मी महापातकी; संपर्क माझा घातकी!

32

(शास्त्र प्रचितीच्या चष्म्यातून)

अध्यात्म ज्ञान आणि विज्ञान हा काही म्हातारपणीचा विषय नव्हे. ते अवगत करण्यासाठी फार मोठी साधना, अभ्यास, श्रम व शक्ती पणाला लावावी लागते. जिर्ण-सिर्ण थरथरते शरीर ते करणे शक्य नाही. अगदी तारुण्यातच आपल्याला निरंकार प्रभू परमात्मा ओळखून त्याचे आपल्याला अंगसंग दर्शन करता येऊ लागले. हे मी माझे अहोभाग्य समजतो. काही ईश्वरभक्तांना हेच ज्ञान बालवयातच मिळते, ते सर्वात मोठे भाग्यवान ठरतात. ज्ञानचक्षूने त्या या पांडुरंग- परमेश्वराचे दर्शन घडते. असे निरंकारी जगताचे शहंशाह अवतारसिंहजी महाराज म्हणतात-

“मैं आखां मैं रब नूं पाया लोकी मनदे गल नहीं|
अपणी बीती आप सुणावां इस विच कोई छल नहीं|
मैं एह जीन्दे जी प्या आखां मुक्ति लोको पा लई ए|
जनम मरन दी फाही लोको अपणे गल चों लाह लई ए|
मेरे ब्यान ने हलफ़िया लोको मैं हुण जमणा मरना नहीं|
कहे अवतार उस धर्मराज तों इस मेरी रूह डरना नही|”
(सम्पूर्ण अवतार बाणी: पद क्र. २१४)

मला ही उपलब्धी झाली असली तरी माझा सहवास मात्र इतर जीवांना प्राणघातक ठरत आहे, असे म्हणणेच यथोचित राहिल. अल्पायुष्यात म्हणजेच पन्नाशीत माझी सहधर्मचारीणी- प्रिय पत्नी सेवादार भगिनी संत आशाताई ही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन ब्रह्मलीन झाली. मिण्टू नावाचा पहिला हुशार मांजर दोन वर्षात तीन कुत्र्यांच्या हल्ल्यात गतप्राण झाला. त्यानंतर दुसरा मिण्टू मांजर अवघ्या दीड महिन्यात उलटीचे कारण घडून मृत्युमुखी पडला. किती मोठे माझे वाईट सहचार म्हणावे? मी मात्र महापातकी सगळे दुःख व विरह सहन करत जगत आहे. हे पांडुरंग, माझा जीवघेणा संग का आहे गा? असा मी प्रतिप्रश्न त्या परमपित्या परमात्म्यास करणे, साहजिकच आहे. जगदगुरु संतश्रेष्ठ तुकारामजी महाराज मुक्तीस नाकारून जन्मास पाठवावे व तेथे संतसंगाची व्यवस्था लावावी, अशी परमेश्वरास विनवणी करतात-

“न लगे मुक्ती धन संपदा।
संत संग देई सदा।।
तुका म्हणे गर्भवासी।
सुखे घालावे आम्हासी।।”

माझ्या केसालाही धक्का न लागू देता माझी प्रिय पत्नी बाजार-हाटापासून सर्व कामे व व्यवहार चोख सांभाळत होती. घरातील व बाहेरील संपूर्ण जबाबदारी ती खंबीरपणे पेलत होती. तर दोन्ही जातीचे मांजर हे मुके प्राणी असूनही ते सुमिरणाकरीता चटई अंथरताच पुढ्यात येऊन बसत होती. ती शहाण्या माणसासारखी मलमूत्र विसर्जन स्वतःच बाहेर जाऊन करत असत. देवाने अशा आपल्या संपर्कातील गुणवान जीवांना लवकर घेऊन गेल्यावर प्रत्येकालाच त्याचा खुप राग येतो आणि दुःखाने हृदय पिळवटून निघते. अगा पांडुरंगा! पालट माझ्या जीवघेण्या संगा, आर्त हाक बाहेर पडते. कारण लोकांच्या उलटसुलट शब्दांचे मार खावे लागतात. तेव्हा तेव्हा तर मन अधिकच गुदमरून जाते. पदरी आध्यात्मिक ज्ञान- ब्रह्मज्ञान असल्या कारणाने सर्व काही सहन करण्याची शक्ती सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराजांच्या कृपेने वेळोंवेळी संचरत असते, हे मात्र चांगले आहे. संतशिरोमणी कबीरजी महाराज आमचे डोळे उघडतात-

“दोष पराए देख कर, चला हसंत हसंत!
अपने दोष न देखई, जिनका आदि न अन्त!!”

