डॉ.आ.ह.साळुंखे यांना महाराष्ट्र भूषण केव्हा?

  36

  महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस १९९६ सालापासून महाराष्ट्र शासनातर्फे ‘महाराष्ट्र भूषण’ हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. संपूर्ण महाराष्ट्रात आजपर्यंत कुणीच केले नसेल इतके मोठे वैचारिक लिखाण आणि वैचारिक साहित्याची निर्मिती डॉ. आ.ह. साळुंखे सरांनी केली आहे. धर्मा-धर्मातील आणि जाती-जाती मधील द्वेष कमी व्हावा. महापुरुषांच्या अनुयायांमधील वाद संपुष्टात यावेत याकरिता अतिशय मुद्देसूद लिखाण केले आहे आणि व्याख्याने दिली आहेत. स्वतंत्र्य भारतातील प्रबोधनकारानंतरचे आद्य प्रबोधनकार म्हणजे डॉ.आ.ह.साळुंखे.

  आजपर्यंत साहित्य, संगीत, प्रबोधन, चित्रपट, कला, विज्ञान अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना ’महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ दिला गेला आहे. या पुरस्काराचे काही निकष आहेत जसे संबंधीत व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात किमान 20 वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच वैशिष्टयपूर्ण/उल्लेखनीय कार्य केलेले असावे. (मात्र संशोधनाद्वारे कोणत्याही क्षेत्रात नवीन शोध लावला असल्यास तसेच क्रिडा क्षेत्रात अव्वल दर्जाचे अनेक पुरस्कार प्राप्त खेळाडूच्या बाबतीत विचार करुन हा नियम शिथिल करण्यात येतो). तसेच सदर व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान 15 वर्षे वास्तव्य असावे व ’पदम पुरस्कार’ प्राप्त मान्यवरांना सदर पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येते. आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेत त्यापैकी साहित्य क्षेत्रात 3 पुरस्कार दिले गेलेत. एक पु.ल. देशपांडे, दुसरे मंगेश पाडगावकर आणि तिसरे ब.मो.पुरंदरे.

  डॉ.आ.ह.साळुंखे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान प्रचंड आहे. त्यांनी लोकांना कल्पनेत रमण्याकरिता नव्हे तर लोकांमध्ये वास्तवाचे भान निर्माण करण्याकरिता लिखाण केले. डॉ.आ.ह. साळुंखे सरांची आजपर्यंत 54 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. हे ग्रंथ त्यांनी तर्काच्या तलवारीचा भक्कम आधार देऊन सिद्ध केले आहेत व या ग्रंथांनी उभ्या महाराष्ट्राच्या मनाची मशागत करून त्याला विचार कसा करावा हे शिकविले आहे. मराठी विश्वकोशात तुलनात्मक धर्मशास्त्र, संस्कृत इत्यादी विषयांत १०० हून अधिक लेख त्यांनी लिहिले आहेत. १९८०-८१ च्या सुमारास डॉ.साळुंखे यांनी चार्वाकावर लिहिलेली लेखमाला वाईच्या नवभारत मासिकात प्रकाशित झाली आणि दुसर्या बाजूने किर्लोस्कर मासिकाच्या जून १९८१ च्या अंकात मराठा समाजावरील आत्मनिरीक्षणात्मक स्वरूपाचा लेख प्रसिद्ध झाला. त्या लेखावर प्रतिक्रिया म्हणून फक्त किर्लोस्करकडे तीन पोती भरतील एवढी पत्रे आली होती यावरून तुम्ही त्यांच्या लोकाभिमुख लिखाणाची कल्पना करू शकता.डॉ.आ.ह. साळुंखे सरांनी नवीन पिढीला वैचारिक लढाई शांत डोक्याने व शाब्दिक अहिंसेने सुद्धा लढली जाऊ शकते हे शिकवले आणि ती सर्वाधिक प्रभावीपणे परिणाम करते हे डॉ.आ.ह. साळुंखे यांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून आणि लिखाणातून दाखवून दिले आहे.

