भारतीय सर्कशींचे उगमस्थान: महाराष्ट्र!

150

भारतातील पहिली सर्कस काढणारे आद्य सर्कसचालक म्हणजे महाराष्ट्रातील विष्णुपंत छत्रे हे होत. त्यांनी सन १८७८मध्ये सांगलीला छत्रे सर्कसची स्थापना केली. ब्रिटिश अंमलात अनेक यूरोपीय सर्कशी भारतात येत व प्रमुख शहरी खेळ करून जात. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन व भारतीयांची स्वतंत्र सर्कस असावी, हा विचार मूर्त स्वरूपात आणून भारतातील पहिली सर्कस काढणारे आद्य सर्कसचालक म्हणजे महाराष्ट्रातील विष्णुपंत छत्रे हे होत. त्यांनी सन १८७८मध्ये सांगलीला छत्रे सर्कसची स्थापना केली. ते स्वत: उत्कृष्ट अश्वशिक्षक असून घोड्यांवरील कसरतींची अनेक कौशल्यपूर्ण कामे सर्कशीत करीत. त्यांनी विल्सन सर्कस खरेदी करून अनेक यूरोपीय कसरतपटू आपल्या सर्कशीत घेतले. त्यांनी आपल्या सर्कसला ‘ग्रँड इंडियन सर्कस’ हे नाव देऊन भारतभर तसेच परदेशांतही दौरे काढले. या सर्कशीत असलेले सदाशिव कार्लेकर यांनी सांगली येथे ‘कार्लेकर ग्रँड सर्कस’ची स्थापना केली. प्रचंड शिकारखाना हे छत्रे सर्कसचे प्रमुख वैशिष्ट्य तर त्या काळातील जेंकिन्स व फॅमिलीचे चित्तथरारक मोटारसायकल उड्डाण हे कार्लेकर सर्कशीचे खास आकर्षण होते. सन १९४३मध्ये ती बंद पडली.

छत्रे यांच्या सर्कशीत नाव कमावलेले देवल बंधू यांनी आपली स्वतंत्र ‘देवल सर्कस’ सन १८९५मध्ये काढून भारतभर व परदेशांतही दौरे करून चांगली नावारूपाला आणली. ही सर्कस ‘ग्रेट इंडियन सर्कस’ या नावाने प्रसिद्ध होती. सन १९५७ साली ती बंद पडली. शारीरिक कसरतींचे खेळ व पशूंची कौशल्याची कामे ही या सर्कशीची लक्षणीय वैशिष्ट्ये होती. काशिनाथ सखाराम ऊर्फ बंडोपंत देवल हे या सर्कसचे एक मालक भारतातील सर्वोत्कृष्ट विदुषक म्हणून ख्यातकीर्त होते. ‘दि बेस्ट क्लाउन इन इंडियन सर्कस’ म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो. त्याशिवाय पशुशिक्षक, रिंगमास्टर, जग्लर- हातचलाखीचे खेळ करणारा, अशा विविध भूमिकांतून त्यांनी सर्कसमध्ये सु.चाळीस वर्षे कारकीर्द केली. देवल, कार्लेकर व परशुराम लायन या त्या काळातल्या भारतातल्या सर्वांत मोठ्या तीन सर्कशी होत्या. परशुराम लायन सर्कस ही परशुराम माळी यांनी सन १८९०च्या सुमारास तासगावला सुरू केली. लो.टिळकांनी त्यांना ‘दि लायन ऑफ द सर्कसेस’ ही मानाची पदवी दिली व त्यावरून त्यांच्या सर्कसला ते नाव पडले. या सर्कशीत वाघ, सिंह, हत्ती, घोडे आदींचा मोठा भरणा होता.

ते स्वतः उत्कृष्ट पशुशिक्षक होते. ते वाघ-सिंहांची व विशेषतः हत्तींची कामे फार सुंदर करून घेत. त्या मानाने कार्लेकर सर्कसमध्ये जनावरे कमी पण खेळाडूंचा भरणा जास्त होता. त्यांतही यूरोपीय, चिनी, जपानी खेळाडू संख्येने अधिक होते. परशुराम लायन सर्कस सन १९५५ला मिरज येथे बंद पडली. कार्लेकर सर्कशीतील शेलार यांनी स्वत:ची ‘शेलार्स रॉयल सर्कस’ सन १९१०साली सुरू केली. ताराबाई शिंदे ही भारतातील पहिली महिला सर्कसपटू मल्ल होती. कार्लेकर ग्रँड सर्कसमध्ये शक्तिप्रदर्शनाची व साहसाची कामे ती करीत असे. तसेच वाघ-सिंहांबरोबर कुस्तीसारखे धाडसी खेळ, झुल्यावरील कसरती इ.करीत असे. तिने स्वतःची ‘ताराबाई सर्कस’ स्थापन केली होती. नारायणराव वालावलकर यांनी ‘दि ग्रेट’ भागिदारीत सुरू केली. ती भारतात व परदेशांतही प्रेक्षणीय खेळ करून दाखवित असे. महाराष्ट्राच्या ज्या भागात सर्कस जन्मली, वाढली व फोफावली तो भाग म्हणजे सांगली जिल्ह्यातील तासगाव, म्हैसाळ हा परिसर. तासगाव ही तर महाराष्ट्रातील सर्कसव्यवसायाची प्रमुख बाजारपेठच होती. तेथे एकूण पंधरा सर्कशी होत्या. त्यांपैकी परशुराम सर्कस ही सर्वांत मोठी. जी.ए.सर्कस, भोसले सर्कस, पाटील-कुलकर्णी सर्कस या अन्य काही उल्लेखनीय सर्कशी होत. म्हैसाळ हीदेखील सर्कसची जन्मभूमी होती.

