….हा तर स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान!

31

आपल्या अभिनयापेक्षा वादग्रस्त वक्तव्ये आणि बेफिकिर वृत्तीसाठी ( कु )प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. १९४७ साली मिळालेले हे स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले आहे ; तर २०१४ साली नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर मिळालेले स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे असे बेताल वक्तव्य तिने एका जाहीर कार्यक्रमात केले आहे. तिच्या या वादग्रस्त वक्तव्यांनी देशभरात संतापाची लाट उसळली आहे. कंगनाच्या वक्तव्यावरुन विरोधी पक्षांनी तिला चांगलेच घेरले आहे. तसेच भाजपचे खासदार वरून गांधी, इतिहास तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत नागरिकांनी कंगनाने माफी मागावी अशी मागणी केली आहे. कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर अवघ्या काही मिनिटातच हा राष्ट्रीय विषय झाला. सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवरुन कंगनावर टीकेची झोड उठली. विशेष म्हणजे हे वक्तव्य तिने पद्मश्री स्वीकारल्या नंतर अवघ्या काही तासात केले आहे. एरवी हे वक्तव्य तोंडाळ नटीचं अपरिपक्व वक्तव्य म्हणून अनुउल्लेखाने दुर्लक्षितही करता आलं असतं पण या वक्तव्याकडे मात्र दुर्लक्षित करता येणार नाही. कारण तिने हे वक्तव्य करून राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर, राजगुरू यांसारख्या देशासाठी बलिदान देणाऱ्या व तुरुंगवास भोगणाऱ्या लाखो ज्ञात – अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान केला आहे.

विशेष म्हणजे असे वादग्रस्त केल्यावरही तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची कोणताही भाव दिसत नाही उलट आपण काहीही चुकीचे बोललो नाही आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत असेच तिचे म्हणणे आहे. तिचा हा माज चीड आणणारा आहे. बरे हे तिचे पहिलेच वादग्रस्त वक्तव्य नाही. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून कंगना सतत वादग्रस्त वक्तव्य करत आहे. कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉक डाऊनमध्ये हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता सुशांतसिंग राजपूत याने १४ जून २०२० मध्ये आत्महत्या केली होती त्यावेळी हिंदी चित्रपट सृष्टीतील वंशवादावरुन वाद निर्माण झाला होता. तसेच सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्याच झाल्याचा दावा करण्यात आला होता यात आघाडीवर कंगना होती. तिने व्हिडीओ द्वारे महेश भट्ट, करण जोहर, सलमान खान आणि इतरांवर वंशवादाचा आरोप केला होता. कंगनाने तेंव्हा बरेच वादग्रस्त विधाने आणि दावे केले होते. जस्टीस फॉर सुशांत म्हणून मोहीम सुरू झाली होती. परंतु काही काळानंतर जस्टीस फॉर कंगना झाला होता. कंगनाने सुशांतच्या मृत्यूसाठी महाराष्ट्र सरकारला जबाबदार धरुन उद्धव ठाकरे यांना जाहीर आव्हान दिले होते. वास्तविक या प्रकरणाशी महाराष्ट्र सरकारचा काहीही संबंध नसताना कंगना महाराष्ट्र सरकारवर बिनबुडाचे आरोप करत होती. त्यानंतर तिने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यावेळीही महाराष्ट्रात तिच्याविरोधात संतापाची लाट उसळली होती. कंगना राणावतने लेखक – कवी जावेद अख्तर यांच्या संदर्भात राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर वादग्रस्त विधाने केली होती. या वादग्रस्त विधानांसंदर्भात जावेद अख्तर यांनी कंगनावर मानहानीचा खटला दाखल केला आहे. कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यांनी समाजातील सौहार्दाचे वातावरण दूषित होत आहे.

विनाकारण वादग्रस्त वक्तव्य करून समाजात दुही पेरण्याची तिची ही खोड मोडायालाच हवी. केंद्र सरकार आपल्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने आपण काहीही बोललो तरी चालू शकते असाच तिचा समज झालेला दिसतोय म्हणूनच ती काहीही बरळत आहे पण यावेळेचे तिचे वक्तव्य माफीच्या लायक नाही. हे वक्तव्य करून तिने स्वतंत्र्य सैनिकांचा उपमर्द तर केला आहेच पण देशाचाही अपमान केला आहे म्हणूनच तिच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा व तिला दिलेले राष्ट्रीय पुरस्कार तसेच पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा. कंगनाचा हा पोरखेळ आता थांबवायलाच हवा. कंगनाप्रवृत्ती मुळापासून ठेचायला हवी.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)