  कधीच कुणाबद्दल द्वेष मनात ठेऊन त्यांनी कोणतेच लिखाण केलेले नाही. तटस्थ राहून त्यांनी फक्त विषयांची चिकित्सा केलेली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी मनुस्मृती, रामायण, महाभारत यांसारख्या अनेक संस्कृत ग्रंथांची साध्या-सरळ शब्दात फोड करून ती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचविली. काही धर्मग्रंथातील प्रक्षेप (मूळ ग्रंथात नव्याने घातलेला भाग) आणि त्यांचे उद्देश समाजासमोर त्यांनी पुराव्यांसहित मांडले. विद्रोही तुकाराम या पुस्तकातून एका नवीन तुकाराम महाराजांची समाजाला ओळख करून दिली. एका नवीनच दृष्टिकोनातून भगवान गौतम बुद्धांची त्यांनी अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी केली. आपले म्हणणे सभ्य शब्दात सटीक आणि ठामपणे मांडणारे डॉ. साळुंखे वाचकांची मने निःशंक करतात. त्यांनी बहुजनांच्या परंपरेचा नव्याने घेतलेला शोध लक्षणीयच आहे. त्यांनी सामान्य जनतेच्या पतनाला त्यांच्या धडावर असलेलं परकं डोकंच कसं कारणीभूत आहे हे सकारण पुराव्यांसह सिद्ध केले. सर्वसामान्यांसाठी अनेक मूळच्या इंग्रजी आणि संस्कृत पुस्तकांचा त्यांनी सोप्या मराठी भाषेत अनुवादसुद्धा केला आहे.

  परिवर्तनवादी चळवळींच्या मार्गातल्या अडचणी काय आहेत? या चळवळींनी नेमकं कसं वागायचं? त्याकरिता लोक कसे जोडायचे? धार्मिक व जातीय सलोखा राखण्यासाठी काय केलं पाहिजे? हे त्यांनी सोप्या भाषेत मांडले. मराठा- दलित वाद, हिंदू-मुस्लिम वाद मिटविण्यासाठी कायम प्रयत्न केले. आपल्या व्याख्यानांमधून अनेक ऐतिहासिक दाखले देऊन बहुजनांच्या मनात परस्परांविषयी असलेले अनेक गैरसमज दूर केले. परिवर्तनवादी आणि पुरोगामी चळवळीतील कट्टरवादी कार्यकर्त्यांना प्रबोधन व परिवर्तनाकरिता कट्टरवाद कसा निरर्थक आहे हे समजविले. डॉ.साळुंखे यांनी समाजासाठी न भूतो न भविष्यती कार्य करून ठेवले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी कधीच कुण्याच जाती-पातीचे किंवा महापुरुषाचे प्रतिनिधित्व करत प्रबोधन केले नाही. त्यांचे संपूर्ण कार्य सर्वसमावेशकच आहे.

  महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुरु झाल्यापासून आजपर्यंत श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (१९९७ ,साहित्य), श्रीमती लता मंगेशकर (१९९८, संगीत), श्री. सुनील गावस्कर (१९९९, क्रीडा), डॉ. विजय भाटकर (२०००, विज्ञान), श्री. सचिन तेंडुलकर (२००१, क्रीडा), पं. भीमसेन जोशी (२००२ संगीत), डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग (२००३, समाजसेवा व आरोग्यसेवा), डॉ. मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे (२००४, समाजसेवा), डॉ. रघुनाथ माशेलकर (२००५, विज्ञान), श्री. रतन टाटा (२००६ ,उद्योग), श्री. रामराव कृष्णराव उर्फ आर.के.पाटील (२००७, समाजसेवा), डॉ.नारायण विष्णू उर्फ नानासाहेब धर्माधिकारी (२००८, समाजसेवा), श्री. मंगेश पाडगावकर (२००८, साहित्य), श्रीमती सुलोचना लाटकर (२००९, मराठी चित्रपट), डॉ. जयंत नारळीकर (२०१०, विज्ञान), डॉ.अनिल काकोडकर (२०११, विज्ञान), श्री.बळवंत मोरेश्वर पुरंदरे (२०१५, साहित्य), श्रीमती आशा भोसले (२०२१, संगीत (घोषित) या सर्व मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. परंतू २०१२, २०१३, २०१४ व २०१६, २०१७, २०१८, २०१९ मध्ये हा पुरस्कार कुणालाही दिला गेला नाही. का? इतक्या वर्षांमध्ये कुणीच ह्या पुरस्काराच्या लायक नव्हतं?

  महाराष्ट्र भूषण पुरस्कार देणे सुरु झाले १९९६ पासून आणि डॉ. आ.ह. साळुंखे हे मागील ४० वर्षांपासून म्हणजेच १९८० पासून सातत्याने लिखाण आणि व्याख्यानांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करत आहेत. पण शासनाने दखल घेऊ नये हे अत्यंत क्लेशदायक आहे. डॉ.साळुंखे महाराष्ट्रातील प्रख्यात विचारवंत, व्याख्याते आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक आहेत. सातारा शहरातील लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात संस्कृत विषयाचे ३१-५-२००३ पर्यंत विभागप्रमुख आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे विद्याशाखेचे अधिष्ठाता (फॅकल्टी ऑफ आर्ट्सचे डीन) व अकॅडमिक काउन्सिलचे सदस्य होते. त्यांना राष्ट्रभाषा पंडित म्हणून गौरवण्यात आलेले आहे. 4 ऑगस्ट २००९ ला महाराष्ट्र सरकारने डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी समितीसुध्दा नेमली होती. या समितीने तयार केलेला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धोरणाचा मसुदा २२-१-२०१० रोजी महाराष्ट्र सरकारला सादर केला. संमत झालेल्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठीही आ.ह. साळुंखे यांची नेमणूक करण्यात आली होती.

  १४ ऑक्टोबर १९९९ ला सांगली जिल्ह्यातील वाळवे गावाचे क्रांतिवीर नागनाथआण्णा नायकवडी यांच्या हस्ते, कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवनामध्ये कार्यकर्त्यांच्या पैशातून घेतलेली मारुती व्हॅन त्यांना भेट देण्यात आली. कार्यकर्ते स्वतः प्रामाणिकपणे वर्गणी करून त्यांना गाडी देतात आणि कार्यकर्त्यांनी ज्या अपेक्षेने गाडी दिली त्या अपेक्षेला डॉ. साळुंखे सरांनीसुद्धा पूर्ण न्याय दिला. याच गाडीने डॉ. आ.ह. साळुंखे यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने देत २० वर्षांत २० हजार किलोमीटर प्रवास केला आहे. आजपर्यंत विद्रोही साहित्य संमेलन, विचारवेध साहित्य संमेलन, अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, मराठा साहित्य संमेलन, परिवर्तन साहित्य संमेलन, बौद्ध साहित्य संमेलन, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलन अशा अनेक साहित्य संमेलनांचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले आहे. त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचा दोनदा डॉ. आंबेडकर पुरस्कार,तीन वेळा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिवाजी विद्यापीठाचा पुरस्कार, अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्य पुरस्कार, सामाजिक कृतज्ञता निधीचा डॉ. राम आपटे पुरस्कार अशे शेकडो पुरस्कार मिळालेले आहेत. तरीसुद्धा २०१२ नंतर ७ वेळा हा पुरस्कार कुणालाही देण्यात आला नाही. काय डॉ.आ.ह.साळुंखे ह्या पुरस्कारासाठी पात्र नव्हते?

  डॉ.साळूंखे यांनी समाजासाठी जे करायचे होते ते काहीही हातचे न राखता केले, आता समाजाची पाळी आहे की समाजाने त्यांना योग्य सन्मान मिळवून द्यावा. त्याकरिता महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातुन मोहिम राबविली पाहीजे. प्रत्येक तालुक्यातून मागणी झाली पाहिजे. आजपर्यंत ज्यांना महाराष्ट्र भूषण दिला होता त्यांच्यासाठी काय संपूर्ण महाराष्ट्रातून मागणी झाली होती? मग डॉ.साळुंखेंसाठी काय सरकार मागणीची वाट बघतेय? पुढारलेल्या आणि परिवर्तनवादी विचारवंतांना हा पुरस्कार देणारच नाही का शासन?खरे पाहिले तर भारतरत्न पुरस्काराकरिता त्यांची निवड व्हावी इतके प्रचंड मोठे कार्य त्यांनी इतिहास, साहित्य आणि धार्मिक क्षेत्रात करून ठेवले आहे जे आजपर्यंत कुणीच केलेले नाही. परंतु तरीसुद्धा जर शासन अशा महान व्यक्तिमत्त्वाकडे दुर्लक्ष करत असेल तर आता महाराष्ट्रातील नागरिकांनाच डॉ.साळुंखे सरांचा सन्मान त्यांना मिळवून देण्याकरिता पुढाकार घ्यावा लागेल. डॉ. आ.ह.साळुंखेंना अशा पुरस्कारांची गरज नाही परंतु डॉ. साळुंखेंना हा पुरस्कार जाहीर झाल्यास ह्या पुरस्काराचीच गरिमा वाढणार आहे यात कुणालाही काही शंका असण्याचे कारण नाही. दुःख याचे आहे की त्यासाठी मागणी करावी लागतेय. आज प्रत्येकाने महाराष्ट्र शासनाला हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे की, डॉ.आ.ह.साळुंखेंना महाराष्ट्र भूषण केव्हा मिळणार?

  ✒️चंद्रकांत झटाले(अकोला)मो:-९८२२९९२६६६