ज्ञानाच्या अथांग सागरास विनम्र अभिवादन

46

▪️डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेष

✒️ मा.पी.डी.पाटील सर(महात्मा फुले हायस्कूल, धरणगाव)

भारतीय संविधानाचे शिल्पकार – थोर समाजसुधारक – कायदेपंडीत – अर्थशास्त्रज्ञ – विश्वरत्न – डॉ. भीमराव रामजी आंबेडकर संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आहे अस मला वाटते. भारतीय संविधानावर आज आपला देश मार्गक्रमण करीत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे….

बाबासाहेबांचे पुर्ण नाव डॉ.भीमराव रामजी आंबेडकर होते. मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्यातील महु या लष्करी छावणी असलेल्या गावात वडील सुभेदार रामजी सकपाळ व आई भिमाई यांच्या पोटी १४ एप्रिल, १८९१ रोजी या क्रांतिसुर्याचा जन्म झाला. लहानपणी सर्वजण भिमरावांना प्रेमाने ‘ भिवा ‘ असे म्हणतं.

भीमराव सहा वर्षांचे असतानाच त्यांची आई भीमाबाई मरण पावल्या. भीमरावांचे पुढील सर्व पालनपोषण सुभेदार रामजी व त्यांची बहीण मीराबाई ( मीराआत्या ) ह्यांनी केले. रामजी लष्करातून निवृत्त झाल्यावर कुटुंबासह नोकरीसाठी साताऱ्यास आले. त्यामुळे भीमरावांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यास झाले.

भीमराव लहानपणापासुन अत्यंत बुद्धीमान , धाडसी व तेजस्वी होते. त्यांच्या भावंडामध्ये दोन बहीणी व दोन भाऊ बाळादादा व आनंदा असा सुखी परीवार होता. भीमरावांचे माध्यमिक व विश्वविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूल व कॉलेजमध्ये झाले.

लहानपणापासुन जातीय भेद भीमरावांना पहावयास मिळाला. शिक्षण घेत असतांना बाहेर बसावे लागे. पाणी हे अस्पृश्यांसाठी वेगळ्या मटक्यात असे. सवर्ण लोकं यांच्या सावलीचा विटाळ मानतं असे. कुत्र्या – मांजरांना पाणी पिण्याचा अधिकार आहे पण आम्हा महारजातीच्या लोकांना नाही ?…. असे एक ना अनेक प्रश्न भिमरावांना पडत.. ते सतत आपल्या वडिलांना प्रश्न विचारत ?.. रामजी बाबा म्हणायचे भिवा तु शिक मोठा हो व या प्रश्नाचे उत्तर शोधं !.. यासाठी तुला शिक्षणाची गरज आहे.

याच काळात त्यांचे लग्न रमाई शी झाले. त्यांचे जीवन प्रभावी होण्यास साह्यभूत झालेल्या केळुस्कर गुरूंजीशी त्यांचा निकटचा संबंध आला. केळुस्कर गुरूजी त्यांचे खरे गुरु व मार्गदर्शक बनले. गुरूजींनी स्वतः लिहलेले ” बुद्ध चरीत्र ” बाबासाहेबांना मॅट्रीक परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे समाजातर्फे ठेवलेल्या बक्षिस समारंभात भेट दिले. पदवी घेतल्यानंतर त्यांना बडोदे संस्थानचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती मिळाली व १९१३ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्र विषयात एम.ए. व पीएच. डी. ह्या पदव्या मिळविल्या.

