विकलांग बांधवांनो, नव्या उमेदीने जगा!

74

(विश्व विकलांग दिन विशेष)

दिव्यांगत्व अर्थात अपंगत्व हे संयुक्त राष्ट्रांच्या सहस्त्रकीय प्रगती योजनांतील एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट असून इ.स.२०१५ सालापर्यंत या समस्येवर सुवर्णमध्य गाठण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यासाठी इ.स.१९९२पासून ३ डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघातर्फे अपंगांचा दिवस म्हणून घोषित झालेला आहे. शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात म्हणून या दिवसाची योजना आहे. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो. विविध उपक्रमांद्वारे निधी उभारला जावा म्हणून या दिवसाची योजना आहे. संयुक्त राष्ट्रसंघातर्फे सन १९८३ ते १९९२ हे दशक दिव्यांगासाठी अर्पण करण्यात आले होते व त्याद्वारे जगभरच्या सरकारांना त्यांच्या उद्धारासाठी मोहिमा राबविण्यास भाग पाडले होते. दशकअखेरीस ३ डिसेंबरची निवड झाली आणि सन १९९२मध्ये पहिला ‘दिव्यांग दिन’ साजरा झाला होता.

आज जगातली दहा टक्के लोकसंख्या म्हणजेच सुमारे ६५ कोटी लोक या ना त्या रूपाने विकलांग आहेत. जागतिक आरोग्य संघटनादेखील अशा बांधवाच्या जीवनाची गुणवत्ता वाढावी म्हणून प्रयत्नशील आहे. त्यासाठी विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उपक्रम हाती घेतले जातात.हा दिवस साजरा करताना चार महत्त्वाच्या पायऱ्या लक्षात घ्यायला हव्यात- १) शाळा, कॉलेजस्, सरकारी, खाजगी व निमसरकारी संस्थांतर्फे आयोजित उपक्रमात सहभागी होणे. २) विविध प्रचार मोहिमा आयोजित करून अपंगांच्या प्रश्नांना वाचा फोडणे. त्यांना सहकार्याचे अभिवचन देणे. ३) विकलांग बांधवांच्या ठायी असलेल्या छुप्या कलागुणांचा साक्षात्कार होण्यासाठी उत्सव, शिबीरे किंवा मेळावे भरविणे आणि त्यांची जगण्याची उभारी वाढविणे. ४) दिव्यांगांच्या उद्धारासाठी जागतिक स्तरांवरची नियमावली कटाक्षाने पाळली जात नसेल तर त्यासाठी काटेकोरपणे दक्षता घेऊन ते मार्गी लावणे.

दिव्यांग म्हणजेच ज्याचे अंग दिव्य सोसत आहे अर्थात शरीर अधू झालेले आहे. त्यालाच विकलांग किंवा अपंग असेही म्हटले जाते. लोक त्यांना संबंधित अवयवहीन म्हणून चिडवतात. जसे की आंधळा, पांगळा, लंगडा, हेकणा, चकणा, बहिरा, मुका, थुटा, बुटका, नकटा, चपटा, आदी शब्द योजून त्यास अपमानास्पद वागणूक दिली जाते. यातील काही शारीरिक व्यंग हे जन्मजात असतात. तर काही अपघाताने झालेले असतात. ते काहीही असले तरी दिव्यांग व्यक्तींनाही स्वाभिमानाने व सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणून शासनासह लोकांनीही त्याचे शिक्षण, भरणपोषण, चलनवलन, मनोरंजन, आवागमन, आवडनिवड, छंद, आदींची पूर्तता केली पाहिजे. त्यांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होऊन जीवन संपवू शकतील अशाप्रकारचे व्यंगावर जोर देऊन किंवा चिडवून बोलणे सामान्य लोकांनी टाळलेच पाहिजे. या आंतरराष्ट्रीय दिनाच्या माध्यमातून त्यांना जीवन जगण्यास बळ आणि नवी उमेद मिळावी, हाच शुद्ध सात्विक हेतू यामागील आहे.

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे जागतिक दिव्यांग दिनाच्या समस्त दिव्यांग बंधुभगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️शब्दांकन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी)मु. पो. ता. जि. गडचिरोली,मधुभाष- ९४२३७१४८८३.
इमेल- nikodekrishnakumar@gmail.com