सुप्रसिद्घ देवल सर्कस व दि ग्रेट बाँबे सर्कस या म्हैसाळच्या नावाजलेल्या सर्कशी होत. यांखेरीज वडगाव, जि.नगर येथील मोरे ग्रँड सर्कस, पटवर्धन सर्कस, सँडो सर्कस, लेडीज सँडो सर्कस या काही उल्लेखनीय सर्कशी होत. शंकरराव थोरात यांनी वडगाव येथे स्थापन केलेली ‘ग्रँड इंडियन सर्कस’ हीदेखील त्याकाळात नावाजलेली होती. शेलार सर्कशीत आपल्या कादकिर्दीची सुरूवात केलेले दामू गंगाराम धोत्रे हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पशुशिक्षक होते. सुरूवातीला त्यांनी शेलार सर्कशीतून सायकलवरील कसरतीची कामे केली व त्या सर्कशीतच त्यांनी पशुशिक्षक म्हणून नाव कमावले. अमेरिकेतील ‘रिंगलिंग बदर्स’ या प्रख्यात सर्कशीतही त्यांनी पशुशिक्षक म्हणून उत्तम प्रकारे पशूंचे खेळ करून जागतिक कीर्ती मिळविली. वन्य श्वापदांबरोबरच्या आपल्या रोमहर्षक व साहसी अनुभवांचे कथन त्यांनी ‘वाघसिंह माझे सखे-सोबती’ या पुस्तकात केले आहे.
महाराष्ट्रातील सर्कशी जसजशा बंद पडू लागल्या, तसतसे सर्कस व्यवसायाचे केंद्र केरळकडे सरकू लागले. केरळमध्ये तेल्लचेरी येथे सर्कस व्यवसायाची बाजारपेठ उभी राहिली. तेथून अनेक कलावंत, कसरतपटू सर्कस व्यवसायात शिरले. केरळी सर्कशीच्या प्रगतीसाठी त्यांनी व्यावसायिकांच्या संघटना उभारल्या.

केरळ शासनानेही सर्कस-व्यवसायाला उत्तेजन दिले. कलाकारांना संरक्षण दिले. सर्कस-व्यवसायाच्या हितार्थ कायदे केले. दामोदरन यांनी स्थापन केलेली सुप्रसिद्घ कमला थी रिंग सर्कस, जेमिनी, ग्रेट बाँबे, पी.त्यागराज यांची ग्रेट प्रभात सर्कस, न्यू प्रकाश, रेमन इ.केरळी- मलबारी सर्कशी प्रसिद्घ असून त्या सर्व केरळीयांच्या मालकीच्या आहेत. कमला सर्कसप्रमाणेच सहदेवन यांची जेमिनी सर्कस ही अत्यंत भव्य व मोठी असून फार प्रख्यात आहे. आंध प्रदेशातील प्रा.राममूर्ती यांची सर्कसही फार नावाजलेली होती. राममूर्ती हे प्रख्यात मल्ल असून सर्कशीत शक्तीचे अचाट प्रयोग करीत असत.

सध्याच्या काळात दूरदर्शन, चित्रपट अशा जास्त आकर्षक, सहजसुलभ व प्रभावी रंजनमाध्यमांचा प्रसार सर्वदूर वाढला असल्याने सर्कशीच्या लोकप्रियतेला ओहोटी लागून सामान्य प्रेक्षक सर्कसपासून दुरावत चालला आहे. त्यामुळे सर्कस व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न घटले आहे. सर्कसचा प्रचंड लवाजमा पोसण्यासाठी येणारा अवाढव्य खर्च, सर्कस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यास लागणारा वाहतूक-खर्च, अशा खर्चांच्या वाढत्या प्रमाणामुळे सर्कस व्यवसाय एकूणच तोट्यात आला आहे. सर्कस-व्यवस्थापनही फार जिकिरीचे व अडचणीचे होत चालल्याने त्याचाही सर्कस व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक सर्कशी बंद पडल्या आहेत. सर्कसमधील प्राण्यांच्या वापराविरूद्घ, प्राणि-दयावादी संघटनांनी व प्राणिहक्करक्षक कार्यकर्त्यांनी विरोधी आंदोलने करून कायदेशीर बंधने घातली आहेत. काही स्थानिक प्राधिकरणांनी तर त्यावर बंदीही आणली आहे. अशा अनेक प्रकारच्या समस्यांमुळे व निर्बंधांमुळे एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला हा रंजनप्रकार आता हळूहळू अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. रशिया व चीन येथे मात्र सर्कशीची लोकप्रियता अद्याप टिकून आहे, हे उल्लेखनीयच!

✒️संकलन व शब्दांकन:-श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
[दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी.]
मु. रामनगर वॉर्ड क्र.२०, गडचिरोली.पो. ता. जि. गडचिरोली.
भ्रमणध्वनी – ७७७५०४१०८६.
nikodekrishnakumar@gmail.com