भिमा कोरेगाव हल्ला प्रकरणी चार वर्षानंतरही न्याय का नाही. महाविकास आघाडी सरकारने भूमिका घ्यावी

27

✒️नाशिक,जिल्हा प्रतिनिधी(शांताराम दुनबळे)

नाशिक पुणे(दि.2जानेवारी):- भिमा कोरेगाव विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या आंबेडकरी अनुयायावर हल्ला चढवून दंगल घडविण्याचा प्रकार भिडे एकबोटे समर्थकांकडून करण्यात आला होता. या घटनेचे देशभरामध्ये तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेला आता चार वर्षे उलटल्यानंतरही यातील आरोपीना अद्यापपर्यंत अटक करण्यात आलेली नाही. तसेच दाखल गुन्हयांची अद्यापपर्यंत सुनावणी न झाल्याने आंबेडकरी जनता चार वर्षांनंतरही न्यायापासून वंचित असल्याने याबद्दल महाराष्ट्र आघाडी सरकारने ठाम भूमिका घेवून भिमा कोरेगावच्या हल्लेखोरांना कठोर शासन करण्यासाठी सरकारने पावले उचलावीत अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना केलेली आहे.

भिमा कोरेगाव हल्यामध्ये सुमारे चार हजार आरोपींचा सहभाग असताना केवळ दिडशे लोकच अटक करण्यात आली आहेत. उर्वरित आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करणे आवश्यक असतानाही संपूर्ण तपास पोलीसांकडून थांबविलेला आहे.
तसेच वारंवार मुदतवाढ देत *भिमा कोरेगाव न्यायालयीन चौकशी आयोग प्राथमिक अहवाल सादर करण्यातही असमर्थ ठरला आहे.* त्यामुळे चौकशी आयोगाच्या प्रलंबीत कामकाजामुळे न्याय मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळे विदयमान महाविकास आघाडी सरकारने भिमा कोरेगाव हल्लेखोरांच्या कारवाईबाबत विशेष कृतीदल स्थापन करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या घटनेबाबत अद्यापपर्यंत कोणताही आढावा घेतलेला नाही तसेच याबाबत नेमकी काय कारवाई करण्यात येईल याबाबतची भूमिका देखील घेतलेली नाही. त्यामुळे नव्या *गृहमंत्र्यांची भिमा कोरेगाव हल्लेखोरांवरील कारवाईबाबत नेमकी काय भूमिका आहे हे आंबेडकरी जनतेला कळणे आवश्यक आहे*. त्यानुसार गृहमंत्र्यांनी याबाबत आपले निवदेन करावे अशी मागणी सुध्दा राहुल डंबाळे यांनी केली आहे.

हा हल्ला आंबेडकरी समुदायावरील सर्वांत मोठा हल्ला असल्याने न्याय मिळेपर्यंत रिपब्लिकन युवा मोर्चाकडून लढा लढला जाणार असल्याचे पञकाद्वारे कळविले आहे.