महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडणार — बाळासाहेब मोरे

26

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

बीड(दि.20नोव्हेंबर):-या वर्षीच्या पावसाने गेल्या वीस वर्षातील सर्व विक्रम मोडीत काढले त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले खरीप हंगामात सहा सात वेळेस अतिवृष्टी होऊन पिकांचे व शेतीचे अतोनात नुकसान झाले मात्र पाऊस भरपूर झाल्यामुळे तलाव, विहिरी तुडुंब भरून नदी नाल्या खळखळ वाहताना बघून बळीराजा सुखावला कारण खरीप पिके हातची गेली असली मुबलक पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे रब्बी पिके शंभर टक्के पदरात पडतील याची खात्री उराशी बाळगून अनेक अडचणींना सामोरे जात शेतीमध्ये जसाजसा वापसा निर्माण होईल त्याप्रमाणे ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांची पेरणी करत मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करून भाजीपाल्यांचे लागवड केली आहे.

सगळीकडे मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने सर्वच पिकांना विद्युत पंपाने व्यवस्थितपणे पाणी देऊन मोठ्या प्रमाणावर उत्पादन काढता येईल अशी अपेक्षा उराशी बाळगून विद्युत मोटारीने पिकांना पाणी देण्याचे काम सुरू केले मात्र अचानक महावितरण कडून शक्तीचे विज बिल वसुलीसाठी विद्युत पंपाचे चालू कनेक्शन तोडण्याचा फतवा निघाला असून अशा अचानक निघालेल्या आदेशामुळे शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे वास्तविक पाहता विद्युत पंपाची वीज तोडण्यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांना नोटीस देणे बंधनकारक असते मात्र नोटीस न देता किंवा कसल्याही प्रकारची पूर्वकल्पना नसताना सरसकट डीपी कट करण्याच्या मोहिमेबद्दल शेतकरी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

शेतकरी वर्गणी करून नवीन डीपी बसवतात, वायर, डीपी तील तेल, फ्यूज, पोल, विद्युत तारा आदी सर्व बाबी विकत आणून बसवतात महावितरण 18 तास विद्युत पुरवठा करण्याच्या पोकळ गप्पा मारते प्रत्यक्षात मात्र एक तास सुद्धा सलग वीज पुरवठा अखंडित राहत नाही वीज पुरवठा सुरू झाल्यापासून तो खंडित होईपर्यंत सतत विजेचा लपंडाव सुरू असतो त्यामुळे नजरेसमोर पिकांची होणारी होरपळ बघून शेतकऱ्यांचे काळीज तुटत आहे मात्र महावितरणला किंवा राज्य सरकारला याचे कसलेही देणेघेणे नाही त्यामुळे लवकरच बीड जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीने बाळासाहेब मोरे पाटील बीड तालुकाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा संकल्प शेतकरी बांधवांनी केला आहे तसेच माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व पालक मंत्री बीड या सर्वांना सक्तीची वीज वसुली सुरू केल्याबद्दल पोस्टाने पुष्पहार पाठवण्यात येणार आहेत व नंतर महावितरणच्या विरोधात निदर्शने, बोंबा मारो आंदोलन, धरणे आंदोलन, पुंगी बजाव आंदोलन, रास्ता रोको आंदोलन, अधीक्षक अभियंता बीड, कार्यकारी अभियंता बीड, उप अभियंता उपविभाग बीड या सर्वांना गनिमी काव्याने तोंडाला काळे फासणे, बांगड्यांचा आहेर देणे आधी स्वरूपाची तीव्र स्वरूपाची आंदोलने जोपर्यंत शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत करण्यात येतील याची प्रशासनाने नोंद घ्यावी व या प्रसंगी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे व महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर राहील.।