हेळंब येथे श्री खंडोबा यात्रोत्सव 9 ते 11 डिसेंबर ; यात्रोत्सवाची जय्यत तयारी सुरू

30

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ प्रतिनिधी)

परळी(दि.6डिसेंबर):- तालुक्यातील हेळंब येथे प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री खंडोबाची यात्रा दि. 9 ते 11 डिसेंबर रोजी होत असून यात्रेची जोरदार तयारी सुरु आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणावर पंचक्रोशीतील भाविक येत असल्याने ग्रामस्थामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात यात्रेच्या पार्श्‍वभुमीवर घरोघरी भाविक व नातेवाईकांच्या स्वागताची तयारी सुरु असल्याचे दिसत आहे.

हेळंब येथे श्री खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी चंपाषष्ठीला मोठी यात्रा भरत असते. याहीवर्षी ही यात्रा जोरदार होणार आहे. यात्रा अवघ्या काही दिवसावर आली असुन यात्रेची नागरिकांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. नवसाला पावणारा खंडेराया अशी या देवसस्थानाची पंचक्रोशीत ओळख आहे. परिसरातील गावो गावचे नागरिक दर्शनासाठी, नवस करण्यासाठी व नवसाच्या पुर्तेतेसाठी येथे गर्दी करीत असतात. या पार्श्‍वभुमीवर ग्रामस्थांच्या वतीने स्वच्छते सह इतर तयारीला वेग आला आहे. यात्रेनिमित्त गावामध्ये दि.9 ते 11 डिसेंबर या कालावधीत श्रींची पालखी मिरवणुक, शोभेची दारु आदींसह कुस्त्या व इतर धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहेत. यात्रे दरम्यान भाविकासह व्यापाऱ्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.

श्री खंडोबाचे मंदिर हे हेळंब पासुन १ किलोमिटर अंतरावर असुन रस्त्याची डागडुजी व सुशोभिकरण करण्यासाठी नागरिक सरसावले आहेत. श्रींच्या मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असुन विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. पालखी सोहळा, वाघ्या मुरळी, कुस्त्यांची दंगल होणार आहे. गावातील युवक व खंडोबा भक्त यात्रेच्या तयारीला लागले आहेत. घरोघरी माहेर वासियांनी मोठ्या प्रमाणावर येतात. त्यांच्या स्वागताचीही तयारी सुरु आहे. कामानिमित्त बाहेर गावी गेलेले नागरिकही यात्रेनिमित्त आवर्जुन गावाकडे येतात. दरम्यान पंचक्रोशीतुन मोठ्या प्रमाणावर भाविक येत असल्याने ग्रामीण पोलिसांच्या वतीने पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यावेळी कोविड नियमांचे पालन करत यात्रात्सव.साजरा होणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.