चंद्रपूर जिल्ह्यात निवडणूक विभागातील संगणक कामगार चालकाचे कामबंद आंदोलन

27

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)

चिमूर(दि.1डिसेंबर):-तहसिल कार्यालयात कार्यरत असलेल्या निवडणूक शाखेत तुटपुंज्या मानधनात काम करनारे संगणक चालकांनी विवीध मागण्या संदर्भात कंत्राटदाराच्या विरोधात तहसील कार्यालयात कामबंद आंदोलन बुधवारला पुकारला आहे.

जिल्हयातील तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत संगणक चालक पुरवठा करण्याचे कंत्राट यवतमाळ येथील राजेश गुल्हाने जय कॉम्पूटर यांना देण्यात आले. सदर कंत्राटदाराने शासनाला करारनामा करून दिला आहे. करारनाम्यानूसार कुठल्याही अटी व शर्तीची पुर्तता कंत्राटदाराने केली नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील सर्व तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेतील संगणक चालक यांनी न्याय हक्काच्या मागण्यासाठी व मानधनात वाढ करण्याकरिता दिनांक ०१ डिसेंबर बुधवार पासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.

कंत्राटदाराकडून निवडणुक संगणक चालकांना महिन्याच्या ५ तारखेला देयक अदा केले जात नाही. कंत्राटदार हा कमी मानधन दाखवून कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीच्या राशीमध्ये कपात करीत आहे. वास्तवीक भविष्य निर्वाह निधीची राशी हि किमान वेतन मानधनानूसार शासनाने ठरवून दिलेल्या टक्केवारी नुसार कपात केली पाहिजे. निवडणूक विभागामार्फत कंत्रादाराला देयक अदा करतांना संगणक चालकाला मानधनापोटी देयकानुसार आयकर व वस्तू सेवा कर कपात केली जात नाही. संगणक चालकांना किमान वेतन कायदा १९४८ नुसार त्यांच्या बँक खात्यावर मानधन अदा केले जात नाही. या विविध मागण्यासाठी जिल्हातील निवडणुक संगणक चालकानी मागण्या पुर्ण करण्यासाठी संघटनेने पालकमंत्री यांना निवेदन दिले होते. आतापर्यत कंत्राटदारावर कुठलीही कार्यवाही झाली नाही.

आठ दिवसाच्या आत न्याय न मिळाल्यास स्वराज्य निवडणुक संगणक चालक कामगार संघटनेचे राज्याध्यक्ष व जिल्हयातील निवडणुक संगणक चालक यांनी कामबंद आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.