क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मृतीदिन विशेष

26

🔹फुले दाम्पत्य समजून घेण्यासाठी क्रांतिरत्न जरूर वाचावा — प्रांताधिकारी विनय गोसावी

✒️लक्ष्मणराव पाटील

धरणगाव(दि.28नोव्हेंबर): — क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे जीवन, कार्य व विचारांचे दर्शन घडविणारा महाग्रंथ सर्वांनी जरूर वाचावा असे प्रतिपादन या ग्रंथ निर्मिती मंडळामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे एरंडोल चे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी केले आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, प्रांताधिकारी कार्यालय एरंडोल येथे गेलो असता मला विनयजी गोसावी यांच्या हस्ते क्रांतिरत्न महाग्रंथ भेट स्वरूप प्राप्त झाला. प्रसिध्द इतिहास लेखक प्रा. हरी नरके यांच्यासह अनेक प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, कवी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे परिश्रम घेऊन हा ग्रंथ तयार केला आहे. यामध्ये धरणगाव येथील शतकोत्तर शाळा प. रा. विद्यालयाचे मुख्याध्यापक व प्रसिध्द साहित्यिक प्रा. डॉ. संजीवकुमार सोनवणे सरांचा देखील लेख आहे, ही गोष्ट धरणगावकर म्हणून अभिमानाची वाटते. सदर ग्रंथ महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित असून १००० पानांचा महाग्रंथ आहे. या ग्रंथाची संकल्पना अप्पर जिल्हाधिकारी गोंदिया राजेश खवले यांची असून, विश्वनाथ शेगांवकर (रा. अकोला) निवृत्त भा. प्र. से. प्रधान सचिव यांचे मार्गदर्शन आहे.

मी या महाग्रंथाबद्दल जास्त काही न बोलता प्रांताधिकारी विनय गोसावी (सदस्य, निर्मिती मंडळ, क्रांतिरत्न महाग्रंथ) यांचे मनोगत (भूमिका) या ठिकाणी देत आहे. “क्रांतिरत्न च्या निमित्ताने दोन शब्द… फुले दाम्पत्यावर दि. ११ एप्रिल २०२१ रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीच्या दिवशी ‘क्रांतिरत्न’ ऑनलाइन प्रकाशित करण्यात आला. महात्मा फुले व सावित्रीमाई फुले या फुले दाम्पत्यावर इतिहासकार, अभ्यासू लेखक यांच्या मार्गदर्शनातून किमान १००० पानांचा गुणवत्ता असलेला ग्रंथ जो अभ्यास संदर्भासाठी विश्वकोश ठरेल, असा महासंकल्प आमचे शासकीय नोकरीतील वरिष्ठ व मार्गदर्शक राजेश खवले (अप्पर जिल्हाधिकारी, गोंदिया) यांचा काही वर्षांपासून होता व ते अनेकवेळा बोलून दाखवत असे. त्यांनी सन २०१९ पासून महात्मा फुले दाम्पत्यावर एक संदर्भग्रंथ तयार करावा, असा मनोदय व्यक्त केला. खरेतर हा संकल्प फार आधीपासून त्यांच्या मनात होता;

परंतु शासकीय कामकाजामुळे यासाठी वेळ मिळत नसल्याने सावित्रीमाई फुलेंप्रमाणे यासाठी संकल्पक म्हणून श्रीमती प्रेरणा वहिनी पुढे आल्या व प्रा. डॉ. तायडे मॅडम यांच्या पुढाकाराने शासकीय अधिकारी, अभ्यासू लेखक, इतिहासकार अशी टीम पुढे येऊन या कार्याचा शुभारंभ झाला. ग्रंथनिर्मिती मंडळ व मार्गदर्शक म्हणून माझा खारीचा वाटा याला लाभला, हे मी माझं भाग्य समजतो.आजच्या काळात फुले दाम्पत्यांचे जीवन व त्यांचे विचार तरुणांमध्ये रुजणे अत्यंत महत्वाचे आहे, त्यासाठी हा ग्रंथ संदर्भग्रंथ ठरेल, अशी आशा आहे.छत्रपती शिवरायांचे समतेचे विचार सर्वप्रथम समजणारे ‘कुळवाडीभूषण’ : छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण करतांना त्याचा पाया व आत्मा म्हणून समतेचा विचार केलेला होता. या विचारांना सर्वप्रथम रुजविणारे समाजसुधारक व शिवरायांची समाधी शोधून खऱ्या अर्थाने महात्मा फुले ‘कुळवाडीभूषण’ ठरतात.
स्रियांचे दैवत : तत्कालीन परिस्थितीत समानतेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार याचा विचार स्त्री वर्ग देखील अस्पृश्य होता.याबाबत केशवपन, शिक्षण, समान अधिकार, इत्यादी बाबी पाहता भारतात स्रियांना समानतेचे अधिकार महात्मा फुले यांनी मिळवून दिले. आज महिला राष्ट्रपती, जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यामुळेच होताना दिसत आहेत.

ऑल इन वन’ व ‘युनिक’ समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले : स्त्री वर्गाचा उध्दार करणारे (बालहत्या प्रतिबंधक गृह, केशवपन, शिक्षण), शेतकऱ्यांचे प्रश्न भारतात सर्वप्रथम मांडणारे, समतेचा विचार प्रत्यक्षात उतरला पाहिजे, याचा उहापोह करणारे, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रयत्न करणारे, सार्वजनिक सत्यधर्माचा विचार रुजविणारे, लोकशाही तत्वाची इंग्रजांना आठवण करून देणारे, शिवरायांचे विचार समजणारे पहिले समाजसुधारक इत्यादी सर्व बाबींचा विचार करता ऑल इन वन समाजसुधारक म्हणून तसेच फुले – शाहू – आंबेडकर चळवळीचा भक्कम पाया म्हणून महात्मा फुले यांचेच नाव सर्वप्रथम येते; परंतु हे विचार तरुणांमध्ये रुजणे आज अत्यंत महत्वाचे आहे. प्लेगच्या परिस्थितीत समाजाला कसे सावरावे? साथीच्या रोगात माणुसकी कशी जपावी? याचे आदर्श महात्मा फुले यांनी शेकडो वर्ष आधी दाखवून दिलेले आहे. यासाठी सर्व बाबींचा विचार करता महात्मा फुले यांच्यासारख्या सर्वच समाजसुधारकांचे जीवनचरित्र, कार्य लिखित स्वरूपात पुढे येणे ही काळाची गरज झालेली आहे. जितके ज्ञान युवक युवतींना मोबाईलबद्दल आहे तितके ज्ञान इतिहासाबद्दल असणे गरजेचे वाटते. कारण ज्यांना इतिहास माहीत नाही, ते इतिहास घडवू शकत नाहीत. आम्ही फुलेंना विसरलो…. फुले जन्माला आले ही त्यांची चुक झाली का ?

खऱ्या अर्थाने समाजसुधारकांचे ‘महागुरू’ अशी भूमिका फुले दाम्पत्याने करूनही महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी त्यांची हस्तलिखित पुस्तके विकण्याची वेळ येणे, त्यांच्या कुटुंबातील (सुनेचा) बेवारस म्हणून पुणे न. पा. कडून अंत्यसंस्कार होणे हा इतिहास पाहता आयुष्यभर फुलेंनी केलेली फरफट समाज विसरला का? हा प्रश्न मनात येतो. फुले – शाहू – आंबेडकर चळवळीचा पाया म्हणून फुलेंचे नाव अग्रक्रमाने येते, हे आम्ही विसरलो का? महात्मा फुले स्रियांचे दैवत आहेत, हे सुशिक्षित भगिनी विसरल्या का? असे असेल तर फुले भारतात जन्माला आले ती त्यांची चुक झाली का? असे नाईलाजाने म्हणावेसे वाटेल. प्रत्येक सुशिक्षित भारतीय महिलेने सकाळी उठल्यावर महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या फोटोचे दर्शन घेतले पाहिजे, म्हणजे फुले दाम्पत्यांच्या कार्याची महिलांकडून आज दखल घेतली जाते का? समाजसुधारकांचे महागुरू म्हणून फुलेंचे जीवनचरित्र व विचार तरुणांपर्यंत पोहचले का? ही विचार करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून सुशिक्षित भगिनी, तरुण, सर्व वर्गातील वाचक या सर्वांनी एकदा महात्मा फुले समजून घेतले पाहिजे…… यासाठी हा ‘क्रांतिरत्न’……

महात्मा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्याच्या बाबतीत अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे या महाग्रंथातून नक्कीच मिळतील यात तिळमात्र शंका नाही. महापुरुषांची विचारधारा जर खऱ्या अर्थाने जनमानसात रुजवायची असेल तर महापुरुषांना डोक्यावर नाही तर डोक्यात घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा जागर करतांना शिक्षण क्रांतीचे जनक, समाजसुधारक, इतिहास संशोधक, विज्ञानवादी लेखक, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे, सत्यशोधक समाजाचे संस्थापक अशा विविध बाजूंनी करणासाठी आपण सर्वांनी क्रांतिरत्न महाग्रंथ अवश्य वाचावा, हीच तात्यासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त खरी आदरांजली ठरेल…
लक्ष्मण पाटील, सर
कार्याध्यक्ष – विकल्प ऑर्गनायझेशन धरणगाव
तालुका प्रतिनिधी – लाईव्ह महाराष्ट्र न्यूज