ताडोबाच्या कोलारा जंगलात वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी

🔺ताडोबा कोलारा, चंद्रपुर(कोअर झोन मधील घटना )

✒️नेरी प्रतिनिधी(नितीन पाटील)

नेरी(दि.20नोव्हेंबर):-ताडोबा व्याघ्र अभयारण्यामध्ये सुरू झालेल्या वन्य प्राणी गणनेसाठी कर्तव्यावर असलेल्या एका महिला वनरक्षकावर माया नावाच्या वाघिनीने प्राणघातक हल्ला केला.

यामध्ये ही महिला वनरक्षक ठार झाल्‍याची घटना आज (शनिवार) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास कोलारा गेट जवळ घडली. स्वाती नानाजी ढोमणे (वय 31) असे महिला वनरक्षकाचे नाव आहे. महिला वनरक्षक ठार झाल्‍याच्या घटनेने ताडोबा व्याघ्र अभयारण्यात एकच खळबळ उडाली.

19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत वन्यप्राणी गणना

व्याघ्र पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा व्याघ्र अभयारण्यामध्ये 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2021 या कालावधीत वन्यप्राणी गणना होत आहे. प्राण्यांची गणना करण्याकरिता ट्रांजिस्ट लाईन टाकण्याचे काम ताडोबा अभयारण्यातील पाणवठ्यावर सुरू आहे. कोलारा गेट जवळील कोअर झोनमध्ये पाणवठा 97 जवळ ट्रांजिस्ट लाईन टाकण्याचे काम सुरू होते, त्यामुळे आज शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वनरक्षक स्वाती नानाजी ढोमणे ह्या सातारा या गावातील मजूर राजेश ननावरे,निखिल बागळे,व नागोसे या चौकीदारासह कर्तव्यावर गेल्या.

कोलारा गेट जवळ कोअर झोनमध्ये पाणवठा 97 कडे जात असताना जवळपास 200 मीटर अंतरावर अचानक समोर वाघीण दिसली त्या मुळे वनरक्षक यांनी जागेवर मजुरासोबत थांबली समोर हैशी पर्यटक वाघिणीचे फोटो काढीत असल्यामुळे तिच्या मार्गात आडकाठी येऊ नये या करिता त्या थांबून राहिल्या तिचा रस्ता चुकवून बाजूने जाण्याचा प्रयत्न करताच गवतातून सरळ वाघिणीने महिला वनरक्षकावर हल्ला चढविला.वाघिणीने स्‍वाती यांना जंगलात ओढत नेवून वन क्षेत्र क्र 96 मध्ये नेत ठार केले असल्याचे खात्रीदायक माहिती पुढे आली आहे. त्यानंतर ती वाघिण पळून गेली. नेहमी पर्यटकांना भूरळ घालणा-या ह्या वाघिणीने आज अचानक रौद्र रूप धारण करून वनरक्षकालाच ठार केल्याची माहिती ताडोबात पसरताच एकच खळबळ उडाली.सदर घटनेची माहिती ताडोबा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना झाली या वेळी उपसंचालक गुरुप्रसाद,खोरे साहेब ,शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी,पोलीस स्टेशन चिमूर येथील पोलीस विभागांनी घटनास्थळी येऊन पहाणी केली. मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून पंचनामा करण्यात येत आहे.या घटनेने ताडोबातील वन कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चार वर्षांची मुलगी आई विना पोरकी

आज घडलेल्या वाघाच्या हल्यात ठार झालेल्या स्वातीला चार वर्षीची मुलगी असून तिला घरी ठेऊन आपल्या कामावर गेल्या होत्या आणि त्यात त्या महिला वनरक्षक वर वाघिणीने हल्ला करून ठार केले आहे,या घटनेमुळे चार वर्षांची मुलगी आई विना पोरकी झाली आहे

महाराष्ट्र, विदर्भ
©️ALL RIGHT RESERVED