…तर या महानगरपालिकाही स्वच्छ भारत अभियानात अग्रेसर होताना दिसतील?

मध्यप्रदेशातील इंदोर या शहराला देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेशची औद्योगिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदोरमध्ये दररोज बारा हजार टन कचरा निर्मिती होते तरीही शहरात स्वच्छता राखण्यात प्रशासकीय अधिकारी यशस्वी ठरलेत. इंदोर शहराने सलग पाचव्या वर्षी देशातील सर्वात सुंदर शहर हा मान मिळवत १२ कोटी रुपयांचा सफाई मित्र आणि ५ स्टार रेटिंगचा पुरस्कार मिळवला आहे. दिल्लीत झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘स्वच्छ शहर सर्व्हेक्षण २०२१’ मधल्या विजेत्या शहरांचा गौरव करण्यात आला. स्वच्छ शहराच्या यादीत इंदोर पाठोपाठ गुजराथमधल्या सुरत शहराने दुसरा तर आंध्रप्रदेश मधील विजयवाडा शहराने देशातील तिसरे सर्वात स्वच्छ शहर हा पुरस्कार पटकावला. महाराष्ट्रासाठी आनंदाची बाब म्हणजे या स्वच्छ भारत मिशन अभियानात नवी मुंबई महानगरपालिकेला १० लाख ते ४० लाख लोकसंख्येच्या वर्गात देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पहिला क्रमांक मिळाला आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेला याआधीही हा पुरस्कार मिळाला आहे. यापूर्वीही या महानगरपालिकेने स्वच्छतेत आघाडी राखली आहे. ग्रामीण भागातील सुंदर शहर म्हणून महाराष्ट्रातील विटा शहराची स्वच्छ शहर म्हणून निवड झाली. स्वच्छ शहर पुरस्कार मिळवून दिल्लीत महाराष्ट्राची पताका फडकवणाऱ्या नवी मुंबई आणि विटा शहरांचे मनापासून अभिनंदन! शहर स्वच्छ ठेवण्यासाठी या शहरातील अधिकारी, पदाधिकारी आणि नागरिकांनी जे प्रयत्न केले त्याचे कौतुक झालेच पाहिजे. देशभरात इंदोर सारख्या महानगराला जमते, नवी मुंबईला जे जमते तसे राज्याची राजधानी असलेल्या मुंबई, उपराजधानी नागपूर, विद्येचे माहेरघर व राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे, औद्योगिक शहर पिंपरी चिंचवड, ठाणे, औरंगाबाद अशा मोठ्या नागरपालिकांना स्वच्छतेबाबत आघाडी घेणे का जमत नाही? या महानगरपालिका स्वच्छतेबाबत कायम मागे असतात. स्वच्छ भारत अभियानात या महानगरपालिका कोठेच नसतात. वास्तविक या महानगरपालिका देशातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जातात. शहर स्वच्छतेसाठी लागणारी आवश्यक साधने आणि मनुष्यबळ या महानगरपालिकांकडे मुबलक प्रमाणात आहे तरीही स्वच्छ भारत अभियानात या महानगरपालिका मागे पडतात ही गोष्ट महानगरपालिकेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांसाठी भूषणावह नाही.

आपली महानगरपालिका या स्पर्धेत मागे का? याचा विचार या महानगरपालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी करायला हवा. अधिकारी व पदाधिकाऱ्यांची उदासीनताच याला कारणीभूत आहे. या महानगरपालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी मनावर घेतले तर या महानगरपालिकाही या स्पर्धेत बाजी मारतील फक्त त्यासाठी सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी तशी इच्छाशक्ती दाखवायला हवी. या शहरातील नागरिकांनीही शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी फक्त महानगरपालिकेची नसून आपलीही आहे अशी भावना ठेवून शहर स्वच्छ राखण्यास महानगरपालिकेच्या प्रयत्नांना साथ दिल्यास या महानगरपालिकाही या अभियानात अग्रेसर होताना दिसतील.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा पुणे)मो:-९९२२५४६२९५

पुणे, महाराष्ट्र, लेख, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED