अज्ञान येते कामी

34

आजकाल ज्ञानाचे डोस पाजण्याची जणू स्पर्धाच लागलेली दिसते . कोणताही क्षेत्र घ्या . त्यातील बारकावे वादळासारखे घोंगावत कानावर पडले नाहीतर नवल . जन्म घेण्याआधिच गर्भातील पिंडाला समस्या डोंगर फोडायला सांगण्याचा प्रकार . याला जबाबदार गर्भात चक्रव्यूह भेदण्याचे शिक्षण देणारी परंपरा की एकलव्याचा अंगठा कापणारी वृत्ती यात आपल्याला घुसायचे नाही .

जगातील सर्वात उंच शिखर प्रथमतः गाठणाऱ्याला कोणी आधीच कल्पना दिली असती ; तिथे चढताना खूप संकटे येणार आहेत . तर तो पायथ्याशी घुटमळत बसला असता . कित्येक शोध अज्ञानाच्या गर्भातून प्रसवलेले दिसतात . आपल्याकडे काही करायच्या आतच सूचना येतात . ‘वर चढू नकोस , पडशील .’ ‘पाण्यात उतरू नकोस , बुडशील .’ ‘आगीजवळ बसू नकोस , भाजशील .’ उठण्याआधीच मनात सुचनांनी बस्तान मांडलेले असते . मग काय कर्तृत्व आणि विक्रम ।फुलपाखराला उडता येते का ? याचे उत्तर होय आहे . पण जैवशास्त्रानुसार फुलपाखरू उडू शकत नाही . फुलपाखरांची शरीररचना उडू शकणारी नाही . तरी फुलपाखरू उडतो . फुलपाखराचे अज्ञान त्याला या फुलावरून त्या फुलावर बागडण्याचा आनंद देऊन जातो . असे अनेक विक्रम अज्ञानापोटी घडलेले आहेत .

‘तुला हे जमेल का ?’ ‘हे तुझ्या आवाक्यात नाही .’ यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते .’ ‘मागे एकाने प्रयत्न केला ,बघितलस ना । त्याच काय झालं .’ या उपदेशमंत्रांनी हाती घेतलेल्या कार्याची पेटण्याआधीच राखरांगोळी केली जाते . जगाच्या सफरीला समुद्रमार्गे निघालेला कोलंबस अज्ञानापोटी भलत्याच प्रदेशात जाऊन पोहोचला . आणि अमेरिकेचा शोध लागला . रुढलेल्या वाटांचा किती आग्रह धरावा ? रुढलेल्या वाटा चालू चालू उखडलेल्या आहेत . खड्डे पडून पाण्याचे डबके साचलेले आहेत . नव्या वाटा तयार करण्याची नितांत गरज आहे .नव्या वाटेवरून चालताना कितीक खळे येतील , त्याचा त्रागा न करता त्यांना अलगद वेचून बाजूला फेकले पाहिजे . पुढे मार्गक्रमण करताना जर भलामोठा दगड आल्यास घाबरून जाण्याचे कारण नाही ; त्यावर उभे राहून स्वतःची उंची वाढवून घ्या . पुढे एखादा पहाड पडेल , तेव्हा वळून मागे फिरू नका . त्याला धडका तर मुळीच मारू नका . थोडे थांबा , कानोसा घ्या आणि त्या पहाडाला वळसा घालत प्रवास सुरु ठेवा . यश तुमची वाट पाहत उभा असेल . कळीला कसे फुल व्हावे हे शिकवावे लागत नाही . कितीही कोपऱ्यात झाड लावले तरी तो प्रकाशाच्या दिशेने झेपावतो . यश मिळवण्याची जिद्द रक्तात भिनावी लागते . बांबूचे झाड उगवायला कित्येक वर्षे जावी लागतात .

सुरुवातीला ५ ते ७ वर्ष रोपटे मेले की काय ? अशी शंका येते . पण त्या काळात ते जमिनीत आपली मुळे घट्ट रोवत असतो . मग कितीही मोठे वादळ येऊ द्या ; झपाट्याने वाढणारी झाडे कोलमडून पडतात पण बांबूचे झाड वादळवाऱ्याशी झुंज देत तसेच उभे राहते .
संकटे आली पाहिजे . ती सोसण्याचे बळ जर अंगात भरायचे असेल तर स्वानुभवातून चटक्यांचा सोस पेलता आला पाहिजे . अनुभव घेण्याआधीच ज्ञानाची खैरात म्हणजे बोन्सायची निर्मिती . जगवाल तेवढे जगेल ,आधार सुटला की मरेल . ढगांचा आकार जसा सांगता येत नाही , तसा त्याच्या प्रवाहाची दिशा अडवता येत नाही . मानवी इतिहासाचा अभ्यास केल्यास आदिमानव कोणते ज्ञानकोश जवळ बाळगत होते . सर्व अज्ञान . म्हणून कुतूहलापोटी त्याच्या हातून नवीन नवीन आविष्कार घडत गेले . समृद्ध जीवनाकडे वाटचाल होत गेली . अज्ञान हवा म्हणजे संपूर्णतः ज्ञानाशी फारकत नव्हे .इथे इतकंच सांगायचं आहे की , मानवी जीवनात काही विक्रम घडतात त्यात अज्ञानापोटी केलेल्या धाडसाचे रहस्य दडलेले आहे . म्हणून पडू द्या , आदडू द्या , फुटू द्या . त्यातून उभारी घेऊन निर्माण झालेला आत्मविश्वास शाश्वत असेल . जो नव्या विक्रमाच्या प्रकाशात चमकायला कधीच मागे हटणार नाही .

आत्म्याची बळकटी घासूनपिटुन मळलेल्या वाटेत नसून नवनिर्मितीच्या खाचखडग्यात आहे . असे खाचखडगे तुडवत स्वतःची वाट चालून नवा पायंडा रचला पाहिजे . जुन्या वाटा किंवा ज्ञान नक्कीच मार्गदर्शक आहे . परंतु नव्याने निर्माण केलेल्या वाटेची बरोबरी अमृताहून गोड अशी वस्तूही करणार नाही , हे तितकेच सत्य . संत तुकाराम महाराज म्हणतात -“देव पाहाया गेलो , नि देवची झालो .” देव काय असतो ? तो कोठे आहे ? हे माहीत नसलेले संत तुकाराम महाराज देवाचा शोध घ्यायला गेले . शोधता शोधता स्वतः देवत्वापर्यंत पोहोचले . म्हणजे त्यातील सर्व इंगित , खरे – खोटे जाणून मानवी कल्याणाचा मंत्र जनसामान्यात पोहचवण्याचा ताकतीचे झाले . देवत्व म्हणजे परिपूर्णता धारण करायची असेल तर खुल्या मनाने पूर्वग्रह बाजूला सारून शोधाच्या प्रवासाला सुरुवात करावी लागेल . यशोशीखर तुमची वाट पाहत आहे .

✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला,ता. मूल,जि. चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१