स्टार फोरेवर इंडिया अवॉर्ड या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत “मिस महाराष्ट्र २०२१” हा किताब जिंकलेल्या राजलक्ष्मी चव्हाण यांचा वंचित मुलांबरोबर नाताळ साजरा

27

✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुणे(दि.2जानेवारी):-नाताळ सण जगभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नाताळ सणानिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जातात. पण वंचित मुलांबरोबर स्वतःच्या यशाचा आनंद साजरा करणाऱ्या पुण्यातील एका युवतीने एक चांगला संदेश दिला आहे.पुण्यातील झेड ब्रीज खाली वसलेल्या वंचित लोकांच्या वस्ती मधे दोनशे अडीचशे कुटुंबे वसलेली आहेत. या वस्तीतील शंभर हून अधिक मुलांचे संस्कार वर्ग पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या सोनम पाटील आणि शांता सुर्वे मिळून घेतात. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पुण्यात शिक्षण घेणारी युवती राजलक्ष्मी चव्हाण वंचित मुलां पर्यंत पोहोचली.

जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या स्टार फोरेवर इंडिया अवॉर्ड या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत “मिस महाराष्ट्र २०२१” हा किताब जिंकलेल्या राजलक्ष्मी चव्हाण या युवतीने तिला मिळालेल्या यशाचा आनंद वस्तीतल्या वंचित मुलांबरोबर नाताळ सणाच्या निमित्त्याने साजरा केला. मूळची अहमदनगर मधील श्रीरामपूरची असलेली एकोणीस वर्षाची राजलक्ष्मी डॉ. प्रशांत चव्हाण आणि डॉ. स्वाती चव्हाण यांची कन्या असून पुण्यात स्थापत्यशास्त्र शिकत आहे.लहानपणापासून समाजसेवेची आवड असलेल्या राजलक्ष्मी ने पुलाखालील वस्तीतील वंचित मुलांना चित्रकलेची पुस्तके, रंगपेट्या, खाऊ आणि लोकरीच्या कानटोप्यांचे वाटप केले. तीन ते पंधरा वयोगटातील ही मुले भेटवस्तू आणि खाऊ मुळे हरकून गेली होती. मुलांनी तिथल्या तिथे चित्रे रंगवण्यास सुरुवात केली चित्र पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. आपण साजरा करत असलेल्या सणाचा आनंद हा आपल्या आजूबाजूच्या वंचित मुलांनादेखील मिळावा व आपला आनंद द्विगुणित व्हावा हा चांगला संदेश राजलक्ष्मी ने तिच्या कृतीतून दिला आहे.