आष्टी ग्रामपंचायतीने गाळे बांधकामात केलेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशी समितीने साधली चुप्पी !

37

🔹मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली

🔸अहवाल त्वरित सादर करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल डांगे यांनी केली मागणी

✒️चामोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

चामोर्शी(दि.२७नोव्हेंबर):- तालुक्यातील आष्टी ग्रामपंचयतीने मोठ्या प्रमाणात नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार करण्यात आला. याबाबत विविध तक्रारी प्राप्त झाल्यानंतर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी आदेश काढून चौकशी समिती नेमली. ती समिती फक्त कागदपत्री असून अजूनपर्यंत कुठलाही अहवाल तयार केला नसल्याचा आरोप होत आहे. सदर समिती ग्रामसेवकाला वाचविण्यासाठी प्रयत्न तर करत नाही ना अशी शंका सर्वत्र व्यक्त होत आहे. या समितीने अहवाल त्वरित सादर करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष राहुल डांगे यांनी दिला आहे.

सदर गाळे बांधकाम करताना कोणत्या ही प्रकारचे ई-टेंडरींग करण्यात आले नाही. तसेच या बांधकामाची मोजमाप पुस्तीका सुद्धा चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आली. गाळे धारकांच्या बोलीद्वारे मिळालेल्या रकमेची अफरातफर करण्यात आली. या बांधकामाची माहिती मिळावी यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष राहुल डांगे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती मागितली असता ग्रामपंचायतीने कोणत्याही‌ प्रकारची माहिती दिलेली नाही. त्यामुळे राहुल डांगे यांनी जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे आष्टी ग्रामपंचयतीत झालेल्या बांधकामाची तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चामोर्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना स्पष्ट निर्देश देवून आपल्या स्तरावर एक समिती नेमुन अहवाल तात्काळ सादर करावा.

मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या आदेशानुसार चामोर्शी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी समिती नेमली. या समितीत मदनकुमार कृष्णाराव काळबांधे, विस्तार अधिकारी पंचायत, श्रीमती ललीता शिवराम कुमरे, सहाय्यक लेखा अधिकारी, कु.सुजिता पुंडलिक वाघमारे कनिष्ठ अभियंता पंचायत समिती चामोर्शी यांचा समावेश आहे. परंतु या समितीने कोणत्याही प्रकारचा अहवाल पंचायत समिती चामोर्शीचे गटविकास अधिकारी व मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे सादर केलेला नाही. तसेच राहुल डांगे यांनी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार चौकशी समितीचा अहवाल मागितला असता कोणत्याही प्रकारचा अहवाल देण्यात आलेला नाही. त्यामळे नेमलेले चौकशी समितीचे अधिकारी भ्रष्ट्राचारावर पांघरूण घालतात की काय अशी शंका निर्माण झाली आहे. सदर प्रकरणाकरिता नेमलेल्या चौकशी समितीचे अधिकारी हे ग्रामसेवकांना वाचविण्यासाठी धडपड करीत असावेत याबाबत मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी ग्रामसेवकासह समितीमध्ये समविष्ट सर्व अधिका-यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राहुल डांगे यांनी केली आहे.