क्रांतीगर्भ लघुचित्रपटाचा प्रिमियर शो संपन्न

30

✒️नागपूर(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नागपूर(दि.17नोव्हेंबर):-क्रांतीगर्भ चित्रपटाचा प्रिमियर शो डॉ.बाबासाहेब आंबेडकर उरुवेला कॉलनी नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष इ. झेड. खोब्रागडे सर तर उद्घाटक दादाकांत धनविजय होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नाटककार शालिक किल्लेकर व दिग्दर्शक नागेश वाहुरवघ उपस्थित होते .कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण निर्माता संदीप गायकवाड यांच्या क्रांतीगर्भ चित्रपटाचे कथानक व गीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय संदीप गायकवाड लघुचित्रपटाचे लेखकयांनी केले. ते आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की,भारतीय लघु चित्रपटातून भारतीय एकात्मतेचा संदेश देतांना ज्वलंत विषयावर चिंतन करून निर्माण केलेला क्रांतीगर्भ लघुचित्रपट शेतकरी आंदोलनाचे नवे क्षितिज रुंदावणार आहे .भारतीय समाजातील दोन विचारांच्या संघर्षातून साकारलेला हा लघुपट भारतीय संविधानाची ताकद प्रभावी मांडणारा आहे. उत्कृष्ट काम केलेल्या सर्व कलाकारांचे त्यांनी अभिनंदन केले तसेच म्युझिक डायरेक्टर पारितोष हजारे ,डबिग डायरेक्टर सुबोध आनंद व दिग्दर्शक नागेश वाहुरवाघ यांचे विशेष आभार मानले. या लघूचित्रपटावरील कलावंत अश्विन नाईक ,विकल जिल्हेकर ,देवेंद्र पाल सिंग सिद्धू व पारितोष हजारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शालिक किल्लेकर सर आपल्या भाषणात म्हणाले की क्रांतीगर्भ लघु चित्रपटाच्या माध्यमातून नागपूर नगरीत नवीन निर्माता व दिग्दर्शक मिळाला असून त्यांनी केलेल्या संघर्षाचे प्रतिबिंब क्रांतीगर्भ चित्रपटातून साकार झाले आहे. दिग्दर्शक नागेश वाहुरवाघ आपल्या मनोगतात म्हणाले की, लघु चित्रपट निर्माण करणे मोठे कष्टाचे काम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाची ऊर्जा घेऊन आम्ही हे काम लिलया पेलले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक दादाकांत धनविजय हे आपल्या भाषणात म्हणाले की, क्रांतीगर्भ लघुचित्रपटाच्या माध्यमातून नव्या कलावंतांना वाव मिळाला आहे .आंबेडकरी विचाराची मशाल प्रज्वलित करण्याचे काम नक्कीच करेल अशी मला आशा आहे. कार्यक्रचे अध्यक्ष आपल्या भाषणात म्हणाले की,क्रांतीगर्भ हे नावच परिवर्तन बदलाची क्रांती आहे. या लघुचित्रपटातून सामाजिक न्याय व शेतकऱ्यांची होणारी होरपळ मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. भारतीय संविधान ऊर्जेतून नवा संघर्ष करणारा शेतकरी हाच क्रांतीगर्भाचा खरा नायक आहे.
क्रांतीगर्भ चित्रपटातील सर्व कलावंत व सहकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे भारदार सूत्रसंचालन वीणाताई राऊत यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुधीर बाराहाते यांनी मानले . या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अश्विन नाईक, देवेंद्र पाल सिंग सिद्धू, विकल जिल्हेकर, अरमान खान नेहाल उमरे , चक्षूपाल जामनिक,आचल लोखंडे ,सम्राट अशोक,बबीता डोळस, कुमुद चोखांद्रे यांनी सहकार्य केले.