घनशाम पाटलांच्या हस्ते होणार चौथ्या एकता मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

    34

    ✒️विशेष प्रतिनिधी(सौ.सरस्वती लाड)

    बीड(दि.9डिसेंबर):-पिंपळनेर ता.शिरूर कासार जि.बीड येथील हुतात्मा देवराव उगलमुगले साहित्य नगरीत डिसेंबर अखेर संपन्न होणाऱ्या चौथ्या एकता मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन चपराक मासिक(पुणे) चे संपादक मा.घनशाम पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती फाउंडेशनचे सचिव पत्रकार गोकुळ पवार आणि लखुळ मुळे यांनी दिली.

    येत्या २९ व ३० तारखेला शिरूर तालुक्यातील पिंपळनेर येथे एकता फाउंडेशन शिरूर कासार व पिंपळनेर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद चे मराठी विभाग प्रमुख तथा सुप्रसिद्ध गीतकार मा.डाॅ.दासू वैद्य यांची याअगोदरच बिनविरोध निवड करण्यात आलेली असून या दोन दिवसीय साहित्य संमेलनात विविध जिल्ह्यातील कवी,लेखक,कथाकार,साहित्यिक,समीक्षक,संपादक सहभागी होणार आहेत.त्यामुळे परिसरातील साहित्यप्रेमी रसिकांना विविध स्वरूपाच्या दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी मिळणार असल्याने नागरिकांनी या सुवर्णसंधीचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त पिंपळनेर ग्रामस्थ आणि एकता फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

    फाउंडेशनचे मार्गदर्शक कथाकार प्रा.डाॅ.भास्कर बडे आणि संस्थापक सदस्य नितीन कैतके यांनी आयोजित केलेली ही बैठक साहित्यिक अनंत कराड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्राचार्य माही शेख, कोषाध्यक्ष योगगुरू शिवलिंग परळकर,सहसचिव शिवचरित्रकार कैलास तुपे,व्यंगचित्रकार दिपक महाले,संस्थापक सदस्य राजेश बीडकर,सल्लागार अ‍ॅड.भाग्यश्री ढाकणे,लो.गो.मुं.शि.सह.पत.च्या संचालिका श्रीम.रंजना फुंदे,आदर्श शिक्षिका मिरा दगडखैर,महिला प्रतिनिधी रंजना डोळे,श्रीमती लता बडे यांची उपस्थिती होती.