जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पँनेल निवडून येणार – रामराजे नाईक निंबाळकर

26

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो:-9075686100

म्हसवड(दि.22नोव्हेंबर):-कोणी कितीही गर्जना करु द्यात, जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार आहे. या चांगल्या चाललेल्या बँकेला अडचणीत आणण्याचं काम काहीजण करत आहेत. पीक कर्ज देणाऱ्या बँकेला पीककर्ज देण्यापासून काहीजण रोखत आहेत. अशा लोकांना बँकेत येऊ देऊ नका. आमदारकी येईल तेव्हा आपण बघू. बोलणारा मी एकटाच आहे, असा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आमदार गोरे यांचा नामोल्लेख टाळून केला.

दहिवडी (ता. माण) येथे श्री सिध्दनाथ पतसंस्थेच्या नूतनीकरण केलेल्या मुख्य कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, अनिल देसाई, राजेंद्र हजारे, डॉ. सुरेश जाधव, मनोज पोळ, सहायक निबंधक विनय शिंदे, संस्थेचे अध्यक्ष सुनिल पोळ, बाबासाहेब माने, बाळासाहेब सावंत, युवराज सुर्यवंशी, बाळासाहेब काळे, उपाध्यक्ष सुरेश इंगळे, निलिमा पोळ, किसन सावंत, तानाजी मगर, श्रीकांत जगदाळे, प्रशांत विरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.