नवीन वर्ष हे खरंच नविन असतं का..? फक्त कालगणनेतील आकडा बदलतो?

32

कोणतीही व्यक्ती जडभरीत वस्त्रांनी आणि वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधनांनी नटूनथटून चारचौघात गेल्यावर त्याला कुणीही नवं तर म्हणणार नाही ना! एवढंच का जोपर्यंत त्या व्यक्तीच्या शरीरावर जडभरीत वस्त्र नि प्रसाधनांनी जो साजशृंगार असतो तोपर्यंत ती व्यक्ती थोडी वेगळी भासत असते. ते सर्व उतरल्यावर जुनं ते सोनंच असते. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. हे आपण मागिल दोन वर्षापासून चांगल्या त-हेने बघत आहेत. असं असलं तरीही प्रत्येक दिवसात तहीतरी नवं असतंच असं नाही; पण एक मात्र निश्चित त्यात वेगळं काहीतरी नक्कीच असतं आणि या वेगळेपणामुळेच उगवणारा प्रत्येक दिवस आपल्याला नवा वाटत असतो. याच वेगळेपणाचं नावीन्य ओळखलं तर प्रत्येक दिवस हा नववर्षाची सुरुवात ठरू शकतो.

सूर्याच्या प्रत्येक किरणाला सप्तरंग असते. ज्याला आपण इंद्रधनुष्य या नावाने ओळखत असतो. या सात रंगापैकीच एक रंग स्मृतीचा असतो आणि हा स्मृतीचा रंग ज्या क्षणाला सर्वांगाला स्पर्शून जातो, तो क्षण अविस्मरणीय ठरतो. पण या रंगालाही वेगवेगळ्या छटा असतात. कधी सुखाची तर कधी दु:खाची, कधी यशाची तर कधी अपयशाची, कधी मिलनाची तर कधी दुराव्याची, कधी कँन्सर ची तर कधी किडनीसारख्या आजाराची आणि कधी कोरोनाची तर कधी ओमायक्राॅनची. पण काहीही असो, अशा क्षणामुळेच पूर्ण वर्ष अविस्मरणीय ठरत असते. म्हणूनच नववर्षाचं स्वागत करताना पाठमो-या वर्षाला विसरावं असं वाटत नाही. काय तर विसरूच शकत नाही.

नवीन वर्ष म्हणजे विविध संकल्पाच्या मुहूर्ताचा क्षण ! भूतकाळाच्या अंधारात हरवलेल्या क्षणांच्या गर्तेतेतून आलेली जीवनाची नाव उज्ज्वल भविष्यातील स्वप्नांच्या यशाच्या किनारी लावण्याची नवी उमेद देणारा क्षण. पण स्वप्नं कितीही आपुलकीनं रंगविली तरीही ते कधीच आपली होत नसतात. मानवी जीवनाची अस्थिरता आणि स्वप्नांची क्षणभंगुरता यांचं नातं कासवाच्या कवचासारखं घट्ट विणलेलं. हा त्याचा संबंध नववर्षाच्या पहिल्या दिवशी जाणवतच नाही. पण जुनं होणा-या वर्षाकडे पाहिलं की, हे खरं वाटायला लागतं. म्हणून मग नववर्षाचं स्वप्न रंगविणं म्हणजे तळहातावरच्या आयुष्यरेषेची लांबी मोजण्यासारखं आहे.सुरू होणारं नववर्ष एक वर्षानंतर जुनं होणारं असतं; पण तरीही नववर्षाचा पहिला दिवस आपल्या आयुष्यात वेगळंच महत्त्व घेऊन येतो. या दिवशी उगवणारा सूर्य तोच असला तरी नववर्षाच्या सुखाची भूपाळी गात येतो. त्यामुळे त्याच्या चेह-यावर एक पाहुणपण जाणवतं. आणि म्हणूनच अशा पाहुण्याचं स्वागत करण्याची अदम्य इच्छाशक्ती प्रत्येकाच्या चेह-यावर स्पष्टपणे जाणवते.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मावळतीकडे निघालेल्या सूर्याला निरोप देताना मनाला लागलेली भावस्पर्शी हुरहुर तर दुसरीकडे गुलाबी बोच-या थंडीत कुडकुडत का होईना थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी चाललेली लगबग यामुळे निरोप आणि स्वागताचा हा एक आनंददायी सोहळा होत असतो. मावळतीच्या वर्षात केशर रंगात अर्घ्यस्नान करून सूर्य मोतीजडित, लाल जडभरित प्रकाशमय वस्त्र परिधान करण्यासाठी क्षितिजाआड गडप होताना गलबलून आलेलं हळवं मन कृत्रिम रोषणाईच्या आरासीत, फटाक्यांच्या आतषबाजीत विचारांना नावीन्याचा मुलामा चढवून नव्या वर्षात समरस व्हायला लागतं. संगीताच्या मधुर स्वरात अन् ढोलताशांच्या निनादात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजण सज्ज असतात. पण यावर्षी या स्वागत समारंभाला काहीसं विरजन लागलं. काही बंधनाच्या कटीबद्ध चौकटीतचं या नवख्या पाहुण्याचं स्वागत करायचं आहे.

“सुखमय वैभवाच्या पानाफुलांनी
बहरत यावे नववर्ष
अमृतमयी आनंद फळांनी
बहरावा जीवनवृक्ष”

यासारख्या लक्षवेधी शब्दांच्या संगतीनं मनही हरखून जातं. येणारी आव्हानं नव्या उमेदीनं पेलण्यासाठी हे नववर्ष प्रत्येकाला खुणावत असतं आणि प्रत्येकजण हे आव्हान पेलण्यासाठी आपापल्या परीने तयार होत असतो आणि प्रत्येकाला सांगत असतो…

“गेले दिवस विसरुनिया
करा स्वागत नववर्षाचे
पाऊल उचला न डगमगता
नव कल्पित आशेचे”

✒️शब्दस्पर्शी:-सुनील शिरपुरे(कमळवेल्ली,यवतमाळ)मो:-7057185479