” माझे संविधान,माझा अभिमान “

2611

२६ नोव्हेंबर १९४९ हा संविधान दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो.भारतीय संविधान ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे.घटनाकार,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेत राज्यघटनेची निर्मिती केल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी गठीत समितीने ती स्वीकारली.त्यानंतर स्वतंत्र भारतीय राज्यघटना अंगिकृत व अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करण्यात आली.या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांमध्ये ‘माझे संविधान,माझा अभिमान’ उपक्रम राबविण्यात येत आहे.महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांसह भारतीय संविधानाच्या निर्मितीत हातभार लावलेल्या त्या तमाम व्यक्तिमत्वांना अभिवादन करणे,आदरांजली वाहणे,त्याचप्रमाणे संविधानातील मूलतत्त्वे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे व त्यांना जागरूक नागरिक बनवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

कायदे म्हणजे काय?कायदे कशासाठी? राज्यघटना नेमका काय प्रकार आहे?असे अनेक प्रश्न बालमित्रांना पडतात.भारतीय राज्यघटनेतील व्यापक मूलतत्त्वे,सर्वसमावेशकता विद्यार्थ्यांच्या मनावर कोरली जावीत याअनुषंगाने ‘माझे संविधान,माझा अभिमान’ उपक्रम राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे.स्वातंत्र्य,मूलभूत हक्क,कर्तव्ये,समता,न्याय,लोकशाही,बंधुता ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट व्हावी,या दृष्टिकोनातून २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत सदर उपक्रम राज्यातील सर्व शाळांत राबवला जात आहे.या उपक्रमांतर्गत शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,निबंधलेखन,चर्चासत्र,पोस्टर निर्मिती,काव्य लेखन,घोषवाक्ये इ.विविध उपक्रम ऑनलाईन-ऑफलाईन राबवले जातील,जेणेकरून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळणार आहे.२६ नोव्हेंबर २०२१ रोजी भारतीय संविधान दिनी राज्यभरातील शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांत एकाचवेळी सकाळी १० वाजता भारतीय संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्याचे आवाहन शालेय शिक्षणविभागातर्फे करण्यात आले आहे.यामध्ये शाळा,पालक,विद्यार्थी,लोकप्रतिनिधी,विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाजातील प्रतिनिधींचा सक्रिय सहभाग असणार आहे.

सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जाणार आहेत.शालेयस्तरावर निबंध लेखन,काव्यलेखन,चित्रकला,वक्तृत्व स्पर्धा,घोषवाक्ये,पोष्टर निर्मिती असे उपक्रम ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा स्वरुपात राबवायचे आहेत.त्यात विद्यार्थी,पालक,लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसह समाजाचा सक्रीय सहभाग विभागाला अपेक्षित आहे.विद्यार्थी आणि पालकांना संविधानाची माहिती व्हावी यासाठी संविधानावर आधारित प्रश्‍नमंजुषा,संविधानिक मूल्ये आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश,संविधान आणि शिक्षण या विषयावर परिसंवाद,तज्ज्ञांची व्याख्याने घ्यायची आहेत.उपक्रमातंर्गतचे घ्यावयाचे कार्यक्रम असे – तिसरी ते पाचवी – वक्तृत्व,रांगोळी,चित्रकला.विषय – भारतीय संविधान,माझ्या शाळेतील संविधान दिवस.वक्तृत्वमध्ये तीन मिनिटांच्या भाषणाचा व्हिडीओ,रांगोळी अथवा चित्रकलेचे छायाचित्र समाजमाध्यमांवर अपलोड करायचे आहे.

सहावी ते आठवी – विषय – संविधान यात्रा,संविधान निर्मितीचा प्रवास,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,भारतीय संविधान आणि लोकशाही.निबंध १ हजार शब्दांपर्यंत कागदावर लिहून त्याचे छायाचित्र,वक्तृत्वचे तीन मिनिटांच्या भाषणाचा व्हिडीओ,घोषवाक्ये आणि स्वरचित काव्यलेखन कागदाचे छायाचित्र,पोस्टरचे छायाचित्र समाजमाध्यमांवर अपलोड करायचे.नववी ते बारावी – विषय – भारतीय संविधानिक मूल्ये,भारतापुढील सध्यस्थितीतील आव्हाने आणि भारतीय संविधान,सार्वभौमत्व संविधानाचे – जनहित सर्वांचे,भारताचा सन्मान – माझे भारतीय संविधान.निबंध,पोस्टर,भाषणाचा तीन मिनिटांची व्हिडीओ समाजमाध्यमांवर अपलोड करायचा.प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षक – फलक लेखन,डिजीटल पोस्टर निर्मिती – विषय – भारतीय संविधान,भारतीय संविधान आणि शिक्षण,भारतीय संविधानातील मूलभूत हक्क – कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या,भारतीय संविधान – माझे विद्यार्थी आणि माझी भूमिका.फलक अथवा डिजीटल पोस्टर समाजमाध्यमांवर अपलोड करायचे.

