स्वातंत्र्य काय बिनफुकाचे आहे काय?

24

हजारो वर्ष राजेमहाराजे,त्यानंतर परकीय सत्तांच्या गुलामीखाली वावरलेल्या देशाला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते काय बिनफुकाचे आहे काय? दिडशे वर्ष इंग्रजांच्या गुलामीतून जे स्वातंत्र्य मिळवले आहे ते काय बेमतली आहे काय?त्या स्वातंत्र्य लढ्याला,स्वातंत्र्य चळवळीला काहीच अर्थ नाही काय?त्या स्वातंत्र्याचे मोल असे काहीच नाही का? असे अनेक प्रश्न पडण्याचे कारण म्हणजे गत काही वर्षापासून काही विशिष्ट विचारसरणी कडून स्वातंत्र्याचा लढा लढणारे स्वातंत्र्य सैनिक, क्रांतीवीर, महापुरुष यांच्यावर जाणीव पुर्वक शिंतोडे उडवून स्वातंत्र्याच्या समरकाळास गालबोट लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत.त्यांचे योगदान नगण्य असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इतिहासावर हल्ले केले जात आहेत.

स्वातंत्र्याचा लढा कोणा एका व्यक्तीने वा कोणा एका विशिष्ट विचाराने लढला नसून त्या पवित्र समरकुंडात संपूर्ण देशवासियांनी आपला वाटा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे उचलला आहे. जातपात सोडून, धर्माच्या पलीकडे जाऊन हा लढा लडला गेला आहे.आणि आत्ताचे काही बिनविचारी उपटसुंभ लोक स्वातंत्र्य लढ्याला काळा डाग लावण्याचा प्रयत्न करत आहेत.भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, अशफाख खान,चाफेकर बंधु,मदनलाल धिंग्रा, राणी लक्ष्मीबाई,मंगल पांडे,उमाजी नाईक,अशी कितीतरी नावे आहेत ज्यांनी आपल्या प्राणांचे बलीदान दिले आहे.देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या क्रांतीकारकांनी सशस्त्र लढा देऊन इंग्रजी सत्तेला हादरे देण्याचे काम केले आहे. मग आज आपण जर फक्त यांचे विभाजन जातीधर्माच्या चष्म्यातून करु लागलो तर त्यांच्या त्यागाशी आपण बेईमानी करत नाही का? का आपणास त्यांनी सांडलेल्या रक्ताचा विसर पडत आहे.

त्यावेळेस त्यांना जो मार्ग योग्य वाटला तो मार्ग त्यांनी निवडला आणि मानगुटीवर बसलेल्या सत्तेला खाली उतरून फेकण्याचा प्रयत्न केला.मग त्यासाठी 1857 चा लढा असो वा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद सेना असो,त्याचबरोबर चंद्रशेखर आझादांची संघटना असो यांचे योगदान देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हिमालयासारखे आहे. लोकमान्यांचा लढा आपणास विसरता येईल का?उतारवयात सायमन कमीशनचा विरोध करताना लाठीहल्ल्यात जखमी होऊन प्राणाचं बलिदान देणाऱ्या लाला लजपतरायच्या त्यागाला विसरता येईल का? त्यांच्या बरोबर तेवढ्याच ताकदीने अहिंसक मार्गाने म.गांधीजींनी जो लढा दिला तो लढा सामान्य नव्हता.संपूर्ण देश सत्याग्रह चळवळीने भारुन टाकणारे बापू स्वातंत्र्य संग्रामाचे नायकच होते हे ठासून सांगावे लागेल.किती आंदोलने,किती चळवळी ,किती सत्याग्रह झाले असतील ब्रिटिश सत्तेविरुद्ध सांगता यायचे नाही. फक्त ते अहिंसक होते म्हणून स्वातंत्र्य लढा नव्हते म्हणणे म्हणजे एक प्रकारे पातकच आहे. जघन्य अपराध आहे. गांधींचा लढा असो वा टिळकांचे समरयुद्ध असो वा 1857 चा लढा असो सर्वच स्वातंत्र्य लढ्याची हत्यारे होती.मार्ग अनेक असली तरी धेय्य एक होते.

कालपरवा एक सामान्य नटी(सरकारी भाट… भाटगिरी करुन प्रशंसेस पात्र ठरतात.अशातूनच राष्ट्रीय पुरस्कार तेही पंगा सारख्या निरस चित्रपटासाठी आणि पद्मश्री पुरस्कार सरकार दरबारी प्रशंसा गाणं केल्याने) जी म्हणते 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य म्हणजे भिक होती.. तिच्या सारख्या पाखंडी,विध्वंसक विचाराच्या बाईने स्वातंत्र्य लढ्यावर बोलणे म्हणजे आपल्या ओंगळवाण्या विचारांचे प्रदर्शन करण्यासारखे आहे. तिला समर्थन देऊन स्वातंत्र्य लढ्यावर प्रश्न विचारणाऱ्या लोकांना एवढेच सांगू इच्छितो कुठलाही लढा असो तो अहिंसेच्या मार्गाने लढता येतो.आणि जिंकता पण येतो. जगाच्या इतिहासात त्याची नोंद आहे. त्याचे जागते उदाहरण म्हणजे भारताचे स्वातंत्र्य.

✒️सतीश यानभुरे(मो:-86054 52272)