भारतात परत आल्यानंतर त्यांनी बडोदे संस्थानची नोकरी धरली. बडोदे येथील वास्तव्यात त्यांना अस्पृश्य म्हणून जे अत्यंत कटू अनुभव आले , तेथील काही सवर्णानी त्यांचा छ्ळ केला. त्यांमुळे त्यांनी ती नोकरी सोडली व मुंबईस येऊन सिडनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी पत्करली. तोपर्यंत अस्पृश्य म्हणून पदोपदी त्यांचा अपमान व्हायचा याचा परिणाम त्यांच्या मनावर फार झाला……

त्यागमुर्ति रमाई ने बाबासाहेबांची खुप सेवा केली. ते नसतांना सर्व परीवार सांभाळला. कधी उपाशीपोटी झोपले असतील पण बाबासाहेंबाकडे कधीही तक्रार केली नाही. बाबासाहेब शिक्षणामुळे कुटुंबांपासुन दूर , कधी सामाजिक चळवळीमध्ये पण अशा वेळी माता रमाईने कुटुंब छान सांभाळले. यशवंत व आनंदा ला शिक्षण दिले.

अस्पृश्यांमध्ये जागृती निर्माण करण्याकरिता त्यांनी अस्पृश्य वर्गातील कार्यकर्त्यांची संघटना उभारण्यास सुरूवात केली. मुंबई येथे ३१ जानेवारी १९२० रोजी मूकनायक नावाचे वृत्तपत्र काढले. नागपूर येथे मे १९२० मध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली एक अखिल भारतीय परिषद त्यांनी बोलावली. अस्पृश्यांचे प्रतिनिधी विधिमंडळाने नेमावेत. या महर्षी शिंद्यांच्या ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ च्या धोरणाचा या परिषदेत निषेध करण्यात आला. त्यांनी हाती घेतलेल्या ह्या प्राथमिक कार्यातच त्यांचे नेतृत्वाचे गुण दिसून आले….

छत्रपती शाहू महाराज व महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने इंग्लंडला गेले. त्यांनी लंडन विद्यापीठाची डी. एससी . ही दुर्लभ पदवी १९२३ साली संपादन केली. ते बॅरिस्टरही झाले. मायदेशी परतताच मुंबईस त्यांनी वकिली सुरू केली. वकीली करत असतांना पैश्याकडे न पाहता सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवुन दिला. जेधे – जवळकर यांचा खटला बाबासाहेबांनी लढला व जिंकलात देखील. सरकारी महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापकाचे व प्राचार्याचेही काम केले. तथापि अस्पृश्यांच्या हिताचे कार्य त्यांनी चालूच ठेवले.

स्वातंत्र्य – समता – बंधुत – न्याय प्रस्थापित करण्यासाठी ते अहोरात्र लढले. १९२४ मध्ये त्यांनी ‘बहिष्कृत हितकारिणी’ ही संस्था स्थापन केली. शिका – संघटीत व्हा- संघर्ष करा. हे या संस्थेचे ब्रीदवाक्य होते.

१९२७ मध्ये कुलाबा जिल्ह्यातील महाडच्या चवदार तळ्यावर अस्पृश्यांना इतरांप्रमाणे पाणी भरता यावे, म्हणून त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह सत्याग्रह केला व त्या ठिकाणी त्यांना खुप संघर्ष करावा लागला. महाडमधील सवर्णानी त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला पण ते डगमगले नाही. त्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन अस्पृश्यतेचा पुरस्कार करणारी मनुस्मृतीचे रायगडांच्या पायथ्याशी दहन केले. त्यांच्या काही अनुयायांसह त्यांच्यावर सनातन्यांनी खटला भरला. खटला जिद्दीने लढवून त्यांनी स्वतःची व आपल्या सहकाऱ्यांची निर्दोष सुटका करून घेऊन चवदार तळ्यावर पाणी भरण्याचा अस्पृश्यांचा हक्क प्रस्थापित केला.

१९२८ साली भारतात आलेल्या सायमन आयोगावर इतरांनी बहिष्कार घातला होता. पण अस्पृश्य बंधूचे हित लक्षात घेऊन बाबासाहेबांनी मात्र त्या मंडळासमोर आपली साक्ष नोंदवून, अस्पृश्य लोकांकरिता सरकारने काय करावयास पाहिजे, हे सांगितले. अस्पृश्यांना इतरांप्रमाणे देवाचे दर्शन घेता यावे, म्हणून त्यांनी आपल्या अनुयायांसह १९३० साली नाशिक येथे काळराममंदिर- प्रवेशासाठी सत्याग्रह केला. त्यात त्यांच्या अनुयायांना मार खावा लागला, पण पूर्वीच्याच जिद्दीने त्यांचे कार्य चालू राहिले. त्यांनी बहिष्कृत भारत , जनता , समता, इ.वर्तमानपत्रांद्वारे त्याचप्रमाणे बहिष्कृत हितकारिणी व इतर संस्थाद्वारे अस्पृश्यांवर होणाऱ्या अन्यायाविरूध्द आवाज उठविला व त्यांच्यात आत्मविश्वास, अन्यायाविरूध्द लढण्याची जिद्द , वाईट चालीरीती सोडून देण्याची प्रवृत्ती, शिक्षणाची व स्वच्छतेची आवड निर्माण करून त्यांचा स्वाभिमान जागृत केला…….

बाबासाहेबांनी १९३० मध्ये गोलमेज परिषदांसाठी इंग्लंडला गेले. तिन्ही परिषदांना ते उपस्थित राहिले. तेथे त्यांनी अस्पृश्यांची बाजू मांडली आणि अस्पृश्यांच्या इतर हक्काबरोबर स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली व ती पंतप्रधान मॅक्डॉनल्ड ह्यांनी मंजूरही केली. त्यातूनच गांधीजी व बाबासाहेब ह्यांच्यात मतभेद निर्माण झाले.

गांधीजीना हा अस्पृश्यांचा स्वतंत्र मतदारसंघ मान्य नव्हता. तो रद्द व्हावा म्हणून त्यांनी पुणे येथे येरवड्याच्या तुरूंगात प्राणांतिक उपोषण आरंभिले. त्या वेळी महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेबआंबेडकर ह्या दोघांत राखीव जागांच्या संख्येबाबत आणि राखीव जागा ठेवण्यासंबंधी घ्यावयाच्या जननिर्देशाच्या मुदतीविषयी चर्चा होऊन २४ सप्टेंबर १९३२ रोजी सुप्रसिध्द पुणे करार झाला. त्यान्वये पाच वर्षानंतर जननिर्देश घेण्यात यावा, असे ठरले. या घटनेनंतर तीन वर्षानी त्यांची पत्नी रमाबाई मरण पावली.

बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूरपक्षाची १९३६ साली स्थापना केली. ते प्रांतिक विधिमंडळाच्या निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आले. १९३९ साली येऊ घातलेल्या संघराज्य पध्दतीला त्यांनी विरोध केला व दारुबंदीच्या धोरणावर टीका केली, १९४२ साली त्यांनी ‘ऑल इंडिया शेड्यूल्ड कास्टस फेडरेशन’ नावाचा एक देशव्यापी पक्ष स्थापन केला. या पक्षातर्फे अस्पृश्यांकरिता त्यांनी अनेक लढे दिले.

१९४२ पासून १९४६ पर्यंत ते व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूरमंत्री होते. या काळात त्यांनी अस्पृश्यांची शैक्षणिक व आर्थिक उन्नती करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ स्थापन केली व मुंबईस सिध्दार्थ महाविद्यालय सुरू केले. ह्याच संस्थेने पुढे औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय स्थापिले. भारत स्वतंत्र झाल्यावर ते केंद्रीय मंत्रिमंडळात विधिमंत्री म्हणून आले. स्वतंत्र भारताच्या संविधान समितीचे ते सभासद झाले.

बाबासाहेब संविधान समितीमध्ये होते. ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते.त्यांनी २ वर्ष, ११महीने, १८दिवस अथक परिश्रम घेऊन भारतीय संविधान तयार केले. २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी त्यांनी भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद व पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्याकडे सुपूर्त केले. आणि २६ जानेवारी १९५० पासुन ते भारतात लागु झाले. म्हणुन बाबासाहेबांना ‘भारतीय संविधानाचे शिल्पकार’ असे म्हटले जाते.

