महाराष्ट्रात आज पत्रकार दिन का साजरा केला जातो?

25

✒️नवनाथ आडे(जिल्हा प्रतिनिधी बीड)मो:-9075913114

बीड(दि.6जानेवारी):-मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र आज म्हणजेच 6 जानेवारी रोजी सुरु केले. याच कारणामुळे आजचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.आजच्या दिवशी जांभेकर यांचे स्मरण करुन त्यांच्या कार्याचा आढावा घेतला जातो. या पार्श्वभूमीवरच त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती पाहूयात…बाळशास्त्री जांभेकर हे अतिशय कुशाग्र, उच्च गुणवत्ता असलेलं व्यक्तिमत्त्व होतं. ब्रिटिशांचे भारतात आगमन झाले होते. त्यानंतर 29 जानेवारी 1780 रोजी पश्चिम बंगालमध्ये ‘बेंगॉल गॅझेट’ नावाचे साप्ताहिक सुरु करण्यात आले.

आपले विचार प्रभाविपणे मांडण्यासाठी वृत्तपत्र हे माध्यम अत्यंत प्रभावी आहे, याची जाणीव हळूहळू भारतीयांना होऊ सागली. त्यानंतर बेंगॉल गॅझेटच्या अर्ध्या दशकाने म्हणजेच 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली.जांभेकर यांना आपण दर्पणकार म्हणूनही ओळखतो. ब्रिटिश कालखंडात इंग्रजांच्या विरोधात लिखाण करण्यास मनाई होती. असा परिस्थितीतही जांभेकर यांनी दर्पणच्या संपादक पदाची धुरा समर्थपणे सांभाळली होती.

*दर्पणमध्ये नेमकं काय असायचं?*

दर्पणचा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रकाशित झाला होता. त्यावेळी हा अंक मराठी तसेच इंग्रजी अशा दोन्ही भाषेत म्हणजेच जोडभाषेत प्रकाशित केला जायचा. एक इंग्रजी आणि एक मराठी असे दोन स्तंभ या वृत्तपत्रात असत.मराठी जनतेला देशात काय सुरु आहे हे समजावे म्हणून स्तंभ मराठीत लिहिला जायचा. तर वृत्तपत्रात काय लिहिले आहे हे ब्रिटिशांना समजावे म्हणून दुसरा स्तंभ इंग्रजीत लिहला जायचा. इंग्रजी सत्तेचे कायम लक्ष असूनही तब्बल साडे आठ वर्षे दर्पण हे वृत्तपत्र चालले. त्याचा शेवटचा अंक जुलै 1840 मध्ये प्रकाशित झाला.

बाळशास्त्री जांभेकर यांनी महाराष्ट्राला पहिले वृत्तपत्र देऊन वैचारिक अभिसरणाची पेरणी केली. त्यांच्यानंतर वृत्तपत्र हे वैचारिक क्रांतीचे महत्त्वाचे साधन बनले. जांभेकर हे एक अतिशय हुशार आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होते.त्यांना संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषा चांगल्या अवगत होत्या. शिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती या भाषांवरही त्यांचे प्रभुत्त्व होते. भूगोल, विज्ञान, गणित अशा विषयात ते पारंगत होते. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला प्रणाम…!