येथे एका कथेचा दृष्टांत तंतोतंत लागू पडतो. ती कथा अशी- एकदा नारद मुनी भोलेनाथास संतसंगतीचा महिमा विचारला. भोलेनाथाने सांगितले, की अमुक जागी सरडा आहे, त्यास विचार व तसे कळव. नारदमुनी सरड्याजवळ गेले व विचारू लागले. तो त्यांच्या जवळ येऊन मेला. दुसऱ्यांदा त्यांना एका श्रीमंताच्या पोपटाला विचारण्यास पाठविले. पोपटही काही न सांगताच मृत्यू पावला. नंतर एका घरच्या नवजात शिशुकडे पाठविले. त्याने मागील सर्व जन्मांबद्दल कथन केले व म्हटले, की ब्रह्मर्षी नारद महाराजांच्या पावन संगतीमुळे आपले सरडा व पोपट यांच्या जन्मांतून झटपट मुक्ती मिळून मानवजन्म मिळाला व त्यातूनही जीवनमुक्ती लवकरच मिळून आता मोक्ष पदाला नक्कीच जाईल. भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या रूपात अर्जुनास दिव्यज्ञान पटवून दिले-

“सर्व जन्मांच्या शेवटी,
मनुष्य जन्म पावे पाठी।
त्याउपरी उत्तम किरटी,
म्या रचलीच नाही।।”

मनमोहक सृष्टी रचनेत मनुष्य सर्वांवर अधिसत्ता गाजवितो. नरजन्मच सर्वजन्मांचा राजा शोभतो. चौऱ्यांशी लाख जीवयोनीत फक्त एकमात्र नरजन्मच भोतिक प्रगति साधक आहे. या जन्मात मानवाला ब्रह्मज्ञान, भक्ती आणि मोक्ष साधले पाहिजे. जन्ममरणाच्या येरझारा फक्त या एकाच जन्मातून तोडता येतात. संतश्रेष्ठ तुलसिदासजी महाराजांनी वर्णन करताना म्हटले आहे, की भक्तांवर विशेष कृपा करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्रजी युगानुयुगे साकार शरीर अर्थात मानवरुप धारण करतात. त्याद्वारे ते ज्ञान, भक्ति आणि मुक्ती यांचा प्रचार-प्रसार करतात. प्रभू रामचंद्रजी म्हणतात-

“मम माया सम्भव संसारा।
जीव चराचर विविध प्रकारा।।
सब मम प्रिय सब मम उपजाए।
सबते अधिक मनुज मोहि भाए।।”
[पवित्र रामचरित मानस: ७: ८६: ३]

निरंकारी बाबा संतशिरोमणी युगदृष्टे हरदेवसिंहजी महाराज हे सद्गुरूपदी विराजित होते. तेव्हापासून आपला संपूर्ण परिवार सद्गुरूंच्या छत्रछायेखाली आहे. मीच मोठा ब्रह्मज्ञानी आहे. म्हणून माझ्या सान्निध्यातील जीव जीवनमुक्त होत आहेत, असे मी मुळीच म्हणत नाही. तर मी एक महापातकी असल्यामुळे माझा पापप्रभावच इतर जीवांचा प्राण घेत आहे, असे मी समजतो. एक नासका आंबा इतर सर्व आंब्यांना नासवतो, हे एक सर्वांनी अनुभवलेले सुपरिचित उदाहरण आहे.

“मोह माया के जाल से बाहर आ जाना ही मुक्ति हैं।
मुक्ति को जीवन के रहते पा जाना ही मुक्ति हैं।
कहे ‘हरदेव’ कि गुरू ज्ञान से मिला जिसे परमात्मा।
आवागमन की कैद से वो मुक्त हुई हैं आत्मा।”
(सम्पूर्ण हरदेव बाणी: पद क्र.१४७)

बालक पडल्याशिवाय त्याला पडतो हे कळत नाही. त्याला अग्नीचे हाताला चटके बसल्याविना भाजण्याची भीती वाटत नाही. अगदी तसेच हे आध्यात्मिक ज्ञानाच्या प्रचिती आहेत. कारण अनुभवाचा दाखला हा हवाच!

✒️चरणरज:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी(आध्यात्मिक ज्ञान-विज्ञानाचे गाढे अभ्यासक-विश्लेषक)द्वारा- प. पू. गूरूदेव हरदेव कृपानिवास.मु. रामनगर वार्ड नं.२०,पो. ता. जि. गडचिरोली.मधुभाष- ९४२३७१४८८३.