हिंदु धर्म जातिसंस्थेमुळे पोखरला गेला आहे, अशी त्यांची ठाम समजूत होती. सवर्णाकडून अस्पृश्यांवर होत असलेला अन्याय धर्मांतरावाचून दूर होणार नाही, या त्यांच्या दृढ श्रध्देनुसार त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मोठ्या समारंभात अनेक अनुयायांसह बौध्द धर्म स्वीकारला. यानंतर त्यांनी बौध्द धर्माच्या प्रसाराचे कार्य हाती घेतले.

बाबासाहेबांना वाचनाची अतिशय आवड होती. एकवेळ मला अन्न मिळाले नाही तरी चालेल पण पुस्तक वाचन सोडणार नाही. इतकी ज्ञानाची भुख होती. ते जीवनभर विद्यार्थी होते. ७ नोव्हेंबर हा दिवस बाबासाहेबांचा साताऱ्यातील शाळेचा पहिला दिवस होता म्हणुन भारतात ७ नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिवस’ म्हणुन साजरा केला जातो. ग्रंथ हेच गुरू आहेत असे ते नेहमी म्हणत . बाबासाहेब १८-१८ तासं अभ्यास करीत. बाबासाहेबांच्या घरी एक ग्रंथालय होते. त्यामध्ये २५,००० दुर्मिळ ग्रंथ होते. बाबासाहेबांनी कास्ट्स इन इंडिया ( १९१७ ) , द प्रा ब्लम ऑफ द रुपी ( १९२३ ), मिस्टर गांधी अँड दी ऍमन्सी पेशन ऑफ दी अनटचेबल्स ( १९४५ ), हू वर दि शुद्राज ( १९४६ ), द बुद्धा अँड हिज धम्मा असे अनेक ग्रंथाचे लेखन केले.

बाबासाहेबांनी घेतलेले शिक्षण B.A. , M.A. ,Ph.D. ,D.Sc. , LL.d. , D. Lit , Bar – at – Law,असे आहे. जगातल्या १०० विद्यापीठामध्ये सर्वश्रेष्ठ कोलंबिया विद्यापीठ हे प्रथम आहे. आणि कोलंबिया विद्यापीठात १०० बुद्धीमान मुलांमध्ये डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे प्रथम आहेत. याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणुन समस्त भारतीयांनी बाबासाहेबांचा आदर्श घ्यावा. असे मला वाटते.

बाबासाहेबांनी राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांना गुरु मानले. महात्मा फुलेंचा घराचा नंबर ३९५ गंजपेठ, पुणे असा होता. म्हणुन बाबासाहेबांनी संविधानात ३९५ कलमे अंतर्भूत केली. व आपल्या गुरूला मानवंदना दिली.

बाबासाहेबांची संघर्ष गाथा ही केवळ वाचकांपर्यंतच पोहचली होती. पण स्ट्रार प्रवाह या चैनल मुळे ” माझा भिमराया ” या मालिकेतुन बाबासाहेबांचा खडतर प्रवास घरा – घरात सर्वसामान्यांपर्यंत पोहचला याचा मला मनस्वी आनंद आहे. या मालिकेतील दिग्दर्शक सह सर्व कलाकारांचे आभार !…..

अशा स्वाभिमानी महामानवाचे ६ डिसेंबर १९५६ रोजी महापरिनिर्वाण झाले. संपूर्ण भारत देश पोरका झाला. अश्रुंच्या धारा कुणालाही आवरता आल्या नाही. या ज्ञानाच्या अथांग सागरास शतशः नमन व कोटी – कोटी वंदन !……..

या १४ एप्रिल ला आपण सर्व भारतीय ज्ञानाचे – समतेचे – न्यायाचे – बंधुतेचे – स्वातंत्र्याचे दिप लावूया… व बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करुया !……

👏👏🪔🪔🌸🌸

🖋️ मा.पी.डी.पाटील सर
▪️ महात्मा फुले हायस्कूल , धरणगांव.
📱 9403746752