साताऱ्यात लवकरच राजकीय भूकंप?; शरद पवार यांच्या भेटीनंतर शशिकांत शिंदे यांनी केलेमोठे वक्तव्य

25

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.24नोव्हेंबर):-जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत जावळी तालुका सोसायटी मतदारसंघातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक ज्ञानदेव रांजणे यांचा एक मतानं विजय झाला असून, आमदार शशिकांत शिंदे यांना काल (मंगळवारी) पराभवाचा धक्का बसलाय. या निकालानं जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अनेक घडामोडी यामुळे घडणार आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचं कार्यालय फोडण्याची घटना घडली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे लगेच साताऱ्यात दाखल झाले आणि शशिकांत शिंदे यांच्यासोबत चर्चा केली.

यावर शशिकांत शिंदे म्हणाले, येत्या 25 तारखेला सविस्तर बोलून माझी राजकीय कारकिर्दीची वाटचाल सुरू करणार आहे. मी आता मोकळाच आहे’ असं म्हणत शिंदेंनी नवे संकेत दिले आहे. बँकेतील पराभवानंतर खासदार शरद पवार यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी सर्किट हाऊस येथे काल कमराबंद चर्चा केली. या चर्चेनंतर शशिकांत शिंदेंनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. जिल्हा बँकेच्या प्रक्रियेवर येत्या 25 तारखेला सविस्तर बोलून माझी राजकीय कारकिर्दीची वाटचाल सुरू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

जिल्हा बँकेची जावली सोसायटी ही निवडणूक केवळ निमित्त आहे. जिल्ह्याच्या राजकारणातून मला हद्दपार कसे करता येईल, यासाठीच या निवडणुकीत खऱ्या अर्थानं प्रयत्न करण्यात आला. रांजणे हे केवळ सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत, त्यांच्या पाठीमागे असणारी शक्ती ही वेगळी आहे. त्यामुळं माझा पराभव झाला, मी लढणारा कार्यकर्ता आहे. या निवडणुकीबरोबरच विधानसभा निवडणुकीत सुद्धा मला पाडण्यामागं असेच षड्यंत्र झाले होते. हा माझा ठाम आरोप असून, यापुढं केवळ जावलीच नव्हे, तर सातारा तालुक्यातही मला पक्षवाढीसाठी लक्ष घालावं लागेल. आता मला राजकारणात काहीही गमवायची भीती नाही. आता फक्त शरद पवार साहेबांचे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार जिल्ह्यामध्ये वाढवायचे आहेत, असं त्यांनी सडेतोड मत मांडलं.