झाडीबोलीतील नव्या वादळाच्या पाऊलखुणा – लिपन

मोरगाड’ ह्या नर्मविनोदी कवितासंग्रहानंतर कवी लक्ष्मण खोब्रागडे यांचा ‘लिपन’ हा दुसरा कवितासंग्रह. जेमतेम तीन महिन्याच्या कालावधी नंतर येणारी ही त्यांची लक्षवेधी कलाकृती. दोन्हींची प्रकृती, प्रवृत्ती भिन्न असली तरी अभिव्यक्ती झाडीबोली या लोकभाषेतूनच झालेली आहे. कविकडे प्रतिभेचा बहुआयामी आणि समर्थ झरा असल्याची ग्वाही या संग्रहातून आपल्याला मिळते. यातील रचनामध्ये आवेग आहे. आक्रोश आहे. दमदार अभिव्यक्ती आहे. सहजता आहे. विद्रोह असला तरी सौजन्यपूर्ण आहे. आदळ आपट किंवा आक्रस्ताळेपणा कुठेही दिसत नाही. यात ‘बापू’वर कविता आहे, ‘रमाई’वर कविता आहे, जातीपातीच्या षडयंत्रावर कविता आहे, बापावरही कविता आहे. मोजक्या प्रतिमा पण अतिशय प्रभावीपणे आलेल्या आहेत.

भाषा हे केवळ एक माध्यम आहे. कवी कसा जगला, काय अनुभवलं, त्यातून नेमकं काय वेचून घेतलं, काय सुटून गेलं आणि त्यानंतर तो कसा व्यक्त झाला, ह्या साऱ्यांचा शब्दरूप आविष्कार म्हणजे त्याचं साहित्य असते. कवी लक्ष्मण खोब्रागडे यांनी व्यक्त होण्यासाठी कविता हे माध्यम निवडलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी ते समर्थपणे हाताळलं सुद्धा.

अंदार वादराचा कदी वाटला न ताप
नंदादीप आयुष्याचा झिजतो रे बाप !

ह्या दोन ओळी पाहिल्या तरी कवीची जीवनविषयक दृष्टी किती सकारात्मक आहे, याचा प्रत्यय येतो.

किटले कान आयकू आयकू
फाटका लुगडा नेसते बायकू

तशीच ही एक अंतर्मुख व्हायला लावणारी कविता आहे. अलीकडे मुक्तछंदाच्या अमर्याद वापरामुळे प्रमाण भाषेतील कवी असोत, की बोली भाषेतील, यमकांच्या बाबतीत बराच सैलपणा जाणवतो. त्यातही आशय पातळ असला की मग ती रचना केवळ ‘ट’ ला ‘ट’ या प्रकारात जाऊन बसते. मात्र खोब्रागडे यांची भाषा आणि यमक यावर जबरदस्त पकड आहे. एवढी पकड भल्याभल्यांना जमत नाही. त्यांना यमक सहज सुचत जात असावे. गेयतेची त्यांना उपजत जाण असावी असे दिसते. क्षमता असूनही बरेच कवी यमक वगैरे प्रकाराकडे फारसे लक्ष देताना दिसत नाहीत. हा प्रकार बहुधा कवितांची संख्या वाढवण्याच्या हव्यासापायी होतो. किंवा कधीकधी व्यक्त होण्याची घाई ही सुद्धा मारक ठरते.

कविता किती लिहिल्या आहेत, त्यापेक्षा कशा लिहिल्या आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे. सर्वांचेच झरे सारख्या ताकदीचे असणार नाहीत. पण जर जगण्यात अस्सलपणा असेल, मातीशी नातं असेल, माणसावर प्रेम असेल आणि हसत हसत आव्हान पेलण्याची दिलेरी असेल, तर त्यातून निर्माण झालेली कलाकृती निश्चितच मौलिक असते. समाजाकडून स्वीकारली जाते. तुकाराम, बहिणाबाई यांच्या कवितांना कुठल्याही समीक्षकाच्या पावतीची गरज पडत नाही. अर्थात प्रत्येकाला तुकाराम, बहिणाबाई होता येत नसलं तरी मूळ प्रतिभा आणि मेहनत या भरवश्यावर प्रामाणिक तपस्या केल्यास निश्चितपणे यश हाती लागू शकते.

सहजता हा या संग्रहातील कवितांचा उल्लेखनिय विशेष आहे. सहजता आणि सोपेपणा हा लोकसाहित्याचा आत्मा आहे. कविता जेवढी साधी, सोपी असेल तेवढी ती समाजाच्या सुखदुःखात भाग होऊन जाते. झाडीबोलीसारख्या भाषेत ज्या सहजेतेने आणि कुणालाही समजेल अशा तऱ्हेने विद्रोहाचा हुंकार कविने जागोजागी पेरून ठेवला आहे, तो आपल्याला थक्क करून जातो.

जुपून नागर, सजवा वकर
बुदीचा मरा फुलू द्या लवकर !!

ह्या कवितेतील हा इशारा बघा..

येकायेकि गारा करते मारा
रोगाराईसाटी दवाई फवारा
माजले सारे खेदाडा डुकर
बुदिचा मरा फुलू द्या लवकर !

या संग्रहातील काही ओळी तर अगदी सुभाषित किंवा दैनंदिन संवादातून स्थान मिळवण्याएवढ्या सहज आणि ताकदीच्या आहेत.

कवीने परंपरागत विषयासोबत इतरही विषय तेवढ्याच ताकदीने पेलून धरले आहे. विटाळ किंवा मासिकपाळी आणि त्यातून येणारा विटाळ सारखी परंपरा किती त्रासदायक आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. काही प्रमाणात शहरी संस्कृतीमधील अनिवार्यता आणि व्यावहारिक सोय म्हणून ती हद्दपार होतांना दिसत असली, तरी ग्रामीण जीवनातून अजून ती घट्ट मुळ धरून आहे. ‘कोनट्यात’ ह्या कवितेत ती अत्यंत प्रभावीपणे आलेली आहे.

दुनिया सारी तुज्यात वसली
काहा आइ कोनट्यात बसली

पोकड स्यास्त्र फालतूस भेव
जलम कोठून घेतला देव ?

असा बोचरा सवाल करतांना कवीच्या लेखणीला आणखीच धार चढते. पण एवढ्यावरच कवी थांबत नाही. तो सरळ सरळ बंड करायचे आवाहन करतो. त्यासाठी केलेली शब्दयोजना, प्रतिकं कमालीची भेदक आणि नेमकी आहेत.

धुडकाव आता कुजल्या चाली
अंधश्रद्धेच्या उतरव पाली
घात स्युदतेचा पिडा घुसली
काहा आइ कोनट्यात बसली !

खोब्रागडे यांच्या कवितेचा महत्त्वाचा विशेष म्हणजे त्या नीटनेटक्या आहेत. मोजक्या ओळी, मोजकीच पण अगदी सूत्रबद्ध कडवी त्यात आहेत. लिहिता येते म्हणून कवितेची लांबी वाढविण्याचा मोह त्यांनी टाळला आहे. नेमकं कुठं थांबायचं किंवा कविता कुठे संपली आहे, याचं भान कविला असायलाच हवं. ते खोब्रागडेंना आहे, यात संशय नाही.

इर मोटी पण तुटका दोर
पाण्यात पडला अडान पोर

यातील अनेक रचना तडाखेबंद आहेत. शब्दकळा खटकेबाज आहे. त्यामुळे कविता लगेच मनाचा ताबा घेतात. कवीचा पिंड सामाजिक आंदोलनावर पोसला असल्याची जाणीव कवितेमधून पदोपदी होत राहते. जगणं आणि कविता एक असल्याचं ते प्रमाण आहे. कविता अस्सल कविताच आहे. ती कुठेही प्रचारकी होतांना दिसत नाही. शब्दकळा जशी अस्सल आहे, तशीच अभिव्यक्ती देखील अस्सल आहे. ही तारेवरची कसरत कवीने सहज सांभाळली आहे.

‘पुस्तक’ ही त्यांची अशीच एक अप्रतिम कविता.

ग्रंथ फाडतो अंदार
भरे डोईत उजेड

अशा ओळींनी सुरू झालेली कविता बघा..

जान गुपन फुलाची
धरा हाती सूर्यमार
जोर भरून पंकात
उडे आबारात घार !

ह्या ओळी थेट बहिणाबाईंची आठवण करून देतात. लक्ष्मण खोब्रागडे यांच्या कवितेचा आवाका फार मोठा आहे. थोडक्यात बोलायचं झालं तर हा एक लांब पल्ल्याचा आणि उज्वल भविष्य असलेला कवी या कवितासंग्रहातून आपल्या भेटीला आलेला आहे. मला खात्री आहे, तो आपल्यालाही हवाहवासा असणार आहे, प्रिय असणार आहे. झाडीबोलीचे उद्याचे भविष्य आहे. मराठी भाषेलाही अभिमान वाटावा, अशी आश्वासक सुरुवात या निमित्तानं झालेली आहे. सामाजिक जाणिवेचा हुंकार हळूहळू ज्वालामुखीत परिवर्तित होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, एवढं आश्वासन ‘लिपन’ या संग्रहाच्या निमित्ताने देताना मला मनापासून आनंद होतो आहे. या संग्रहाचं भरभरून कौतुक होईल, असा ठाम विश्वास आहे.

भावी साहित्य प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा !

✒️ज्ञानेश वाकुडकर(अध्यक्ष)लोकजागर अभियान

महाराष्ट्र, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED