पूला अभावी रस्त्यावर साचलेल्या पाण्याचे जलपूजन करून आंदोलन

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.16नोव्हेंबर):-ओड्यावर पूल नसल्याने तो बांधला जावा याकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्याचे महाराजांच्या हस्ते जलपूजन करून अभिनव आंदोलन करण्यात आले. सोमवारी सकाळी परिसरातील शेकडो ग्रामस्थ मरडसगाव शिवारात उपस्थित होते.मरडसगाव येथून मसनेरवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर नागझरी ओढा आहे. या ओढ्यावर पूल नसल्याने बऱ्याच वर्षापासून ग्रामस्थांची गैरसोय होत आहे .याकडे लक्ष वेधण्यासाठी मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मिसे यांच्या संकल्पनेतून सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली जलपूजन आंदोलन करण्यात आले.

मरडेश्वर संस्थांनचे दत्त गिरी बाबा , देवयमाय संस्थांनचे ह.भ.प. तुळशीदास महाराज देवकर यांनी या आंदोलनात उपस्थित राहून आशीर्वाद दिले. मरडसगावचे सरपंच विक्रमभाऊ काळे, उपसरपंच संजय काळे , नितीन कांबळे,मसनेरवाडी चे पोलीस पाटील बाबुराव मिसे , दामू लोखंडे, नागेश शिंदे, मुंजाभाऊ लांडे ,प्रभाकर महाराज गिरी आदीसह परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते .या रस्त्यावर फुल व्हावा म्हणून मागील दहा वर्षापासून ग्रामस्थ मोठ्या- मोठ्या पुढार्‍याची उंबरठे झिजउन बेजार आहेत.

कंटाळलेल्या ग्रामस्थांनी संस्थानाच्या महाराजा कडे भेट घेऊन आपणच या आंदोलनात सहभागी झाल्याशिवाय हा पुल पूर्ण होणार नाही अशी विनवणी महाराजांना केली. यावरूनदोन्ही महाराज या आंदोलनात सहभागी झाले. गावच्या विकासासाठी आम्ही ग्रामस्थ सोबत असू असा विश्वास महाराजांनी ग्रामस्थांना दिला. या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा ठरावही यावेळी मांडण्यात आला याला. टाळ्या वाजून सर्वांनी अनुमोदन दिले.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED