाई.
१०. महिंदपूरची लढाई-१८१७
ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध होळकर यांच्यात झालेली लढाई.
११. खडकीची लढाई-१८१७
ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध बाजीराव पेशवे यांच्यात झालेली लढाई.
१२. भीमा कोरेगाव लढाई-१८१८
बाजीराव पेशवे विरुद्ध ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेली लढाई.
वरील काही लढाया या ठिकाणी नमुन्यादाखल दिलेल्या आहेत. यावरून स्पष्ट होते भारताच्या भूमीवर झालेल्या लढाया स्वातंत्र्य संग्राम दाखवून आपला वुल्लू सिधा करण्यात येतो त्याला बहुजनांनी बळी पडायला नको.

यातील अनेक लढायात मराठे, पेशवे, निजाम हे इंग्रजांच्या बाजूने लढले आहेत. कारण त्या काळी देश म्हणून कुणीही लढाया करत नव्हतं तर संस्थानिक म्हणून संस्थान वाचविण्यासाठी सोईचे राजकारण, तह, लढाया करत होते परंतु इकडं बहुजन समाजाला मात्र देश या संकल्पनेत अडकवून मुर्ख बनविल्या जात आहे. पेशवे विरुद्ध इंग्रज यांच्यात खडकी आणि कोरेगाव भीमा येथे झालेली लढाई देशासाठी होती तर मग टिपू सुलतान विरुद्ध इंग्रज, मराठे, निजाम यांच्यात झालेल्या मैसूरच्या लढाईला देशासाठी झालेली लढाई माणावं लागणार आहे. मराठा सरदार शिंदे-भोसले विरुद्ध इंग्रज आणि ह्या लढाईत इंग्रजांच्या बाजूनं लढणारे बाजीराव पेशवे, पटवर्धन, पाटणकर, निपाणकर, बापू गोखले यांच्यात झालेल्या आसईच्या लढाईला देखील देशासाठी झालेली लढाई माणावं लागणार आहे.

म्हणजे पेशव्यांनी लढलेल्या लढाया तेवढ्या देशासाठी होत्या आणि शिंदे, भोसले, होळकर, टिपू सुलतान, सिराजउदौला यांनी इंग्रजा सोबत केलेल्या लढाया देशासाठी केल्या नव्हत्या का? परंतु केवळ खडकी अनं कोरेगावच्या लढाईचा ढिंडोरा पिटून ‘देशभक्त’ आणि ‘देशद्रोही’ ठरविण्याची कपटनिती राबविण्यात येत आहे. जातीय ध्रुवीकरणाच्या कपटनितीच्या पालखीला खांदा देण्याचा वेडगळपणा मांगानी करु नये. तद्वतच भिल्ल, रामोशी आदिवासी समाजाने देखील.
सारांश, देशातील मांग, भिल्ल, रामोशी, आदिवासी समूह इंग्रजांच्या विरुद्ध लढला असला तरी परंतु लहुजींच्या बाबतीत खडकीच्या लढाईच्या संदर्भाने “जगेल तर देशासाठी, मरेल तर देशासाठी” वगैरे ची घोकंपट्टी म्हणजे सत्यशोधक लहुजींना महात्मा जोतिबा फुले, सावित्रीमाई फुले, बहुजन उद्धारक राजर्षि शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे यांच्या जातकुळीपासून तोडण्याचे षढयंत्र समजून घेतले पाहिजे.
……
✒️लेखक:-कॉ. गणपत भिसे(लाल सेना,परभणी)मो:-9890946582

▪️संकलन:-नवनाथ पौळ(अंबाजोगाई विभागीय प्रतिनिधी)मो-8080942185