स्वच्छ सर्व्हेक्षण व माझी वसुंधरा अभियानात प्रथम क्रमांक येण्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा – जिल्हाधिकारी शेखर सिंह

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

🔸स्वच्छ सर्व्हेक्षण-2022 चे उद्घाटन

म्हसवड(दि.22नोव्हेंबर):-गिरिस्थान नगर परिषद, महाबळेश्वर सलग चार वर्ष स्वच्छ सर्व्हेक्षणामध्ये विविध क्रमांकाचे पारितोषिक पटकवत आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण-2022 मध्ये देशात व माझी वसुंधरा अभियानात महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकविण्यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक व युवकांनीही या अभियानात सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.

महाबळेश्वर येथे माझी वसुंधरा अभियान स्वच्छ सर्व्हेक्षण-2022 अभियानांतर्गत हिलदारी अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार सुषमा पाटील, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील, गट विकास अधिकारी अरुण मरभळ, यांच्यासह नगर परिषदेचे नगरसेवक, स्वच्छता दूत उपस्थित होते.स्वच्छ सर्व्हेक्षण पुरस्कराचे खरे मानकरी हे स्वच्छतेचे काम करणारे कर्मचारी आहेत यांचे अभिनंदन करुन जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, हिलदारी अभियानाचा स्वच्छ सर्व्हेक्षण-2022 साठी खूप फायदा होणार आहे. नेसले इंडिया हिलदारी अभियान नगर परिषदेबरोबर आजुबाजुच्या ग्रामपंचायतींमध्ये, वन विभागाच्या हद्दीत राबविण्यात येणार आहे.

जगातील सर्वांत सुंदर शहर महाबळेश्वर करण्यासाठी सगळ्यांनी योगदान द्यावे.1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण होणार आहेत, अशा युवा मतदारांनी आपली नोंदणी व्होटर हेल्पलाईनच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदवावी. तसेच येत्या 27 व 28 नाव्हेंबर रोजी जिल्ह्यात मतदार नोंदणीचे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे, याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी केले.माझी वसुंधरा व स्वच्छ सर्व्हेक्षण-2022 अभियान एक चळवळ व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकांनी या अभियानात सहभाग घ्यावा,असे प्रास्ताविकात मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी सांगितले. यावेळी माझी वसुंधरा शपथ उपस्थितांनी घेतली.
माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानाची रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करणेत आली.

माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्व्हेक्षण-2022 अभियानाची जनजागृती व्हावी यासाठी आज महाबळेश्वर शहरामधून जनजागृती रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये प्रदुषण टाळा, प्लॉस्टिकचा वापर टाळा, पर्यावरणाचे रक्षण करा यासह विविध पर्यांवरणाचे संदेश देणारे फलक रॅलीचे आकर्षण ठरले.हिलदारी अभियानांतर्गत स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य पत्रिका, कचरा प्रवास टेक्नॉलॉजी अंतर्गत वाहन चालकांना स्कॅनींगसाठी मोबाईलचे वाटप, चष्मे व पर्यावरण पुरक पिशव्याचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 
©️ALL RIGHT RESERVED