देशातील प्रत्येक शाळा,महाविद्यालय, आणि विद्यापीठांमध्ये २६ नोव्हेंबर २०२१ रोजी संविधान दिन साजरा करण्यात येत आहे.या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी,शिक्षकांकडून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात येत असते.तसेच विविध सरकारी कार्यालयातही संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येत असते.१५ ऑगस्ट १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला.ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आली व एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून व देशाला राज्यकारभार करण्यासाठी एक लिखित राज्यघटनेची आवश्यकता होती.त्यामुळे घटना परिषदेची निर्मिती केली.९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीची पहिली बैठक भरली.त्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश होता.पंडित जवाहरलाल नेहरू,डॉ.राजेंद्र प्रसाद,टी. टी.कृष्णम्माचारी,बी.जी.खेर,राधाकृष्णन,कन्हैयालाल मुन्शी,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,एम.आर.जयकर,चक्रवर्ती राजगोपालाचारी,सर फिरोजखान,हंसा मेहता,सरोजिनी नायडू,दुर्गाबाई देशमुख यांचा समावेश होता.११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ.राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

१३ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती समोर उद्दिष्टांचा ठराव मांडला.त्यामध्ये अनेक समित्या निर्माण करण्यात आल्या.त्यात मसुदा समिती ही महत्त्वाची समिती म्हणून ओळखली जाते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी अचानक १७ डिसेंबर १९४६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आपले मत मांडण्यास सांगितले.तेव्हा डॉ.आंबेडकर यांच्या भाषणांनी संपूर्ण सभा दणाणून गेली.टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.विरोधकांच्या भुवया उंचावल्या होत्या.ज्यांचा डॉ.आंबेडकरांना विरोध होता,त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसमोर,ज्ञानासमोर झुकावे लागले.त्यांच्या ऐतिहासिक भाषणाने प्रत्येक नेत्याने गौरवोद्गार काढले.१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ते स्वीकारले.भारत देशाचे पहिले कायदामंत्री झाले.

घटना मसुदा समितीमध्ये सात नेत्यांचा समावेश करण्यात आला होता.भारतीय राज्यघटनेची संपूर्ण जबाबदारी या समितीवर होती.१)अल्लादी कृष्णस्वामी अय्यर,२) एन.गोपालस्वामी अय्यंगार,३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर,४) के.एम. मुन्शी,५) सय्यद मोहमद सादुल्लाह,६) बी.एल.मित्तर,७) डी.पी.खैतान.अशाप्रकारे या सात दिग्गज नेत्यांचा घटना मसुदा समितीमध्ये समावेश करण्यात आला होता.यापैकी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सोडून इतर सर्व नेत्यांनी काही कारणे सांगून त्यातून बाहेर पडले.तेव्हा भारतीय राज्यघटनेची संपूर्ण जबाबदारी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर पडली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी न घाबरता,न डगमगता भारतीय राज्यघटना पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारली.२९ ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीने आपल्या कामकाजास सुरुवात केली.समितीचे काम १६५ दिवस चालले.त्यावर विचारविनिमय झाला.१३ फेब्रुवारी १९४८ रोजी घटना समितीने आपला अहवाल प्रकाशित केला.त्यावेळी ७६३५ दुरूस्त्या करण्यास सांगितल्या.त्यापैकी २९७३ दुरूस्त्या मान्य करण्यात आल्या.घटनानिर्मितीसाठी ६३ लाख ७२९ रू.इतका खर्च करण्यात आला होता.त्यामध्ये ३९५ कलमे आणि ८ परिशिष्टे होती.

भारतीय राज्यघटनेमध्ये डॉ.आंबेडकरांच्या विचारांची व्यापकता,कल्पकता,कायदेतज्ज्ञ, विद्वान पंडित,अनुभवी,राज्यशास्त्रज्ञ,मानसशास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ,
समाजशास्त्रज्ञ व भविष्याचा वेध घेऊन चौकस दूरदृष्टी दिसून येते.यामुळेच तळागाळातील लोकांचा विचार समोर ठेवून सर्वांना समान अधिकार व मूलभूत हक्क या संविधानातून दिलेले दिसून येतात.कलम १७ मध्ये अस्पृश्यता नष्ट करणे,कलम १४ – व्यक्तीला कायद्यापुढे समानता अर्थात कलम १४ ते १८ यामध्ये समानतेचा हक्क,कलम १९ ते २२ स्वातंत्र्याचा हक्क,कलम २५ ते २८ धर्मस्वातंत्र्याचा हक्क,कलम २९ व ३० शैक्षणिक हक्क,न्यायालयात दाद मागण्यासाठी कलम १२४ नुसार सर्वोच्च न्यायालय,२१४ नुसार उच्च न्यायालय,कलम ३३० – अनुसूचित जाती-जनजाती यांच्यासाठी राखीव जागा व ३३५ नुसार अनुसूचित जाती-जमाती यांचे हक्क अशाप्रकारे भारतीय नागरिकांस हक्क व अधिकार देऊन देशाची एकता व अखंडता टिकवून ठेवण्यासाठी योगदान ठरते.

स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्याय यांचा पुरस्कार करणारे व समाजवाद,धर्मनिरपेक्ष,सार्वभौमत्व,लोकशाही या तत्त्वांवर आधारीत भारतीय राज्यघटना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला २६ नोव्हेंबर १९४९ रोजी अर्पण केली.यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा संपूर्णपणे सिंहाचा वाटा व महत्त्वाचे योगदान होते आणि त्यांनी ते अथक परिश्रमाने,जोमाने व प्रभावीपणे जोपासले.म्हणून डॉ.आंबेडकरांना ” भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ” म्हणतात.२६ जानेवारी १९५० पासून भारतीय राज्यघटना अंमलात आली.२६ नोव्हेंबर हा दिवस ” संविधान दिन ” म्हणून साजरा केला जातो.यानिमित्ताने महामानव,प्रज्ञासूर्य,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन….!!

✒️राजेंद्र लाड(आष्टी,जि.बीड)मो:-९४२३१७०८८५