कवी प्रा.प्रदीप पाटील यांना भा.रा.तांबे पुरस्कार

28

✒️इकबाल पीरज़ादे(विशेष प्रतिनिधी)

इस्लामपूर(दि.26नोव्हेंबर):- येथील प्रसिद्ध कवी प्रदीप पाटील यांना पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘कविता’ या वाड.मयप्रकाराती ढूंढल योगदानाबद्दल ज्येष्ठ कवीस दिला जाणारा कविवर्य भा.रा.तांबे पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डाॅ.रावसाहेब कसबे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.पुणे येथील एस्.एम्.जोशी सभागृहामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर भारती विद्यापीठाचे कुलपती डाॅ.शिवाजीराव कदम, प्रसिद्ध लेखक न.म.जोशी,परिषदेचे कार्याध्यक्ष मिलींद जोशी,कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार,कार्यवाह प्रकाश पायगुडे,कविवर्य उद्धव कानडे यांची प्रमुख उपस्थिती होती.सन्मानपत्र आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

प्रदीप पाटील हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे विद्यमान सदस्य असून ना.जयंत पाटीलसाहेबांच्या
मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या आविष्कार कल्चरल ग्रुपचे कार्याध्यक्ष आहेत.महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इस्लामपूर शाखेचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहतात. अलिकडेच बडोदा येथील प्रतिष्ठीत अशा महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी त्यांच्या ‘अंतरीचा भेद’ या
कवितासंग्रहाची निवड झाली आहे.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,सोलापूर विद्यापीठ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या बरोबरच कर्नाटक राज्या पदवीपूर्व अभ्यासक्रमामध्येही त्यांच्या कवितांचा समावेश आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य पुरस्कारासह अनेक पारितोषिके त्यांच्या ‘आत्मसंवाद’ आणि ‘अंतरीचा भेद’ या कवितासंग्रहांना लाभलेली आहेत.त्यांचा नवा कवितासंग्रह आणि त्यांच्या कवितेवरील समीक्षात्मक ग्रंथ अशी दोन पुस्तके लवकरच प्रकाशित होत आहेत. सध्या ते आष्टा येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या आर्टस्,काॅमर्स,सायन्स काॅलेजमध्ये
मराठीचे प्राध्यापक आहेत.