बोगस डॉक्टरांविरोधात शिरपूर तालुका सरपंच महासंघाचा एल्गार

✒️प्रतिनिधी विशेष(संजय कोळी)

शिरपूर(दि.17नोव्हेंबर):- तालुक्यातील बोगस डॉक्टरांमुळे सर्व सामान्य लोकांचे होणारे नुकसान पाहता ह्यांचा कायमचाच बंदोबस्त करणे बाबत शिरपूर तालुका सरपंच महासंघ तर्फे तालुका आरोग्य अधिकारी श्री राजेंद्र बागुल यांना निवेदन देण्यात आले.

शिरपूर तालुक्यात, विशेष करून आदिवासी बहुल परिसरात मागील काही वर्षांपासून बोगस डॉक्टरांचा धुमाकूळ चालू आहे ज्यामुळे सर्वसामान्य जनता खूप मोठ्या नुकसानीस सामोरे जाईल अथवा समाजातील बहुतांश लोकांना विविध अवयवांचे अपंगत्व येऊ शकते.

ह्या बोगस डॉक्टरांकडे कुठलेही शिक्षण नाहीये, वैद्यकीय व्यवसाय प्रमाणपत्र नाहीये, कोणतीही पदवी नसून अशिक्षित, अडाणी जनतेवर अघोरी व विविध प्रकारचे इंजेक्शन सलाईन द्वारे आदिवासी जनतेवर उपचार करीत आहे. ह्यांना रुग्णाचे आजारही लक्षात येत नाही तरीही औषोधोपचार करतात व परिणामी निदान न लागल्याने रुग्ण दगावत किंवा त्यांचा वाट्याला विविध अवयवांचे अपंगत्व, वंध्यत्व येते.

तालुक्यात खेड्या-पाड्यांचा परिसर मोठा आहे. या वाड्या-पाड्यापर्यंत शासकीय आरोग्यसेवा पोहोचलेली नाही. परंतु बोगस बंगाली डॉक्‍टर मात्र सहजरित्या पोहोचले आहेत. विशेषत: अत्यंत वाजवी शुल्क आकारून औषधोपचार होत असल्याने रुग्णांनाही ते आर्थिकदृष्ट्या परवडते. त्यामुळे रुग्णही नजिकचे प्राथमिक आरोग्य केंद्र वा खासगी क्‍लिनीककडे न जाता, बंगाली डॉक्‍टरांकडून उपचार घेणे पसंत करतो. वाजवीपेक्षा औषधांचा डोस जास्त होऊन, ग्रॅस्ट्रो, पित्त, उलट्यांचा त्रास होऊन बहुतांश वेळी रुग्ण दगावतात. परंतु हे रुग्ण शहरातील शासकीय वा खासगी रुग्णालयापर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे या बंगाली बोगस डॉक्‍टरांच्या बिंगाला वाचा फुटत नसल्याचे वास्तव आहे.

एखाद्या छोटेखानी घरात बोगस बंगाली डॉक्‍टर्सचे क्‍लिनीक चालते. बेकायदेशीररित्या गर्भपात, साथीच्या रोगांवर ऍण्टिबायोटिक गोळ्या व इंजेक्‍शनचा वापर, मूळव्याधीवर आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली उपचार करतात. मात्र आत्तापर्यंतच्या काही कारवाईंमध्ये या बंगाली बोगस डॉक्‍टरांकडे असलेले प्रमाणपत्र खोटेच असल्याचे सिद्ध झाले आहे. परंतु असे असले तरी चोरी छुप्यारित्या या बोगस डॉक्‍टरांचा गोरखधंदा आदिवासीच्या अशिक्षितपणामुळे पोसला जातो आहे.

तालुक्यातील आदिवासी भागासह ग्रामीण परिसरात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टराचे जाळे पसरले आहे. शिरपूर तालुकातील आदिवासी भागातील लोकसंख्या एका दशकात दुपटीने वाढली आहे.त्यामुळे साहजिकच आरोग्याच्या बाबतीत डॉक्टरांची गरज भासते.ग्रामस्थ रुग्णांची गरज लक्षात घेऊन या गावांमध्ये बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान बसवले. कोणताही वैद्यकीय परवाना नसताना हे तथाकथित डॉक्टर रुग्णांच्या जीवनाशी खेळत आहेत. सर्रास विविध प्रकारची इंजेक्शन्स सलाइन दिली जात आहेत.

बोगस डॉक्टर रुग्णांची कुठल्याही प्रकारची तपासणी न करता रुग्णांना औषधींचा ओव्हर डोस देतात म्हणून रुग्ण एक-दोन दिवसात बरा होतो. पण काहींना या ओव्हर डोसचा त्रास होवून रुग्णांना शहरातील मोठ्या दवाखान्यात उपचारासाठी जावे लागते व या रुग्णांना मानसिक त्रास व आर्थिक फटका बसतो. म्हणून शासनाने या बोगस डॉक्टरावर कायमस्वरूपी बंदोबस्त केला पाहिजे म्हणून शिरपूर तालुका सरपंच महासंघा तर्फे निवेदन देण्यात आले.

निवेदनावर शिरपूर तालुका सरपंच महासंघ अध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, महिलाध्यक्ष प्रियंका अरविंद पावरा, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सचिन राजपूत, कार्याध्यक्ष रोशन सोनवणे, कोषाध्यक्ष नाना वाघ, तालुका संपर्क प्रमुख चंद्रकांत पाटील, संघटक सोमा पाटील, महिला उपाध्यक्ष सौ उज्वलाताई पाटील, जातोडा सरपंच रत्नाबाई रावसाहेब धनगर, रुदावली उपसरपंच पितांबर पाटील, राजेंद्र भिल यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

महाराष्ट्र
©️ALL RIGHT RESERVED