बालमजूरी टाळण्यासाठी, सर्वजन राहू बालकांचे पाठी………

6


■ विशेष लेख.

लेखिका-जयश्री नीलकंठ सिरसाटे–मो क्र. ९४२३४१४६८६

संकलन- वशिष्ठ खोब्रागडे -गोंदिया मो.9284761232

‘नाही हातात ताकद, तरी गाळतोय घाम.
मुखी जाण्या दोन घास, करी चिमुकले हात काम.’

एकीकडे बालपण म्हणजे सर्वात सुखाचा काळ. ना कसली चिंता, मनसोक्त खेळा, मनसोक्त हसा, आनंद लुटा पण दुसरीकडे आपल्या च देशात आजही अनेक बालके या सुखापासून वंचित आहेत.

  1. ‘बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा’ असं आपण लहानपणापासून ऐकत आलो. एकीकडे मुलांच्या आवडीनिवडी जपल्या जातात. त्यांना काय हवे नको ते पुढच्या पुढे हौस पुरवली जाते. बोट मांडले ती वस्तू खरेदी केली जाते आणि दुसरीकडे पोटाची टिचभर खळगी भरण्यासाठी सिग्नल जवळ वस्तू विकणारी, बसस्थानक, रेल्वे स्थानकावर पाणी वाटणारी, रेल्वेत सफाई करणारी मुले. अशा मुलांना कुठले आलंय सुख? त्यांचं बालपण तर हरवून बसले. कुठली साखर आणि कुठला रवा. संपूर्ण वेळ पोट कसं भरेल याच विवंचनेत.

‘वय आमचे शिकायचे, किमाची नाही सवयी.
आमच्यानंतर होत नाही, कसरत आणि कमाई.’
घरामध्ये पाचवीला पुजलेले दारिद्र्य, शैक्षणिक सुविधांचा अभाव, बेरोजगारी, व्यसनाधीनता, कौटुंबिक समस्या, शैक्षणिक मागासलेपणा आणि शिक्षणाविषयी उदासीनता. अशा अनेक कारणांमुळे बालपणीच कामाला जुंपले गेले. जे वय खेळण्या बागडण्याचे त्यावयात विटभट्टीवर, बांधकामावर, हॉटेल मध्ये कपबशा विसळण्यात, गॅरेजमध्ये गाड्या धुण्याची बालपण कोमेजून जाते.

‘बालकांना कामाला पाठवणे तसेच कामाला ठेवणे गुन्हा आहे. लहान वय हे शिक्षणाचे असते. मुलांना शिकवा तेच भविष्यातील उज्ज्वल भारत आहेत. याकरीता अनेक कायदे तयार केले गेले.

●बालन्याय अधिनियम 2000 नुसार वयाचे अठरा वर्षे पुर्ण झालेली नाही अशी व्यक्ती म्हणजे बाल कामगार.

● बालकामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा १९८६ नुसार वय १४ वर्ष खालील मुलांना कामगार ठेवण्यास प्रतिबंध करणे असे या अधिनियमाचे उद्दिष्ट असून नियमभंग करणार्‍यांना 3 महिन्यांपासून ते 1 वर्षापर्यंत तुरुंगवास व सोबतच दहा ते वीस हजार दंड होऊ शकतो.

बालके ही राष्ट्राची संपत्ती आहे. देशाचा भावी आधारस्तंभ आहे. त्यांच्या वर देशाचे भवितव्य अवलंबून आहे. बालकांना सुदृढ बनविणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. आज गरज आहे ती समाजातून बालकामगार कमी करण्याची.

‘ए पोरा पुसून घे, म्हणण्यापेक्षा ए पोरा शिकून घे.’ म्हणा. बाल मजूरी रोखण्याची. सांगता येत नाही यांमधूनच एखादा डॉक्टर, इंजीनियर, सायंटिफिक जन्माला येऊन भारताचे नाव उज्ज्वल करेल. बालमजूरी टाळण्यासाठी सर्वजण राहु बालकांच्या पाठी. कामाने दुखेल बाळाची पाठ, अडवू नका त्याच्या शाळेची वाट.
बाल मजूरी टाळण्यासाठी सर्वजण राहु बालकांच्या पाठी. तेव्हांच खरा जागतिक बालकामगार निषेध दिन आपण साजरा केला म्हणू शकतो.

–जयश्री निलकंठ सिरसाटे, गोंदिया
मो क्र. ९४२३४१४६८६