जय भीम चित्रपटातील अभिनेता सुर्यावर हल्ला करणाऱ्याला एक लाख देण्याची घोषणा ?

32

🔺पोलिसांनी वाढवली घराची सुरक्षा…कारवाई करण्याची मागणी

✒️चक्रधर मेश्राम(विशेष प्रतिनिधी)

मुंबई(दि. 21नोव्हेंबर):-पट्टाली मक्कल काचीच्या पदाधिकाऱ्याने ” जय भीम ” चित्रपटातील अभिनेता सुर्यावर हल्ला करणाऱ्याला एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अभिनेत्याच्या घरी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सूर्याच्या चेन्नईतील निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पीएमकेचे पदाधिकारी सीतामल्ली पलानीसामी यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला जय भीम हा चित्रपट वन्नियार समाजाच्या चित्रणामुळे वादात सापडला आहे.

राजधानी चेन्नईतील अभिनेत्याच्या निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी व्हीसीकेचे प्रमुख थोल थिरुमावलवन यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा जेव्हा पीएमके आपला राजकीय आधार गमावतो तेव्हा ते वाद निर्माण करतात. ते सूर्याला धमकवतच नाहीत, तर ते लोकशाही आणि संविधानाला धोका आहे. तामिळनाडूतील सर्व लोकशाही शक्ती पीएमकेला विरोध करित आहेत. अशा समाजकंटकांवर पोलिसांनी ताब्यात घेवून तातडीने कारवाई करावी. अशी सर्वत्र प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत.

मायलादुथुराई पोलिसांनी बुधवारी पीएमकेच्या कार्यकर्त्याविरुद्ध सूर्याला धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. मायलादुथुराई नगर पोलिसांनी पीएमकेचे जिल्हा सचिव ए पलानीस्वामी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या पाच कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये अजामीनपात्र तरतुदींचाही समावेश आहे. अभिनेत्यावर हल्ला करणाऱ्याला एक लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्याच्या घोषणेवर पोलिसांनी ही कारवाई केली.