तीन कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी सरकारचा निर्णय- शेतकरी आंदोलनाचा ठरला ऐतिहासिक विजय!

28

✒️प्रतिनिधी गडचिरोली(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.१९नोव्हेंबर):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत पाशवी बहुमताच्या जोरावर घाईगडबडीने मंजूर केलेले शेतकरीविरोधी ३ कृषी कायदे रद्द करण्याची मोठी घोषणा आज त्यांच्या भाषणातून केलेली आहे. गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून केलेल्या या घोषणेचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. किसान आंदोलनाच्या लढ्या्तील हा पहिल्या टप्प्याचा विजय आहे. मागील एक वर्षापासून सीमेवर बसून एल्गार पुकारलेल्या शेतकऱ्यांमधून ज्या सुमारे ७०० शेतकऱ्यांनी आपले प्राण गमावले त्यांना शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व क्रांतिकारी अभिवादन करण्यात येत असल्याचे शेकाप नेते भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे.

प्रसिद्धीपत्रकात भाई रामदास जराते यांनी म्हटले आहे की, संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी आंदोलनाच्या तीन मुख्य मागण्यांपैकी केंद्राने पारित केलेले ३ कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा आज पंतप्रधानांनी केली. परंतु त्याचबरोबरीने किमान आधारभूत किमतीचा (MSP) केंद्रीय कायदा व्हावा व प्रस्तावित वीज विधेयक रद्द करण्यात यावे या किसान आंदोलनाच्या प्रमुख मागण्या अद्यापही शिल्लक आहेत. आजची घोषणा हा पहिल्या टप्प्यातील विजय आहे. कृषी कायदे जोवर संसदेत प्रत्यक्ष रद्द होत नाहीत तसेच जोपर्यंत सरकार कृषी आंदोलनाच्या इतर महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील ही शेतकऱ्यांची भूमिका असून मोदी सरकारचा संपूर्ण अहंकार उतरविण्यात देशातील शेतकरी यशस्वी होतील असा आशावादही भाई रामदास जराते यांनी व्यक्त केला आहे.