शहरातील आस्थापनांवर लागले स्टिकर- लसीकरण करून घेण्यासाठी सेवा पुरवठादारांच्या प्रमाणपत्राची तपासणी

28

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(ता.१९नोव्हेंबर):-कोरोनाला हद्दपार करण्यासाठी १०० टक्के लसीकरण आवश्यक असून, लोकांच्या सतत संपर्कात असलेल्या सेवापुरवठादारांची तपासणी करून घेण्यात येत आहे. ज्या आस्थापनाधारकांनी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, अशा ठिकाणी लाल, तर संपूर्ण लस घेतलेल्या ठिकाणी हिरव्या रंगाचे स्टिकर लावण्यात येत आहेत.

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात नागरिकांच्या व्यापक आरोग्य हितासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेने कठोर पाऊल उचलले आहे. फेरीवाले, सेवापुरवठादार यांनी लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र दाखवावे, अन्यथा बाजारात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला. औद्योगिक वसाहती, उद्योग समूह, खासगी कार्यालय या ठिकाणचे कर्मचारी, कामगारांनी किमान पहिला डोस घेतल्याचा पुरावा दाखविणे बंधनकारक असून, वेगवेगळ्या उद्योग समूहात काम करणाऱ्या कामगारांना कामावर घेताना, मजुरांना काम देताना प्रत्येकाचे दोन डोस झाले आहे की नाही, याची खातरजमा केली जात आहे.

जनतेशी सतत संपर्क येणाऱ्या प्रत्येक सेवापुरवठादार, फेरीवाले, भाजीविक्रेते यांनी लसीकरण करणे बंधनकारक आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या झोननिहाय पथकाद्वारे लसीकरण प्रमाणपत्र तपासणी करण्यात येत आहे. झोन क्र. १ मधील पथकाने सेवा पुरवठादार दुकानात जाऊन लसीकरण करून घेण्यासाठी तपासणी केली आणि लस तात्काळ घेण्याच्या सूचना दिल्या. झोन २ मध्ये व्यवसायिक, फळ, भाजी विक्रेते, पाणीपुरी, व इतर सर्व व्यापारी यांना भेटी देऊन लसीकरण करण्यासाठी सूचित करण्यात आले आहे.झोन क्र. ३ अंतर्गत क्षेत्रात बंगाली कॅम्प भाजी मार्केट, मच्छिमार्केट, बल्लारशा रोडवरील जूनौना चौक भाजी मार्केट व बंगाली कॅम्प भाजी मार्केट सेवा पुरवठादार यांच्या दुकानात जाऊन लसीकरणाबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. बाबुपेठ येथील राजाभाऊ खोब्रागडे लसीकरण केंद्र व सावित्री फुले लसीकरण केंद्र येथे हातठेलाधारकांचे लसीकरण करून घेण्यात आले.

शहरात लसीकरण करून घेण्याबाबत व्यापाऱ्यांना सूचना देऊन लेखी स्वाक्षरी घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. जे दुकानदार आणि कामगार लस घेतलेली नाही, असे तपासणीत आढळून आल्यास त्या दुकानावर लाल रंगाची स्टिकर लावण्यात येत आहे. “या दुकानात काम करणाऱ्या लोकांनी अजूनही कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस घेतलेली नाही. ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व आपल्या जबाबदारीवर प्रवेश करावा”, असा संदेश या स्टिकर्सच्या माध्यमातून देण्यात येत आहे.